प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
राष्ट्रधर्मसंस्थापना.
जगद्विकासाची दिशा समजून घेतल्यानंतर भारतीय समाजसंबंधानें आपणांस व्यवहारनीति ठरवावी लागते. पुढें मागें सर्व जग मिळून एक समाज होणार, त्याची ज्ञानपरंपरा एकच होणार म्हणजे जगांतील सर्व समाजांनां जवळजवळ एकतर्हेचें स्वरूप येणार हें आपण ठरविलें. आपणांस आतां हें पाहिलें पाहिजे कीं, आपण जगाच्या बरोबर सहकार्य करण्यास कसे समर्थ होऊं? आपले व सर्व जगाचे व्यवहार यांची जुळणी कशी करून घ्यावयाची? हे प्रश्न सोडविण्यासाठीं आपणांस अनेक बाबतींत कार्य करावयाचें आहे.
आपल्यापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हटला म्हणजे सामाजिक होय. आपणांस जगाच्या इतर लोकांशीं जगाचा एक अवयव या नात्यानें सहकार्य करावयाचें म्हणजे वाटेल तो मनुष्य वाटेल त्या देशांत गेला तरी त्या देशाचें आणि त्या देशाच्या जनतेचें नागरिकत्व मिळण्याची संधि त्यास मिळली पाहिजे अशी स्थिति उत्पन्न करावयाची. आपले लोक इतर देशांत गेले तर त्या लोकांस जगानें समतेनें वागवावें यासाठीं आपण धडपडतों, चळवळी करतों, तर परकीय लोकांस आपल्या समाजाचें सदस्यत्व देण्यास आपण काय खटपट केली आहे याचा विचार आपणांस पाहिजे. आपणांस आपल्या संस्कृतीस जितकी अधिकाधिक एकरूपता आणतां येईल म्हणजे आपणांस जितके राष्ट्रीय आचार उत्पन्न करतां येतील तितकें परकीयांस भारतीयत्व ग्रहण करणें सोपें जाईल.
भारतीयांस जगांतील इतर राष्ट्रांप्रमाणें एकराष्ट्र ही पदवी उत्पन्न करून घेण्यास जें काय केलें पाहिजे तें येणेंप्रमाणें.
(१) देशांतील समाजास एकरूपता यावी म्हणून राष्ट्रधर्म संवृद्ध केला पाहिजे.
(२) देशांतील लोकांचें राजकीय बल वाढविलें पाहिजे.
(३) देशांतील निरनिराळ्या संस्कृतींस एकरूपता यावी म्हणून त्या संस्कृतींत राहणार्या जातींस आणि राष्ट्रांस राष्ट्रधर्माचें शिक्षण दिलें पाहिजे.
(४) देशांतील सर्व लोक ज्या सामाजिक योजनेनें एकत्र होऊं शकतील अशी सामाजिक योजना अथवा धर्मशास्त्रीय सिद्धांत प्रसृत झाला पाहिजे.
समाजास एकरूपता येण्यासाठीं अवश्य असणारी दृढीकरणाची क्रीया मागें सामान्यतः वर्णिलीच आहे. येथें त्या क्रियेच्या आर्थिक स्वरूपाकडे विशेष लक्ष देण्याचें योजिलें आहे.