प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
चिनी.- आतां चिनी लोकांची गोष्ट घेऊं. हे चिनी लोक हिंदी लोकांप्रमाणें वागण्याचा कितपत प्रयत्न करतात? मुळींच करीत नाहींत म्हटलें तरी चालेल. सत्ताधारी लोकांचा पोषाख आणि चालीरीती यांनांच ते जवळ करतात असें दिसतें. क्षुल्लक फायद्यासाठीं ख्रिस्ती पंथ किंवा दुसरा कोणताहि पंथ पत्करावयास ते मागेंपुढें पहात नाहींत. हिंदी लोकांचें अनुकरण करणें हें चिनी लोकांनां आज फायद्याचें नाहीं म्हणून ते त्या भानगडींत पडत नाहींत. वेस्ट इंडीज बेटांत किंग्स्ले नांवाचे एक गृहस्थ राहिले होते. त्यांनीं आपला असा अनुभव लिहून ठेवला आहे कीं, चिनी पूरूष आपली बायाको चर्चमध्यें पाठवितो ती केवळ नवी टूम (फॅशन) म्हणून पाठवितो. आज चिनी पुरुष इंग्रजी हॅट घालतात व पुष्कळ चिनी बायका यूरोपियन तर्हेचा पोषाखहि करतात. ही आजची गोष्ट झाली. कांहीं दिवसांनीं आपल्या नव्या लोकराज्याविषयीं चिनी लोकांनां अभिमान वाटेल. हें त्यांचें लोकराज्य दिवसानुदिवस बलिष्ठ होत जाऊन अभिमान वाटण्याजोगें होईल आणि मग हे चिनी लोक आज आम्हांला कित्येक यूरोपियन राष्ट्रांचे लोक वागवितात त्याप्रमाणें तिरस्कारानें वागवितील. ते हिंदुस्थानांत राहतील पण मनानें हिंदुस्थानचे नागरिक असें स्वतःला समजणार नाहींत, तर आपल्या लोकराज्याचेच नागरिक राहून हिंदुस्थानांत नेहमीं परक्यांप्रमाणें वागतील. आतांपर्यंत या ज्या गोष्टी सांगितल्या या उद्यां होणार्या गोष्टी आहेत व म्हणून आजच्या राजकारणांत त्यांचा विचार करण्याचें विशेष कारण नाहीं. तरी पण उद्यांच्या होण्यासारख्या गोष्टी म्हणून त्या आम्हीं ध्यानांत ठेवणें बरें. चिनी लोकांची काम करण्याची ताकद अमेरिकन लोकांपेक्षांहि अधिक आहे. चीन देशांत मजूरवर्गाची लोकसंख्या फार मोठी आहे. हिंदुस्थानांत कुशल कारागिरांचा तुटवडा आहे. आमचे कारागीर लोक स्वभावतः आळशी असतात. या सर्व गोष्टी लक्षांत घेतल्या आणि हिंदुस्थान व चीन देश हे एकमेकाला लागून आहेत ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे हिंदुस्थानांत वस्तीला येणार्या चिनी लोकांची संख्या यापुढें वाढत जाणार हें आपल्यास कळून येईल. असेंहि संभवनीय दिसतें कीं, चिनी लोक हे आमच्या देशांत कायमचीच वस्ती करून राहणारे होतील. असें झाल्यास आमच्या राजकारणांत अनेक अल्पसंख्याक समाज ज्या धोरणांनें वागतात त्या धोरणानें तेहि वागण्याचा संभव आहे. एकमुखी अनियंत्रित सत्ताधारी सरकार असलेल्या देशांत अल्पसंख्याक समाज नेहमीं सत्ताधारी लोकांशीं संगनमत करतात आणि आपल्या समाजासाठीं विशेष हक्क मिळावे म्हणून देशांतील बहुसंख्याक जनतेपासून अलग राहण्याचा प्रयत्न करतात. हें अल्पसंख्याकांचें सामान्य धोरण चिनी लोकहि पतकरतील यांत नवल नाहीं.