प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १४ वें.
सामाजिक दृढीकरण व समाजविस्तार या क्रियांचें जगद्विकासांत स्थान.
हिंदुधर्माचें कार्य.- हिंदुधर्माच्या बाबतींत यापुढें करावयाचें कार्य म्हणजे सर्व जगास सामान्य अशी एक परंपरा अगर मानवधर्म निर्माण करावयाचा, हें होय. हें कार्य आपण यापूर्वीं एकदां हातीं घेतलें होतें पण तें अपूर्ण राहिले. पश्चिम एशिया आणि यूरोप या देशांमध्यें जी संस्कृतीची वाढ झाली तींत आणि हिंदुस्थान व पूर्वेकडील देश यांमध्यें जी वाढ झाली तींत बराच फरक आहे. एका काळीं हिंदु संस्कृति सर्व जगावर पसरण्याच्या बेतांत होती, आणि ती सर्व जगामध्यें सांस्कृतिक ऐक्य उत्पन्न करणार होती. परंतु या कार्यांत तिला मानवांमध्यें भेद वाढविणार्या महंमदी व ख्रिस्ती या संप्रदायांच्या उत्पत्तीमुळें अडथळा आला. ख्रिस्ती व मुसुलमान या दोन सेमिटिक संप्रदायांनीं आपआपसांत तीव्र भेद उत्पन्न केला आणि सर्व जगापासून आपणां दोघांस निराळे समजून मनुष्यांची एकदिल होण्याची क्रिया अधिक कष्टसाध्य करून ठेविली. जेव्हां यूरोपीय लोकांनीं हिंदुस्थानामध्यें देश्य संस्कृतीच्या विकासाचें कार्य पाहिलें तेव्हां त्याला त्यांनीं ‘हिंदुइझम’ असें नांव दिलें. व तो एक पारमार्थिक संप्रदायच आहे अशी आपली चुकीची समजूत करून घेतली.
सर्व हिंदुस्थानास आणि पाश्चात्त्य जगास एकच सामान्य परंपरा निर्माण होण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे. या कार्याचे परिणाम हिंदुस्थानच्या बाबतींत पुढें दिल्याप्रमाणें सांगतां येतील. १. दिवसेंदिवस सोंवळ्याओंवळ्याच्या कल्पना कमी होत चालल्याच आहेत. २. पूर्वींच्या समजुती व कल्पना यांच्या सत्याबद्दल संशय येऊं लागला आहे, आणि आधुनिक शास्त्रांच्या साहाय्यानें त्या कल्पनांतील सत्य हडकून काढण्याचा प्रयत्न चालला आहे. ३. नवीन नवीन कल्पनांमुळें आणि सांपत्तिक परिस्थितीमुळें हिंदू लोकांच्या कुंटुंबव्यवस्थेमध्यें फरक होत आहेत. बहुभार्यात्वाची चाल नाहींशी होत आहे. ४. पोषाख, राहणी आणि खाणेंपिणें या बाबतींत हिंदूंमध्यें बराच फरक होत चालला आहे. ५. नास्तिकवाद, निरिश्वरवाद आणि भौतिकवाद यांचा प्रसार होत आहे. ६ ज्याच्या योगानें हिंदू लोक जगांतील दुसर्या सर्व लोकांस रानटी आणि अपवित्र समजत असत तो जात्याभिमान बराचसा कमी झाला आहे. निदान त्याला बराचसा धक्का बसला आहे. बरेचसे लोक यूरोपीयांचें भय बाळगून त्यांचा द्वेषहि करूं लागले आहेत. यूरोपीयांच्या शास्त्रीय ज्ञानाबद्दल आदर वाढत आहे. ख्रिस्ती मिशनर्यांच्या चळवळीमुळें ख्रिस्ती संप्रदायाबद्दल द्वेषहि वाढत आहे. ७. इतिहासपुराणांतील बर्याच कथा केवळ कल्पना म्हणून वाटूं लागल्या आहेत. प्राचीन हिंदू शास्त्रांचा आणि तत्त्वज्ञानाचा आतां निराळ्या तर्हेनें अभ्यास सुरू झाला आहे. जगांत एकच सत्य असतें म्हणजे दोन परस्परविरुद्ध गोष्टी सत्य असूं शकत नाहींत या तत्त्वास अनुसरून शास्त्रांच्या दोन विरुद्ध दिशांनीं झालेल्या प्रगतीची संगति लावण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्ञानकोश हें त्यांतीलच एक कार्य होय.
याप्रमाणें जगाला सामान्य अशी परंपरा उत्पन्न करण्याचें काम हल्लीं हिंदू लोकांच्या विचारांमध्यें जो अलीकडे फरक झाला आहे त्यामुळें आणि हिंदुस्थानानेंच दोन हजार अथवा त्याहूनही अधिक वर्षांपूर्वीं जी दिशा घालून दिली त्या दिशेनें जी हल्लीं यूरोपीय विचाराची वाढ होत आहे तीमुळें बरेंच सोपें झालें आहे.
