प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
आर्मीनियन.- पार्शी लोकांनंतर आर्मीनियन लोकांची स्थिति पाहतां हे लोक ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपूर्वीं कित्येक वर्षें येथें वस्तीला असूनहि आज ते सर्वस्वी इंग्रजरूप होण्याच्या प्रयत्नांत आहेत. पुष्कळ आर्मिनियन लोक घरीं इंग्रजी बोलतात व इंग्रज गृहस्थांची जेवण्याराहण्याची सोय आपल्या घरीं करतात. कलकत्त्यांत एक मोठें व अत्यंत प्रसिद्ध हॉटेल एका आर्मीनियन गृहस्थाचें आहे. बर्याच आर्मीनियन लोकांनीं इंग्रजांशीं लग्नें केलेलीं आहेत. ही लग्नांची संख्या फार मोठी नाहीं तरी हिंदू लोक आणि आर्मीनियन लोक यांच्या मध्यें जितका सामाजिक व्यवहार आहे त्यापेक्षां इंग्रजांचा आर्मीनियनांचा सामाजिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतो ही गोष्ट स्पष्ट करण्यास ही लग्नसंख्या पुरेशी आहे. इंग्रजांनां लागू असणारा कायदा आर्मिनियन लोकांनीं आपला म्हणून मान्य केलेला आहे. असो.