प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १ लें.
ख्रैस्त्यप्रसार. - आतांपर्यंत चिनी, यहुदी, पार्शी आणि आर्मीनियन यांच्या वृत्तीसंबंधानें जें वर्णन केलें आहे त्यावरून हें लक्षांत येईल कीं, या समाजांचें धोरण इंग्रजी संस्कृति स्वीकारावी किंवा आपली स्वतःची संस्कृति धरून ठेवावी अशा प्रकारचेंच असणार. यांपैकीं कोणतीहि गोष्ट त्यांनीं केली तरी देश्य संस्कृतीला त्यापासून फायदा नसून या संस्कृतीचें बळ कमी होणें हा एक त्यांच्या राहणीचा परिणाम होणार आहे. ब्रिटिश लोक या देशांत आपल्या ब्रिटिश संस्कृतीचा पुरस्कार करीत आहेत; व अल्पसंख्याक बाह्यजातीयांचें वर्तन या पुरस्काराला साहाय्यक होत आहे; या दोन गोष्टी तर हिंदी संस्कृतीला अपायकारक आहेतच पण याखेरीज आणखी एक जबरदस्त अपाकारी शक्ति आपल्या संस्कृतीविरुद्ध कार्य करीत आहे. ही शक्ति म्हणजे ख्रैस्त्याचा हिंदुस्थानांत केला जाणारा प्रचार होय. प्रत्येकाला वाटेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्या न ठेवण्याचें स्वातंत्र्य आहे व वाटेल त्या मताचा प्रचार करण्याचें स्वातंत्र्य आहे. हीं तत्त्वें कबूल करूनहि आम्हांला आमच्या देशांत होणार्‍या ख्रैस्त्यप्रचाराविरुद्ध बोलतां येईल. या ख्रिस्तपंथप्रचारानें आमचे देशबंधू देशभावनेला पारखे होतात, आमच्या ज्या जुन्या शिष्टमान्य आचारपरंपरा आहेत त्यांकडे तिरस्कारबुद्धीनें पाहण्याची संवय ख्रिस्तपंथ आमच्या देशबांधवांनां लावतो, या प्रकारच्या हरकती या पंथाच्या प्रचाराविरुद्ध आम्हांला आतांच घेतां येतात. पुष्कळसें ख्रिस्ती झालेले लोक साहेब बनावयास पाहतात. आपला पोषाख टाकून ते परकी पोषाख घेतात. पुष्कळ ख्रिस्ती कुटुंबात देशी भाषा बाजूस सारून इंग्रजी भाषेचा घरच्या व्यवहारांत उपयोग करण्याचा प्रचार सुरू झालेला आहे. संताळ वगैरे सारख्या जातींत ख्रिस्ती मिशनरी लोक आपल्या मिशनरी कामासाठीं जातात तेव्हां त्यांच्यामध्यें रोमनलिपीचा प्रचार करण्याचा यत्‍न करितात. हेतू हा कीं, ख्रिस्ती वाङ्मय त्यांच्या भाषेंतून त्यांनां शिकवितां यावें. मिशनर्‍यांच्या या चळवळीचा परिणाम असा होईल कीं, आमच्यांतील कांहीं लोक रोमन लिपी लिहावयास शिकतील व या लिपीचीच त्यांनां संवय लागून आमच्या देश्य लिपीचें संख्याबल कमी होईल. गोव्यामधील ख्रिस्ती लोकांनीं आपल्या कोंकणी मराठी भाषेंत पोर्तुगीज आणि लॅटिन् शब्द मिसळून व ही भाषा लिहिण्याला रोमन लिपीचा उपयोग करून आपल्यापुरती एक नवीनच उपभाषा निर्माण केली हें प्रसिद्ध आहे. असो.

आपल्याला हिंदुस्थानांत जी समाजिक व आर्थिक उन्नति घडवून आणावयाची आहे त्या उन्नतीच्या कार्यासाठीं जें मुख्य काम आपणाला करावें लागणार आहे तें हिंदुस्थानांत असलेल्या निरनिराळ्या संस्कृतींचें एकीकरण होय. या एकीकरणानें जी नवीन संस्कृति उत्पन्न करावयाची तिचें स्वरूप ठरवितांना हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, हिंदी लोकांनां सर्वतोपरी पाश्चात्त्य रूप देणें हें केवळ अवघडच नव्हे तर अशक्य कोटींतलें आहे. अर्थात् येथील देश्य भाषा रक्षण केल्या पाहिजेत. त्या नाहींशा करून टाकतां उपयोगी नाहीं व असें करणेंहि शक्य नाहीं. या देशांत येथील भाषाच प्रमुखतेनें प्रचारांत असल्या पाहिजेत. अर्थात् ख्रिस्ती मिशनरी लोक वर सांगिल्याप्रमाणें भाषांच्या कामांत जी अनवस्था उत्पन्न करूं पाहत आहेत तिला कायद्यानें किंवा जोरदार लोकमत उत्पन्न करून प्रतिबंध केला पाहिजे.

येथें जे बाह्य लोकांचे अल्पसंख्याक समाज आहेत व जे परकीय उपासनासंप्रदाय आहेत त्यांचे आपल्या देश्य समाजावर होणारे परिणाम कोणत्या उपायानें टाळतां येतील, आमच्या राष्ट्रीयवृत्तींत हे पंथ व समाज जे दोष उत्पन्न करूं पाहत आहेत ते उत्पन्न होण्याचें टाळण्यास काय उपाय योजणें जरूर आहे, या प्रश्नांचा विचार करतां आम्हांला जो उत्तम उपाय सुचतो तो हा कीं प्रांतोप्रांतीं आमच्या ज्या देश्य भाषा आहेत त्यांचें सामर्थ्य आम्हीं वाढवावें आणि हें सामर्थ्य वाढण्यासाठीं जरूर ते सामाजिक आणि राजकीय फरक आम्ही घडवून आणावे.