प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.

ख्रिस्ती संप्रदाय.- ख्रिस्ती संप्रदाय हा कोणकोणत्या गोष्टी मिळून बनला आहे हें आपण पाहूं. प्रथमतः ख्रैस्त्य म्हणजे ख्रिस्ताचें शिष्यत्व किंवा ख्रिस्ताला देव अथवा देवाचा पुत्र मानणें हें मत होय. हें शिष्यत्व पत्करण्यामध्यें बाप्तिस्मा घेण्यासारखे अनेक विधी येतात. नाताळ व ईस्टरचे सण पाळणें या गोष्टीहि त्यांतच येतात. ईश्वर, पिशाच्च, ‘सोल’, स्वर्ग, आणि नरक यांच्याबद्दलच्या कल्पनांवरील विश्वास हींहि त्यांतच अंतर्भूत होतात. पुन्हां ख्रैस्त्य यामध्यें केवळ ख्रिस्ताचें शिष्यत्व येत नाहीं तर परंपरागत यहुदी कथा व बायबलमधील कथा यांचाचिह त्यांत अंतर्भाव होतो. अलीकडे पुष्कळ ‘चर्च’ मधून असें जाहीर करण्यांत येऊं लागलें आहे कीं, ख्रैस्त्य यामध्यें यहुदी इतिहासकथांचा अंतर्भाव होऊं शकत नाहीं, तर फक्त ख्रिस्ताच्या बारा प्रथमशिष्यांचा (अ‍ॅपॉसल्सच्या) तत्त्वांचा अंतर्भाव होतो. परंतु जर कोणीं सध्यांच्या ख्रिस्ती चर्चमधील स्थिति व प्रचारकसंस्थांची प्रवृत्ति-मग त्या प्रॉटेस्टंट असोत किंवा कॅथोलिक असोत-पाहिली तर जाहीर केलेल्या तत्त्वांपेक्षां आचारांत असलेलीं तत्त्वें निराळीं आहेत असें दिसून येईल. जुन्या कराराचा अंतर्भाव बायबलमध्यें केला आहे ही एकच गोष्ट या प्रचारकांच्या बोलण्याचें असत्यत्व सिद्ध करील असो.

आतां ख्रैस्त्याचा स्वीकार म्हणजे बायबलमध्यें उल्लेखिलेल्या, त्यानें संमति दिलेल्या व पसंत केलेल्या कल्पना, तत्त्वें व संस्था यांच्याशीं विरोधी असणार्‍या सर्व कल्पना वगैरेंचा त्याग करणें होय. श्रद्धावान ख्रिस्त्यानें ख्रिस्ती धर्मशास्त्राविरुद्ध असणार्‍या आपल्या जातीच्या, राष्ट्राच्या व वंशाच्या सर्व जुन्या संस्थांचा त्याग केला पाहिजे. यावरून ख्रिस्ती संप्रदायाच्या स्वीकाराचा सामान्य परिणाम निश्चित करणें कठिण नाहीं. ख्रैस्त्य स्वीकार करणार्‍या व्यक्तीच्या आपल्या मूळ राष्ट्रासंबंधीं असलेल्या सर्व परंपरागत भावनांचा नाश होऊन त्या ठिकाणीं यहुदी व बायबली कल्पना स्थापित होतात. हा ख्रिस्ती संप्रदायाच्या स्वीकाराचा सामान्य परिणाम होय. परंतु हा परिणाम केव्हांहि प्रचारकांच्या आकांक्षेप्रमाणें घडून येत नाहीं. ख्रैस्त्येतर संप्रदायांतील अनेक संस्था थोडेंसें ख्रैस्त्याचें आवरण घेतल्यावर ख्रिस्ती संप्रदायाच्या अंगभूत होतात. अन्यसंप्रदायी देवता ख्रिस्त्यांचे महंत (सेंट) बनतात, आणि अन्य संप्रदायांतील कांहीं चाली ख्रिस्ती संप्रदायांत मिळून जातात. तथापि या सर्व गोष्टी होऊनहि नव्या जुन्या ख्रिस्त्यांमध्यें बाह्य स्वरूपांत कांहीं सारखेपणा उत्पन्न होतो. पुन्हां, जेव्हां एखादें राष्ट्र ख्रिस्ती संप्रदायाचा स्वीकार करतें तेव्हां तें विकृत स्वरूपांत त्याचा प्रसार करतें. अशा वेळीं तें राष्ट्र खरोखर मूळ संप्रदायाचा प्रसार न करतां ख्रैस्त्याचें पांघरुण घातलेल्या आपल्याच राष्ट्राच्या कल्पनांचा व संस्थांचा प्रसार करतें. यूरोपांतील ख्रिस्ती संप्रदायांतील बराचसा भाग ग्रीस आणि रोम येथील संप्रदायांतून आलेला आहे; आणि त्या संप्रदायाबरोबर ग्रीक आणि रोमन संस्थांचा प्रसार झालेला आहे. जरी कांहीं पंडितांच्या मताप्रमाणें येशू स्वतः अरेमाइक भाषा बोलत असे आणि बहुतकरून मूळचें ख्रिस्ती धर्मशास्त्र हिब्र्यू भाषेमध्यें लिहिलें गेलें होतें तरी ग्रीक आणि रोमन या भाषांस बरेंच पावित्र्य प्राप्त झालें आहे. यूरोपियन राष्ट्रांनीं आतां ख्रिस्ती संप्रदायाचा स्वीकार केला आहे, आणि जेव्हां तीं राष्ट्रें या संप्रदायाचा प्रसार करतात तेव्हां तीं ख्रिस्ताच्या कल्पनांचा प्रसार करण्याच्या ऐवजीं ख्रैस्त्यप्रसारच्या नांवाखालीं स्वतःच्याच देशांतील कल्पनांचा व संस्थांचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न करतात. या गोष्टीचें स्पष्ट उदाहरण हिंदुस्थानांत आढळतें. दक्षिण हिंदुस्थानांत नवरीच्या गळ्यामध्यें एक मंगळसूत्र बांधण्याची चाल आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांस ही ताली म्हणजे मंगळसूत्र आवडत नसल्यामुळें ते तिच्याऐवजीं एक आंगठी घालण्याचा उपदेश करतात. परंतु ही आंगठी घालण्याची चालहि यूरोपांतील एका ख्रिस्तपूर्व खुळ्या समजुतीचा अथवा चालीचा अवशेष आहे. हिंदूंची मद्य व मांस याबद्दल तिरस्कारबुद्धि ही देखील एक अन्यसांप्रदायिक खुळी समजूत म्हणून समजली जात असे. परंतु सुदैवानें उच्च नैतिक कल्पनांच्या वाढीमुळें आतां ख्रिस्ती मिशनरी हिंदूंस आपल्या कळपांत घेतांनां त्यांची हि ‘खुळी समजूत’ काढून टाकण्याचा प्रयत्‍न अलीकडे करीत नाहींत.

