प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
भाषावार देशविभाग.- आमच्या मतें हिंदुस्थानच्या कारभारांत जो फरक आज अगदीं जरूर झालाच पाहिजे तो या देशाची भाषावार विभागणी हा होय. आज देशाचे जे राजकीय विभाग आहेत ते निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणें सहज घडून आलेले आहेत. ईस्ट इंडिया कंपनी जसा देश काबीज करीत गेली तसा कबजांत असलेल्या मुलखांत नवा मिळालेला मुलूख त्याचाच एक भाग म्हणून अंतर्भूत केला गेला. मुंबई इलाख्याकडेच पाहतां या इलाख्यांत मराठी, गुजराथी, सिंधी व कानडी या चार अगदीं भिन्न भाषा बोलणारे भिन्न भाग सामिल केले गेले आहेत. कानडी भाषा बोलणारे लोक कांहीं मद्रास इलाख्यांत तर कांहीं मुंबई इलाख्यांत वांटले गेले आहेत. मराठी बोलणारा मोठा समाज मुंबई इलाखा, वर्हाड, मध्यप्रांत व निजामचें राज्य या चार ठिकाणीं विभागला गेला आहे.
परवां परवांपर्यंत बंगाली लोक पूर्वबंगाल आणि पश्चिमबंगाल अशा दोन ठिकाणीं विभागले गेले होते व या प्रांतांतून बिहारी व आसामी यांसारख्या भिन्न भाषा बोलणार्या लोकांशीं सरकारनें त्यांची जोड केलेली होती. अशा प्रकारची भाषांनां न मानणारी देशविभागणी सामाजिक हिताच्या दृष्टीनें उपकारक होऊं शकत नाहीं. उलट ही विभागणी पुष्कळशी सहजगत्या घडून आलेल्या कारणामुळें जरी प्रथम ठरली गेली असली तरी ती तशीच कायम ठेवल्यापासून लोकांत असा सकारण समज उत्पन्न होतो कीं, ब्रिटिश सरकारनें ही जी विभागणी केली आहे ती बुद्धिपुरःसर केली असून तिचा हेतु लोकांत भेदबुद्धि माजावी असा आहे.
हिंदुस्थानांत काय किंवा यूरोपीय देशांत काय निरनिराळ्या लोकांमध्यें सामाजिक दळणवळण कमीअधिक होणें हें त्यांच्या भाषेवर अवलंबून असतें. ज्यांची भाषा एक, त्यांच्या भावना व कल्पना पुष्कळशा सारख्या सारख्या असतात. मग ते निरनिराळ्या प्रांतांत रहात असले तरी हरकत नाहीं. मुंबई इलाख्यांत मराठी बोलणारे जे लोक आहेत त्यांची गुजराथ्यांशीं जितकी सहानुभूति असते त्यापेक्षां वर्हाडांतील आणि नागपूर प्रांतांतील मराठी बोलणारांशीं अधिक सहानुभूति असते. हिंदुस्थानांतील जातींची वांटणी पहावी तर तीहि भाषावारीनेंच झालेली दिसते. मराठा जात मराठी बोलणार्या देशांतच सांपडते. मराठी बोलणार्या देशाबाहेर ही जात फक्त बडोदा आणि इंदूर या संस्थानांत सांपडते. पण हीं संस्थानें मराठ्यांचींच आहेत. लोकांच्या राजकीय वृत्ती आणि भावना तपासल्या तर त्याहि भाषेप्रमाणें भिन्न भिन्न आढळून येतात. सामाजिक चालीरीती भाषावारच वांटलेल्या दिसतात, म्हणजे ज्यांची भाषा एक त्यांच्या चालीरीती व राजकीय कल्पना वगैरे सारख्याच असतात. लोकांमध्यें कोणत्याहि तर्हेचा सारखेपणा असणें ह्याला सामाजिकदृष्ट्या पुष्कळ किंमत आहे. या सारखेपणापासून समाजाचें पुष्कळ प्रकारचें हित होतें म्हणून भलत्याच रीतीनें राजकीय विभागणी करून देशांतील विवक्षित लोकांमध्यें असलेलें साम्य नाहींसें करण्याचा प्रयत्न करणें बरें नव्हें व असें करण्याची खरोखरी जरूरहि नसते.
आज जी देशाची वांटणी झालेली आहे ती बदलून त्याची भाषावार पुनर्विभागणी करणें हें लोकांनां व सरकारलाहि पुष्कळ फायदेशीर होईल. प्रथम आपण सरकारला अशा विभागणीपासून कोणते फायदे होतील हें पाहूं.