यूरोपीयांच्या दैवतकल्पना आणि तत्त्वज्ञान याकडे काळजीपूर्वक रीतीनें पाहणार्या हिंदूस असें वाटतें कीं, हे पाश्चात्त्य लोक दैवतविषयक कल्पनांच्या मुग्धभावांतून नुकतेच कोठें बाहेर येऊं लागले आहेत. हिंदूंनीं फार प्राचीनकालापासून प्रदर्शित केलेले दैवतविषयक उच्च विचार पाश्चात्त्य अभ्यासकांस आतां फार आवडूं लागले आहेत; परंतु सामान्यतः यूरोपीयांमध्यें स्वतःच्या परमार्थपर कल्पनाबद्दल असलेला फाजील आदर आणि उच्च तत्त्वज्ञान समजून घेण्यास आवश्यक अशा बौद्धिक पूर्व तयारीचा असलेला अभाव यांमुळें इकडील विचारांतील मर्म त्यांस कळणें शक्य नाहीं. आजकालहि ज्या यूरोपीय तत्त्वेत्त्यांचे विचार त्यांच्या बौद्धिक प्रगतीमुळें हिंदू विचारांच्याच वळणावर येऊं लागले आहेत त्यांचा श्रद्धाळू यूरोपीयांकडून गौरव होत नाहीं. यूरोपीय तत्त्ववेत्त्यांस आतां असें कळूं लागलें आहे कीं, हिंदूंमधील ज्या गोष्टींची ते मूर्तिपूजकांचा खुळेपणा म्हणून चेष्टा करीत असत तसलेच प्रकार ख्रिस्ती संप्रदायांतहि आहेत. त्यांनां आतां हेंही वाटूं लागलें आहे कीं, ईश्वरानें बाकीच्या सर्व जाती वगळून एखाद्या विशिष्ट जातीलाच आपला साक्षात्कार दाखविला असें म्हणणें म्हणजे हट्ट होईल.
बायबलमधील देवविषयक कल्पना विशेषतः सैतानवाद मागें पडत चालला आहे. ईश्वराबद्दलच्या कल्पना जास्त विस्तृत होत चालल्या आहेत. ईश्वरासंबंधीं व्यक्तिविषयक कल्पना आतां नष्ट होत चालल्या आहेत. ‘सोल’ अथवा आत्मा म्हणून एक चीज इतर प्राण्यांत नसून मनुष्यप्राण्यांतच आहे ही कल्पनाहि आतां जुन्या काळची समजली जाते.
हिंदु तत्त्वज्ञानांतील कांहीं कल्पना पश्चिमेकडे प्रस्तृत झाल्या आहेत. बौद्ध संप्रदाय व बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार यूरोप व अमेरिकेमध्यें होत आहे. वेदांत तत्त्वज्ञानाचे अनुयायीहि पाश्चात्त्य देशांत आढळतात. हिंदूंचे पवित्र ग्रंथ आणि त्यांचे धर्मोपदेशक यांनां पाश्चात्त्य देशांत बराच मान मिळत आहे.
संस्कृत भाषेच्या ज्ञानानें आणि मनोरचना व भाषा यांमध्यें असलेल्या नात्यावरून पाश्चात्त्य लोकांस त्यांच्याप्रमाणेंच हिंदू हे कॉकेशियन वंशांतील आहेत ही गोष्ट समजूं लागली आहे व हिंदुस्थानासंबंधीं त्यांच्या कर्तव्याची त्यांनां जाणीव होऊं लागली आहे.
हिंदु संस्कृतीचा परिणाम पाश्चात्त्य संस्कृतीवर झाला आहे त्यापेक्षां पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम हिंदुसंस्कृतीवर अधिक झाला आहे. याचें कारण शोधावयास फार दूर जावयास नको. प्रथमतः, यूरोपीयांनीं आपलें राजकीय वर्चस्व सर्व जगावर प्रस्थापित केलें आहे. सत्ताधिष्ठीत जातीच्या कल्पना खर्याखोट्या कशाहि असल्या आणि त्यांच्या चालीरीती हितकर अथवा अहितकर असल्या तरी दुसर्या जातीवर त्या परिणाम करितात. दुसरें, हिंदुस्थान देश परतंत्र असल्यामुळें त्याला स्वतंत्र असें राजकीय अस्तित्वच नाहीं. त्यामुळें सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्र व राजकीय नीति ठरविण्याच्या कामांत त्याला बोलतांच येत नाहीं. याशिवाय, भौतिक शास्त्रांमध्यें यूरोपीयांनीं फारच आघाडी मारली आहे. तेव्हा यूरोपियन संस्कृतीनें घेण्यासारख्या गोष्टींपेक्षां तिच्याकडून हिंदुसंस्कृतीस मिळावयाच्याच गोष्टी अधिक आहेत. हिंदुस्थानानें भौतिक शास्त्रांत स्वतंत्रपणें भर घालण्याचे दिवस अद्यापि यावयाचे आहेत. या गोष्टीस आतां आरंभ झाला आहे, हें मात्र नाकबूनल करतां यावयाचें नाहीं.