प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १ लें.
देश्य आणि परकीय संस्कृतींचें द्वंद्व.- जर एखाद्या देशांत परकीयांचा अंमल सुरू झाला तर मात्र देश्यांच्या संस्कृतीनें जो समाज निर्माण झालेला असेल त्या समाजाचे अंशभूत हे परकी जेते लोक होऊन राहणें फारसें संभवनीय नसतें. देश्यांच्या चालीरीती ह्या परक्यांकडून उचलल्या जाण्याचा संभव फार कमी असतो. देश्य संस्कृति बलिष्ठ नाहीं अशा स्थितींत त्या संस्कृतीचें सामर्थ्य कमी कमी करण्याचा प्रयत्‍न करणें आणि आपल्या संस्कृतीचें सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्‍न करणें हेंच त्या देशांत शिरलेल्या परकीयांचें धोरण होतें. जर देश्य संस्कृतीमध्यें फार प्रकार असतील किंवा जर देशांत भिन्न भिन्न संस्कृती वास करीत असतील तर अशा देश्य संस्कृतीचें बळ परकीयांच्या सान्निध्यानें पुष्कळच कमी होतें. परकीय संस्कृतीचें लोक वरील प्रकारच्या भेदपूर्ण देशांत थोडे जरी असले तरी त्याचां देशांत वरचष्मा होतो. या परकीयांनीं देश्य संस्कृति स्वीकारण्याच्या आड जी एक गोष्ट येते ती म्हणजे त्या संस्कृतींतील नाना प्रकार व भेद यांचें अस्तित्व होय.

हे परके लोक त्यांनीं आणलेल्या बाह्य संस्कृतीचे जर जोरदार पुरस्कर्ते नसतील तर जेते असूनहि ते देश्यांची संस्कृती कदाचित् पत्करतील. बाहेरून आलेल्या जेते लोकांनीं देश्यांची संस्कृति स्वीकारल्याचीं उदाहरणें आपल्या इतिहासांत सांपडतात तीं शक आणि हूण लोकांचीं होत. हे लोक हिंदु समाजांत अगदीं मिसळून गेले आहेत.

बाह्यांचे जे अल्पसंख्याक समूह येथें आले त्यांचा आपल्या देशावर काय काय परिणाम झाला त्याचीं उदाहरणें पुढें देणार आहों. येथें आतां मुसुलमानी संस्कृतीचा इतिहास विचारांत घेऊं.

आठव्या शतकांत अरब मुसुलमानांची जी स्वारी हिंदुस्थानावर झाली तिचा हिंदु संस्कृतीवर फारसा परिणाम न झाल्यानें ती फारशी विचारार्ह नाहीं. मुसुलमानी संस्कृति जी हिंदुस्थानांत आली ती अकराव्या शतकांत आली. या काळापासून १७ व्या शतकाच्या अखेरीपावेतों मुसुलमान संस्कृतीचा जोर वाढत होता. हिंदुस्थानांतील जुन्या संस्कृतीचा नाश करण्याचेंच काम मुसुलमानी संस्कृतीनें केलें. अठराव्या शतकांत मुसुलमानी सत्ता लयास गेली. मुसुलमानी सत्तेच्या नाशाला जे लोक कारणीभूत झाले त्यांत मराठे, शीख आणि इंग्रज हे प्रमुख होत. इंग्लंडांतील लोकांनीं शेवटीं हिंदुस्थान जिंकला आणि येथें देश्य भाषांनां बाजूस सारून त्यांच्या जागीं इंग्रजी भाषेचा अभ्यास लोकांकडून करवून इंग्रजांनीं या देशांत ब्रिटिश संस्कृति लादण्याचा प्रयत्‍न चालविला आहे. हिंदुस्थानाला ब्रिटिश लोक आंग्लरूप करून टाकतील हें संभवनीय नाहीं; तथापि त्यांनीं आपल्या बाह्य संस्कृतीच्या रोपा येथें लावण्याचा जो प्रयत्‍न चालविला आहे त्या त्यांच्या प्रयत्‍नाचे जे महत्त्वाचे परिणाम आहेत त्यांकडे लक्ष दिलें पाहिजे. त्याचप्रमाणें आपल्या देशांत ज्या अल्पसंख्याक परकीय जाती राहिलेल्या आहेत व रहात आहेत त्यांचे हिंदी संस्कृतीवर काय परिणाम झाले आहेत व होत आहेत हेंहि आपण लक्षांत घेतलें पाहिजे.

ब्रिटिश संस्कृतीचें हिंदुस्थानांतील वर्चस्व आणि या वर्चस्वाचा व ब्रिटिश राजसत्तेचा संबंध यांचा साकल्यानें विचार पुढें करूं. हिंदुस्थानांत इतर ज्या लहान लहान टोळ्या येऊन राहिल्या त्यांच्या सान्निध्याचा येथील संस्कृतीवर काय परिणाम झाला त्याकडे सध्यां लक्ष देऊं. देशांत येऊन वस्ती करणारांसंबंधानें आम्ही फारच थोडा विचार करतों. देशांतून बाहेर जाणारे जे आमचे नातेवाईक आहेत त्यांचा-विशेषतः त्यांनां परदेशांत ज्या रीतीनें लोक वागवितात त्या रीतीचा-विचार आमच्याकडून जितका होतो तितका आमच्या येथें येऊन राहणार्‍यांसंबंधींचा होत नाहीं.