प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
लोकहित.- आतां लोकांनां जे फायदे होतील ते पाहूं. एकतर एका प्रांतांतील लोकांमध्यें परस्परांचें म्हणणें सर्वांना नीट समजून सलोखा अधिक उत्पन्न होईल व त्यायोगें सर्वांचे पुष्कळ हित होईल. दुसरें, हिंदुस्थानच्या भाषांची अधिक काळजी घेतली जाईल व त्यायोगें त्यांची वाढ नीट होईल. तिसरें देशी भाषांच्या द्वारा शिक्षण देण्याची व्यवस्था अधिकाधिक झाल्यानें उच्च शिक्षण देणार्या संस्थांचा फायदा घेणारे लोक अधिकाधिक निघतील व त्यायोगें लोकमाजाचें पाउल जोरानें पुढें पडत जाईल.
देशाचे राजकीय विभाग चांगल्या तत्त्वावर केले जातील व देशीभाषांनां योग्य तें स्थान दिलें जाईल तेव्हांच सर्व देशाला सामान्य अशा राष्ट्रीय संस्कृतीची इमारत बांधावयाला आरंभ झाला असें होईल. पाश्चात्त्यांपासून ज्या शास्त्रीय शोधांचा फायदा आपण घेणार ते शोध आपल्या लोकांनां परिचित करावयाचे तर त्यांच्या मातृभाषांच्या द्वाराच हें काम झालें पाहिजे. देशभाषांचा दर्जा जसा आपण वाढवूं तसे देशांतील बहुसंख्याक लोक महत्त्वाला चढतील. राजकीय दृष्टीनें आणि सामाजिक दृष्टीनें देशांतील बहुसंख्याक लोक महत्त्वाला चढतील. राजकीय दृष्टीनें आणि सामाजिक दृष्टीनें देशांतील बहुजनसमाज आपलें स्वत्व प्रस्थापित करून लागला म्हणजे देशांत राहणीचा सारखेपणा वेगानें वाढत जाईल आणि जी एक सामान्य राहाणी म्हणून ठरेल ती देशांतील अल्पसंख्याक लोकहि बहुतांशानें स्वीकारतील. असें झालें म्हणजे देशांतील आर्थिक संबंध बदलतील व त्यांची पुनर्घटना करावी लागेल अथवा दुसर्या शब्दांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे आज जें अर्थशास्त्र जातवारीनें बांधलें आहे त्याच्या जागीं भारतीय अर्थशास्त्राची उभारणी होऊन नव्या आर्थिक युगाला आरंभ होईल.
वर वर्णन केलेल्या विकासास अधिक त्वरित गति देण्यासाठीं राष्ट्रीकरणाचें व्यावहारिक स्वरूप समजलें पाहिजे. दोन विविध संस्कृती नष्ट होऊन तिसरी संस्कृति उत्पन्न होईल किंवा एक संस्कृति दुसर्या संस्कृतिस आत्मसात् करून सर्वांस सामान्य अशी एक संस्कृति देशांत उत्पन्न होईल हा प्रश्न भवितव्याच्या काळोखांत लपला गेला आहे. राष्ट्रीकरण किंवा एकसंस्कृतिकरण साममूलक नसून दंडमूलक आहे. याचा अर्थ असा नव्हे कीं जें काय एकीकरण होणार तें रक्तपातामुळेंच उत्पन्न होईल, तर दोन बाजूच्या लोकांनीं तडजोडीनें तुमचें काय ठेवावयाचें व आमचें काय ठेवावयाचें या विषयींचा तहनामा करून सामान्यचार उत्पन्न करावयाचे हि कल्पना यश पावणें अशक्य आहे. जें काय शक्य दिसतें तें हें कीं दोन समुच्चयांपैकीं प्रत्येक समुच्चयाच्या संस्कृतीच्या ज्या अंगास अधिक बल असेल तें त्या समुच्चयाच्या संस्कृतीचें अंग टिकेल आणि विरुद्ध संस्कृतीचें तत्सदृश अंग विलयास जाईल. तसेंच जो समाज अधिक बलवान् त्याचीं अधिक अंगें टिकतील. म्हणजे नवसंस्कृतींत जीं पूर्वसंस्कृतीचीं अंगें शिल्लक राहतील तीं संग्रामांतर्गत बलामुळें टिकून राहतील.
तडजोडीचा संप्रदाय उत्पन्न होऊन तो कधीं कधीं मूलभिन्न समुच्चयांच्या संस्कृतींचें एकीकरण करूं पहतो पण त्यास देखील प्रत्येक संस्कृतीवर छाप टाकण्यासाठीं झगडावेंच लागतें.
उदारमतवाद.- संस्कृतीच्या एकीकरणाचीं वरील तत्त्वें लक्षांत घेऊन आपलें कर्तव्य काय ठरतें तें पाहूं. दोन समुच्चयांच्या ठिकाणीं राष्ट्ररूपी एक समुच्चय उत्पन्न करावा या इच्छेनें जो उपदेश हिंदुस्थानांत न्यायमूर्ति रानड्यासारख्या विद्वान् गृहस्थांनीं प्रसृत केला तो ज्या एका वाक्यांत सांठविला आहे असें “मी हिंदु नाहीं, मी मुसुलमान नाहीं, मी हिंदी आहे” हें उदारमताचें वाक्य होय.
राष्ट्रीकरणाचा यापेक्षां निराळा मार्ग रामदासांनीं उपदेशीला. “मराठा तेवढा मेळवावा आणि महाराष्ट्रधर्म वाढवावा” हें रामदासांचें वाक्य वारंवार उच्चारिलें जातें. त्या उपदेशाचा थोडक्यांत अर्थ म्हटला म्हणजे सदृश समाज एकत्र करावा आणि त्या सदृश समाजाचें सादृश्य इतरांवर लादावें. राष्ट्रीकरणासाठीं एका समुच्चयास संग्राहक बनलें पाहिजे आणि दुसर्या समुच्चयास संग्राह्य म्हणजे संग्रहणाचा विषय झालें पाहिजे. एका पक्षास आपला समाज वाढविण्याची इच्छा पाहिजे आणि दुसर्या समाजास त्या समाजाच्या समुच्चयांत शिरण्याची महत्त्वाकांक्षा पाहिजे. समाजवर्धिष्णु इच्छेशिवाय जो उदारमतवाद पसरतो तो स्वसमाजनाशक आहे. स्वसमाजवर्धनाची चळवळ जोराची नसतां जेव्हां उदारमतवाद सुरू होतो तेव्हां तो कोणा परक्या जयिष्णु समाजाच्या शिकवणीमुळें सुरू झाला आहे कीं काय इकडे लक्ष दिलें पाहिजे.
उदारमतवाद आपल्या देशांत “सुधारक” नांवाच्या संप्रदायाशीं बराच संलग्न आहे. पूर्वींच्या अनेक रूढींशीं झगडण्यामध्यें या संप्रदायानें आपलें बरेंच बल खर्च केलें आहे, तथापि या संप्रदायाच्या मतांचें ऐतिहासिक स्थान लक्षांत घेऊन विवेचन केलें पाहिजे आणि उदारमतवादानें ज्या मोकळिकी उत्पन्न करण्याची खटपट केली आहे त्यांची राष्ट्रीकरणाच्या तत्त्वाशीं कितपत संगति किंवा असंगति आहे याचा विचार केला पाहिजे.