प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
यहुदी.- आतां यहुदी लोकांकडे वळूं. हिंदुस्थानांत आलेले यहुदी लोक दोन वर्गांत पडतात. पूर्वीं येऊन राहिलेले ते बेने इस्त्रायल लोक होत. हे लोक बहुतेक बाबतींत मराठेच झालेले आहेत. ब्रिटिश सत्ता स्थापित झाल्यानंतर जे यहुदी लोक येथें आले ते नेटिवांच्या चालीरीती घेत नाहींत, तर राज्यकर्त्यांची राहणी स्वीकारतात. त्यांनीं अरबी भाषेलाहि सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न चालविला आहे व तिच्या जागीं ते कोणतीहि देशभाषा न स्वीकारतां इंग्रजीचा स्वीकार करतात. यांपैकीं कांहीं लोक यूरोपियन यहुदी आणि ख्रिस्ती लोकांशीं लग्न करतात परंतु आपले जातभाई बेने इस्त्रायल यांजशींदेखील लग्नव्यवहार करीत नाहींत. बेने इस्त्रायलांत घटस्फोट मंजूर नाहीं आणि यहुदी धर्माचें घटस्फोट हें आदितत्त्व आहे असेंहि तत्त्व एक सासून घराण्यांतील तरुण ज्ञानकोशकारांपुढें मांडूं लागला. बेने इस्त्रायल काळे म्हणून जर या नव्या यहुदींस नकोत तर मग हिंदुस्थानांतील एकाद्या जातींत लग्न करण्याची गोष्ट दूरच आहे. कलकत्त्यांतील एका बेने इस्त्रायल खाणावळवाल्याचे दोन मुलगे कलकत्त्यांत वाढल्यानें त्यांनां त्यांची मराठी भाषा येत नव्हती. मराठी येत नाहीं म्हणून त्या मुलांनीं कोंकणांतील मुली न करतां कलकत्त्यांतीलच कराव्यात असें मनांत आणलें, परंतु कलकत्त्यांत मागाहून आलेल्या म्हणजे गोर्या यहुदी लोकांच्या मुलींतून बायका मिळविणें त्यांनां अत्यंत दुर्घट झालें. मोठ्या कष्टानें एका कुटुंबांतल्या दोन मुली बहिणीबिहिणी या दोन भावांनीं आपल्या बायका करून घेतल्या. पुढें या विवाहाचा परिणाम असा झाला कीं ह्या दोन मुलींनां त्यांच्या गोर्या यहुदी जातीनें वाळींत टाकलें.
सासून नांवाच्या गृहस्थांनीं आपल्या जातीच्या मदतीसाठीं ज्या मोठ्यामोठ्या देणग्या देऊन ठेवल्या आहेत व जे धर्मादाय काढले आहेत त्यांचा फायदा बेने इस्त्रायल लोकांनां फारच थोडा दिला जातो. कारण काय तर बेने इस्त्रायल हे मागून आलेल्या यहुदी लोकांपेक्षां काळसर वर्णाचे आहेत. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे बेनें इस्त्रायल लोक आणि बगदादहून आलेले नंतरचे यहुदी लोक यांचे संबंध इंग्रज आणि नेटिव्ह ख्रिस्ती यांच्या संबंधाप्रमाणें जवळ जवळ आहेत. कोचीन येथें ज्यू लोकांतच काळी आणि गोरी अशा दोन जाती आहेत. गोरी जात काळ्या जातीला तुच्छतेनें वागविते.