ख्रिस्ती संप्रदायानें आपल्या संप्रदायांत येणार्‍या लोकांच्या मनावरील पूर्व संस्कार काढून टाकून सारखेपणा आणण्याचा प्रयत्‍न केला एवढेंच नव्हे तर संप्रदायांतील लोकांत बंधुत्वाच्या कल्पनेचाहि प्रसार केला. चर्चचा असा आग्रह असतो कीं, ख्रिस्ती संप्रदायांत येणार्‍या सर्व लोकांनीं एकमेकांस बंदुत्वाच्या नात्यानें वागवावें. त्याचप्रमाणें सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्यें एकत्र जमतात व त्यामुळें त्यांच्यांतील परस्पर दळणवळण वाढतें. ख्रिस्ती जनतेमध्यें बर्‍याच गोष्टी सामान्य असतात. त्यांची पूर्वपरंपरा एकच असते व त्यांचे सण, चालीरीती, दैवतें व कांहीं कल्पना एकच असतात. एकाच चर्चचे अनुयायी असणार्‍या लोकांमध्यें जर वंशविषयक फारसा भेद नसेल तर त्यांत असणार्‍या निरनिराळ्या जाती एक होऊं शकतात.

दैवतसंप्रदाय एकरूपात आणण्याचें काम करतात असें वर म्हटले आहे; आणि हे दैवतसंप्रदाय स्वभावतःच समाजविघातक आहेत असेंहि प्रतिपादन केलें आहे. परंतु या दोन विधानांत विसंगतपणा आहे असें समजुं नये. दैवतसंप्रदायापेक्षां संघट्टनपद्धतींत जास्त सोयी आहेत. केवळ संघट्टनपद्धतीनें समाजांत एकरूपता आणणें या क्रियेचा समाज विशिष्टप्रदेशरमर्यादित असावे या कल्पनेस बाध येत नाहीं. परंतु दैवतसंप्रदायाच्या प्रसाराची क्रिया मात्र प्रादेशिक समाजाच्या कल्पनेला विरोधी होते. दैवतसंप्रदायाचा प्रसार हा लोक कोणत्या प्रदेशांत राहतात याचा विचार न करतां कांहीं विशिष्ट गोष्टींवरील श्रद्धा आणि विशिष्ट उपासनापद्धति यांच्या साहाय्यानें एक समाज बनवावयास पाहतो. यामुळें दैवतसंप्रदाय हा खरोखर एखाद्या विशिष्ट प्रदेशांतील समाजाचें संघट्टन करण्यापेक्षां विघट्टनच करीत असतो. ज्यांनां एखाद्या प्रदेशांतील समाजाचें राष्ट्रीय अथवा साम्राज्याच्या दृष्टीनें दृढीकरण करावयाचें असेल त्यांनीं या दैवतसंप्रदायांपासून सावध राहावें. कारण आजपर्यंतच्या इतिहासांत हे संप्रदाय मनुष्यजातीस शापरूपच होऊन राहिले आहेत.