प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १ लें.
भारतीय संस्कृतीवर बाह्यांचा परिणाम.- या ठिकाणीं असा प्रश्न कोणी करील कीं, जर हिंदुस्थानची स्थिति वर वर्णिल्याप्रमाणें आहे तर हिंदुस्थानांत येऊन राहणार्‍या लोकांसंबंधाचा प्रश्न इतक्या विस्तारानें विचारांत घेण्यापासून फायदा काय होणार? या प्रश्नाच्या उत्तरार्थ येवढें सांगून ठेवणें पुरे आहे कीं देशांत येणारांच्या संबंधानें लोकांनीं विचार करण्यास लागावें असें म्हणण्यांत आमचा हेतु असा आहे कीं हिंदुस्थानची भवितव्यता अमुकच प्रकारची होईल अशी कल्पना करतांना आपण फार सावध राहिलें पाहिजे. हिंदुस्थानच्या राष्ट्रीकरणाकडे आपण लक्ष्य देऊं तेव्हां देशांत असलेल्या साधक बाधक गोष्टींकडे आपण फार सावधानतेनें पाहिलें पाहिजे. पहिल्यापासूनच आपण अशी काळजी घेतली पाहिजे कीं, राष्ट्रीकरणाच्या मार्गावर पाऊल टाकून आपण पुढें चालूं लागलों असतां आपल्या मनांतील उद्दिष्ट साध्य होण्याच्या आड कांहीं विशेष विघ्नें येऊन आपलें राष्ट्रीकरणाचें कार्य अवघड होऊं नये. आमचें म्हणणें असें कीं, हिंदुस्थानांत आपल्या प्रयत्‍नानें एक सर्वसामान्य संस्कृति आपण करूं शकलों (अर्थात् ही संस्कृति शुद्ध महंमदी, शुद्ध हिंदु किंवा शुद्ध पाश्चात्त्य असणार नाहीं तर ही या सर्वांची मिळवणी असणार) तर अशी सर्वसामान्य संस्कृति निर्माण झाल्यावर आपल्या देशांत असा कोणताहि लोकसमूह असूं नये कीं ज्याला या आपल्या उद्दिष्ट संस्कृतीच्या गोटांत आणतां येणार नाहीं. राष्ट्रीकरणाचे प्रश्न सोडवितांना मुख्य जी गोष्ट करावयाची असते ती ही कीं, देशांत जे निरनिराळे समाज असतात त्या सर्वांनां सामान्य असें काय आहे, किंवा सर्वांतच नाहीं असें काय आहे, तें शोधून काढून त्याचा सामान्य संस्कृति निर्माण करण्याच्या कामीं उपयोग करावयाचा असतो. अर्थात् हें काम चांगलें व्हावें यासाठीं आणि सामान्य संस्कृति तयार करण्याचें काम विशेष अवघड होऊं नये एतदर्थ देशांत एकमेकांपासून अगदीं भिन्न असे समाज जितके कमी असतील तितकें सोईचें होतें. उद्यां धाडसी चिनी लोकांचें थवेच्या थवे येथें येऊन राहूं लागले, तर त्यायोगें भारतीय राष्ट्र बनविण्याचें आमचें काम अवघड होईल, कारण चिनी समाज आमच्यापासून महत्त्वाच्या बाबतींत अगदीं भिन्न आहे. ब्रिटिश लोक या अशा भिन्न चिनी लोकांचें आगमन स्वतःच्या देशांत होण्याच्या जरी विरुद्ध आहेत तरी हिंदुस्थानांत त्यांची वस्ती होण्यास उत्तेजन देऊन येथील लोकांत आधींच जी भिन्नता वावरत आहे तिच्यांत भर टाकण्याला ते निश्चितपणें मदत करतील. अठराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं आणि एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीं मराठ्यांशीं केलेल्या पहिल्या युद्धानंतर प्राप्त झालेल्या साष्टी बेटांत चिनी लोकांची वसाहत करविण्याचा ईस्ट इंडिया कंपनीचा विचार होता ही गोष्ट इतिहासांत नमूद आहे. कंपनीचा हा बेत साधला नाहीं ही गोष्ट वेगळी. मद्रासेकडे तर गुन्हेगार चिनी लोकांची वसाहत स्थापितहि झाली होती, आणि चिनी-तामिल या नांवाची नवी संकरजाति आज तेथें दिसत आहे ती या वसाहतीमुळेंच उत्पन्न झालेली आहे. कलकत्त्यांत पुष्कळ चिनी लोक आज चांभाराचा धंदा करीत आहेत. हे कलकत्त्यांत येणारे चिनी लोक बहुधा एकटे येतात आणि येथें हिंदी-ख्रिस्ती बायकांशीं लग्नें करतात असा मजकूर कांहीं वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाला होता तो खरा असेल तर ही एक गोष्ट राष्ट्रीकरणदृष्ट्या आम्हांला सोईची आहे व या गोष्टीमुळें चिनी लोकांची आमच्या देशांतील वस्ती आमच्या ध्येयाला विशेष अपायकारक होणार नाहीं असें म्हटलें पाहिजे.

