प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
जातिभेद हें अपूर्ण दृढीकरण आहे.- कांहीं लोकांची अशी कल्पना असते कीं, सध्यांचा अतिशय वाढलेला व गुंतागुंतीचा जातिभेद हा पूर्वींच्या चांगल्या आणि साध्या स्थितीचें अवनत स्वरूप होय. ही कल्पना विद्वान व अज्ञान या दोहोंमध्येंहि सारखीच आढळून येते. यूरोपीय व भारतीय ग्रंथकारांच्या ग्रंथामध्येंहि ही कल्पना आढळून येते. ख्रिस्ती मिशनर्यांनीं या कल्पनेचा फायदा घेऊन लोकांच्या मनांत असें भरविलें आहे कीं, हा परिणाम ब्राह्मणी वर्चस्वामुळें उत्पन्न झाला आहे. तसेंच ही चुकीची कल्पना आपल्या संप्रदायप्रसारास एक कारण म्हणून ते पुढें आणतात. ज्याला वस्तुस्थितीचें वास्तविक ज्ञान आहे आणि ज्याला निरनिराळ्या गोष्टींचा संबंध पाहून त्यांची संगति लावण्याचें व त्यापासून नियम काढण्याचें ज्ञान आहे त्याला जुन्या इतिहासावरून निराळ्याच गोष्टींचा बोध होतो. त्याला असें स्पष्ट दिसेल कीं, सध्यांची स्थिति हें पूर्वींच्या चांगल्या स्थितीचें अवनत स्वरूप नसून केवळ दृढीकरणाची क्रिया अपुरी राहिल्यानें अथवा एकत्र आलेल्या समुच्चयांची एकरूपता नीट न झाल्यामुळें घडलेला परिणाम आहे. सध्यांचा हिंदुसमाज, म्हणजे परकीय संप्रदायांत प्रवेश करून परकीय समाजांत गेलेले लोक सोडून बाकीचे भरतखंडांतील सर्व लोक, अनेक जातींमध्यें विभागले गेल्यामुळें पृथक् भासत असले तरी ते आतांच्या इतके पूर्वीं केव्हांहि संघटित झाले नव्हते. अनेक विभाग अलीकडेच पडले आहेत, व अद्यापहि कांहिं नवीन विभाग पडत असतील. परंतु हे सर्व विभाग समता आणि ऐक्य उत्पन्न करण्याच्या प्रयत्नामध्यें स्वाभाविकतःच उत्पन्न होणारे-व कांहीं तर उत्पन्न होणें अवश्य असलेले असेच-विभाग आहेत असें दाखवितां येईल. भरतखंडांतील जातिभेदाचा इतिहास म्हणजे अधिकाधिक वाढत जाणार्या विभागांचा व असमतेचा इतिहास नव्हे, तर हळूहळू होणार्या आणि अपूर्ण राहिलेल्या वाढीचा, संघटनेचा आणि दृढीकरणाचा इतिहास होय.
जातिभेदाचा इतिहास हें नांव देखील हिंदुसमाजाच्या इतिहासास अप्रयोजक दिसतें. याला योग्य नांव म्हटलें म्हणजे हिंदुसमाजाच्या परिणतीचा इतिहास हें होय. जातिभेदाचा इतिहास स्वतंत्रपणें लिहिणें अप्रयोजक होतें. समाजामधील वर्ग आणि जाती यांचे परस्परसंबंध राजकीय उलाढाली, निरनिराळे संप्रदाय, राज्यक्रांत्या, सांपत्तिक स्थितींतील फरक आणि समाजविषयक तत्त्वज्ञान यांमध्यें होणार्या फरकांवरून निश्चित होतात. त्यांच्यावर परकीय लोकांच्या आगमनाचाहि बराच परिणाम होतो. अशा स्थितीमध्यें जातिभेद अथवा त्यासारखाच दुसरा एखादा सामाजिक प्रश्न एकटाच घेऊन त्याचा विचार करणें अशक्य होतें. कोणत्याहि एका विशिष्ट कालांतील एका विशिष्ट समाजिक प्रश्नाचा कांहीं अंशीं पृथकपणें विचार करणें शक्य असतें. परंतु जेव्हा एखाद्या लेखकाला तीन चार सहस्त्रकांपर्यंत पसरलेल्या कालाचा विचार करावयाचा असतो तेव्हां निरनिराळ्या प्रश्नांची इतकी गुंतागुंत झालेली असते कीं, त्यांचें पृथक्करण करणें जवळजवळ अशक्य होतें. राष्ट्रीकरणाकरितां अथवा समाजदृढीकरणाकरितां योजावयाच्या उपायांचें अज्ञान व या उपाययोजनेचा हिंदुस्थानांत दिसून येणारा अभाव या दोन गोष्टींवरून आपणांस पूर्वींचे जातिभेद मोडण्याचे वास्तविक अथवा काल्पनिक, प्रामाणिक अथवा अप्रामाणिक प्रयत्न कां व्यर्थ झालें हें दिसून येतें. ते व्यर्थ होण्याचें कारण हें एकच कीं, आतांपर्यंत योग्य वेळ आली नव्हती. जातीभेदाचा नाश करण्याच्या प्रयत्नास जोंपर्यंत सर्व हिंदुस्थानभर एकाच कालीं प्रयत्न होणार नाहीं तोंपर्यंत केव्हांहि यश यावयाचें नाहीं. अशा तर्हेचा सर्व हिंदुस्थानभर एकाच वेळीं प्रयत्न होणें जेव्हां सर्व हिंदुस्थान एका सत्तेखालीं असेल आणि हिंदुस्थांतील सर्व लोकांत एकत्वाची भावना उत्पन्न झालेली असेल आणि एकाच तर्हेची उपाययोजना करण्याच्या कामीं परस्परांस साहाय्य करण्यास मिळण्याची संधि प्राप्त होईल तेव्हांच शक्य आहे. याखेरीज अशा तर्हेच्या कार्यास ज्यांचें सर्व देशावर वजन पडेल व ज्यांनां मोठमोठीं साम्राज्यें चालविण्याची योग्यता असेल व जे समाजसुधारणेच्या प्रामाणिक इच्छेनें प्रवृत्त झाले असतील अशा कार्यकर्त्या पुरुषांची जरूरी आहे.