प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
उदारमतवाद आणि स्त्रीस्वातंत्र्य.- उदारमतवादाचा उपयोग स्त्रियांची स्थिति सुधारण्याकडे आणि त्यांस नागरिकत्वाचे हक्क अधिकाधिक देण्याकडे झाला. तथापि या उदारमतवादास समाजाची थोडीशी मान्यता जी मिळाली ती केवळ त्या मताच्या गोजिरवाण्या स्वरूपामुळें मिळाली नाहीं. पुष्कळ लोकांस असें वाटत असे कीं, व्यक्तींस कार्य करण्यास अधिक अवकाश मिळाला म्हणजे त्यांची उन्नति होते, आणि ती उन्नति राष्ट्रास हितावह आहे. पुरुषांच्या अस्तित्वभावनेंत आपलें अस्तित्व विसरून जाण्यापेक्षां आपल्या अस्तित्वाची स्त्रियांस अधिक जाणीव झाली म्हणजे स्त्रियांच्या अंगीं पुरुषांप्रमाणेंच आपण नागरिक आहो. केवळ पुरुषांची घटकाभर करमणूक करण्यासाठीं चित्रविचित्र रंगाचे कपडे धारण करणार्या पाकोळ्या आपण नाहीं, अशी भावना उत्पन्न होईल व त्यांच्या अंगीं देशाभिमान अधिक वाढेल. स्त्रिशिक्षण इंग्लंडमध्यें जरी फारसें नाहीं तरी अमेरिकेंत पुष्कळच आहे. स्त्रियांच्या शिक्षणांत हा जो फरक झाला आहे तो केवळ शिक्षण हें स्त्रियांची उन्नति करणारें आहे म्हणून झालेला नाहीं. स्त्रियांस मास्तरणीची जागा हें एक पोटाचें साधन झालें असल्याकारणानें आणि प्रत्येक स्त्रीस मी लग्न होण्याच्या बाबतींत वगळली जाईन कीं काय अशी भीति वाटत असल्यामुळें स्त्रिशिक्षण थोडेंसें अधिक सरसावलें. संपन्न घराण्यांतील स्त्रिया शिक्षणाच्या भानगडींत पडत नाहींत. एवढें मात्र खरें कीं आजच्या संपन्न घराण्यांतल्या बायका पूर्वींच्या बायकांपेक्षां अधिक सुशिक्षित आहेत.
स्त्रियांचा आयुष्यक्रम सुखावह करणार्या सर्व चळवळी स्त्रियांस अधिक व्यापक कार्यक्षेत्र असावें या बुद्धीनें झाल्या नाहींत. स्त्रियांच्य आयुर्नियमनांत फरक पडत आहे तथापि स्त्रीस्वातंत्र्याची आवड लोकांत वाढली आहे असें मात्र नाहीं; आणि जोंपर्यंत कांहीं नैसर्गिक नियम स्त्रीस्वातंत्र्याच्या आड येत आहेत तोंपर्यंत स्त्रीस्वातंत्र्य अशक्य आहे. पाश्चात्त्य देशांतील लोकांस स्त्रीस्वातंत्र्याची आवड अधिक आहे असें दिसत नाहीं. हिंदुस्थानांतील पुरुषांमध्यें जे मनोधर्म आहेत तेच त्यांच्यांतहि आहेत. तथापि आपणांस बायका कशा पाहिजेत याविषयींच्या अभिरूचींत फरक आहे. स्त्रिया ह्या पुरुषांच्या दृष्टीनें अत्यंत उच्च प्रकारचीं पाळींव जनावरें होत, असें विधान बहुतेक सर्व प्रकारचीं राष्ट्रें पाहून करण्यास हरकत नाहीं असें वाटतें. कित्येक लोकांस फार ओझें नेण्यास समर्थ असा बैल आवडतो, आणि कित्येकांस जो सजवून झूल घालून आणला असतां सुंदर दिसेल असा बैल आवडतो, कित्येकांस जो तोफा ओढून नेईल असा घोडा पाहिजे, आणि कित्येकांस सर्कशींत रंगणें घालणारा पाहिजे. ज्या तर्हेच्या जनावरांची मागणी लोकांत अधिक त्या तर्हेचीं जनावरें पैदा होतात. आजच्या स्त्रीशिक्षणाची गोष्ट तीच आहे. पूर्वीं लोकांस चार पायली दळण दळील अशी बायको आवडे, आज हारमोनियम वाजवून जी गाणें गाऊन दाखवील असी आवडते. समाजांत स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसंगोपन उत्पन्न व्हावयाचें तें नेहमीं पुरुषांच्या अपेक्षेप्रमाणें उत्पन्न व्हावयाचें. पुरुषांचें शिक्षण कसें असावें याचें नियमन आर्थिक, शासनविषयक, आणि परस्पर