परंतु चिनी लोक आणि दुसरे अल्पसंख्याक समाज जे आमच्या देशांत येऊन राहतात त्यांच्या संबंधानें एक अडचणीची गोष्ट उपस्थित होते कीं, आजच्या परिस्थितींत हे सर्व बाह्य लोक आमची देशी संस्कृति आणि विचारपरंपरा दुर्बल करण्याचा प्रयत्‍न करतात. आज जर हिंदुस्थानांत देशी राजाचें राज्य असतें तर येथें वस्तीस आलेल्या बाह्य लोकांकडून आमच्या संस्कृतीला बाधा पोंचली नसती. कित्येक शतकांपूर्वी सीरियन् ख्रिस्ती लोक येथें आले ते येथें स्वराज्य असल्यामुळें पोषाख, राहणी, भाषा या सर्व बाबतींत हिंदीच बनून गेले आहेत. कोचीन आणि त्रावणकोर येथें सामान्य हिंदु आणि सीरियन ख्रिश्चन माणसें, विशेषेंकरून बायका, हीं इतकीं सदृश दिसतात कीं अमकी बाई ख्रिस्ती आहे अगर हिंदु आहे हें एकाएकीं ओळखतां येत नाहीं. कित्येक शतकांपूर्वीं यहुदी लोक दक्षिणेंत आले ते आज मराठीच बोलतात, मराठीच लिहितात, त्यांची  धार्मिक गीतेंहि मराठींतच आहेत. एवढेंच नव्हे तर महाराष्ट्रीय वाङ्मयसूचीवरून हें स्पष्ट होईल कीं या लोकांनीं कित्येक काव्यें व नाटकें लिहून मराठी वाङ्मयांत भर टाकलेली आहे. भाषेप्रमाणें ह्यांच्या स्त्रिया पोषाखाच्या बाबतींतहि हिंदू झाल्या आहेत. बेने इस्त्रायल (यहुदी) स्त्री व हिंदु स्त्री यांत फरक एवढाच दिसतो कीं हिंदु स्त्रीच्या कपाळावर कुंकूं असतें व यहुदी स्त्रीच्या नसतें. पार्श्यांचीहि गोष्ट थोडीफार यहुदी लोकांसारखीच आहे. गुजराथी ही त्यांनीं आपली भाषा म्हणून स्वीकारली आहे, हिंदु देवातांनां ते नवस करतात, लग्न वगैरे संस्कारांच्या बाबतींत ब्राह्मणाजवळून मुहूर्त वगैरे काढतात. गायकवाडींतील कांही पारशी मराठेशाही पागोटें घालतांना आढळतात. त्यांच्या स्त्रिया शुभ प्रसंगीं कुंकू लावतात व त्यांच्या लग्नांत जरी ब्राह्मण पुरोहित लागत नसले तरी त्यांचे विवाहमंत्र पुष्कळसे संस्कृत असतात. गोमांसहि त्यांनीं टाकलें आहे व गोरक्षणचा पुरस्कार करणार्‍या मंडळींत शेट जसावाला यांसारखे कांहीं पारशीहि आहेत. ही स्वराज्याच्या दिवसांत येथें येऊन राहिलेल्या बाह्य लोकांची गोष्ट झाली.