राष्ट्रव्यवहारविषयक परिस्थितीप्रमाणें होतें, आणि बायकांचें शिक्षण बहुतेक देशांत पुष्कळ अंशीं आर्थिक परिस्थितीप्रमाणें असतेंच, उदाहरणार्थ कांहीं बायकांस मोलमजूरीचें, कांहीं बायकांस जातीप्रमाणें कपडे शिवण्याचें, धोबीकामाचें अगर चांभारकामाचें शिक्षण लहाणपणापासून मिळतें. ज्या बायकांस पोटाकरितां काम करावें लागत नाहीं असा वर्ग पांढरपेशा बायकांचा होय. त्या वर्गांतल्या बायकांचें शिक्षण आणि संगोपन जें व्हावयाचें तें त्यांस एक तर सभ्य रीतीनें पोट भरतां यावें या हेतूच्या सिद्धीसाठीं, अगर पुरुषांस रुचेल असा घांस स्त्रियांस कसें बनवावें या हेतूनें व्हावयाचें असतें. पुरुषांच्या अभिरुचीप्रमाणें स्त्रियांचें आचारस्वरुप बदलतें असें म्हटलें यावरून पुरुषांस अधिक उपयोगी आणि सुखावह असे गुण स्त्रियांमध्यें येऊं पहातात असें मात्र नाहीं. ज्या गोष्टी सहज दिसून येतात त्याच गोष्टी स्त्रियांमध्यें लौकर शिरतात. ग्रांथिक शिक्षण स्त्रियांस जें देण्यांत येतें तें देखील उपयोगाच्या दृष्टीनें दिलें न जातां पुरुषांच्या डोळ्यांत चटकन भरेल अशा स्वरूपाचें दिलें जातें. बाजारांत माल विकला जातो त्यांत टिकाऊ मालापेक्षां दिखाऊ मालच चटकन खपतो, त्याप्रमाणेंच स्त्रीशिक्षणाची गोष्ट आहे. हिंदुस्थानांत स्त्रियांच्या अंतःकरणाची ओळख करून घेण्याची संधि नसल्यामुळें, येथें बाहेरून दिसणार्या गुणांच्या योगानें वधूपरीक्षण करण्याची प्रवृत्ति इंग्लडपेक्षां अधिकच असावयाची. अमेरिका, इंग्लंड वगैरे पाश्चात्त्य देशांत वैवाहिक प्रश्नासंबंधानें विचार करणार्या तरुणांच्या मनांत ही मुलगी किती परीक्षा पास झाली आहे हा विचारच येत नाहीं. हिंदुस्थानांत कित्येक पुरुष, मॅट्रिकच्या सर्टिफिकिटावरच खूष होतात आणि एखादी मुलगी मॅट्रिकची परीक्षा पास झाली असली म्हणजे तिचें लग्न होणें सोपें होतें.
मॅट्रिकची परीक्षा पास झालेल्या मुलीपेक्षां जिला खरोखर उपयुक्त असें शिक्षण मिळालें असेल अशी कमी शिक्षणाची पण जी शिकली आहे असें लोकांस दाखवितां येईल अशी मुलगी मिळविण्याकडे काहीं लोकांची प्रवृत्ति असावयाचीच आणि त्या वृत्तीचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर व्हावयाचाच. स्त्रियांचें भवितव्य फायदेशीर लग्नावर अवलंबून असल्याकारणानें स्त्रियांचें शिक्षण अगदीं स्वतंत्रपणें होणें शक्य नाहीं. येथें स्त्रीशिक्षणावर व्याख्यान करण्याचा इरादा नाहीं तथापि एवढें मात्र सांगितलें पाहिजे कीं, स्त्रियांच्या आयुर्नियमनांत जी सुधारणा होते ती इतर गोष्टींपेक्षां पुरुषांची अभिरुचि सुधारल्यानेंच अधिक होते.
पाश्चात्त्य देशांत स्त्रियांचें आचरणस्वरूप गेल्या साठ वर्षांत पुष्कळ बदललें आहे, तथापि तें बदलण्याचें मोठें कारण म्हणजे स्त्रियांची उन्नति करावी हें ध्येय नसून बदलेली आर्थिक परिस्थिति आणि पुरुषांची बदललेली अभिरुचि हीं मुख्य कारणें आहेत. तसेंच स्त्रियांचें आयुष्य पाश्चात्त्य देशांत जें अधिक सुखावह आहे त्याचें कारण बर्याच अंशीं पाश्चात्त्यांचें दाक्षिण्य होय. हें दाक्षिण्य दुर्बलांविषयीं अनुकंपेच्या भावनेनें झालें असो, अगर स्त्रीसौंदर्य व तारुण्य यांच्या उपासनेमुळें असो, स्त्रियांचें आयुष्य त्यामुळें समाजांत अधिक सुखावह होतें खास.