प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
अल्पसंख्याक बाह्य समाज.- देशांत येऊन वस्ती करणार्या बाह्यांसंबंधानें कांहीं विचारणीय प्रश्नच नाहींत अशी गोष्ट नाहीं. असे प्रश्न पुष्कळ आहेत. परंतु आमची समाजस्थिति कांहीं एका विशेष प्रकारची असल्यानें या प्रश्नांचें अस्तित्व जोरानें आम्हांस भासत नाहीं. हिंदुस्थानांत चिनी लोक आले तरी येथें ज्या अनेक जाती आहेत त्यांत आणखी एका जातीची भर पडते एवढेंच. अमेरिकेसारख्या देशांत चिनी लोक गेले तर भिन्न प्रकार होतो.
अमेरिकन लोक या लोकांनां आपल्या समाजांत स्वीकारूं शकत नाहींत व म्हणून यांच्यावर प्रादेशिक बहिष्कार घालण्याकडे त्यांची जोराची भावना असते. आजच्या अमेरीकन समाजांत चिनीअमेरिकन विवाह मोकळेपणानें होत नाहींत. अमेरिकेंत पश्चिम संस्थानांत चिनी व जपानी लोकांशीं गोर्यांचीं लग्नें होऊं नयेत असे स्पष्ट कायदे आहेत. पूर्वेकडील संस्थानांत असे गौरेतर जातींशीं गौरांच्या विवाहास प्रतिबंध करणारे कायदे नसले तरी सामाजिक मतें व भावना असल्या विवाहाच्या बाबतींत इतकीं विरुद्ध आहेत कीं असले विवाह तेथेंहि होत नाहींत. केव्हां केव्हां असे प्रश्न केले जातात कीं, विवाहास अमेरिकन लोक नाखुष आहेत कीं चिनी लोक नाखुष आहेत? अमेरिकेंतील पूर्व संस्थानांत खालच्या जातीच्या गोर्या बायकांशीं लग्न करण्याची संधि चिनी लोक प्रायः घेतात यावरून नाखुषी अधिकांशानें अमेरिकन लोकांचीच आहे यांत संशय राहत नाहीं. जातां जातां हेंही सांगितलें पाहिजे कीं, चिनी पुरुष आणि नीग्रो बायको असे विवाह कांहीं थोडे होत नाहींत. ब्रिटिश गियानामध्यें हिंदु कूली नीग्रो बाईशीं व्यभिचार करण्याचें देखील टाळतो, परंतु चिनी मनुष्य नीग्रो बाईशीं विवाह करण्यालाहि मागें पुढें पहात नाहीं, त्यांतल्या त्यांत चांगलीशी नीग्रो बाई पाहून तिच्याशीं चिनी मनुष्य विवाह करतो, अशी साक्ष हेनरी कर्क देतो. तेव्हां चिनी व गोर यांच्यामध्यें विवाह होत नसेल तर त्याचा दोष चिनी लोकांकडे नाहीं. आधींच अनेक रक्तांचें मिश्रण असलेल्या अमेरिकन समाजांत आपण सर्वस्वीं मिळून जावें या ध्येयाला चिनी लोक कांहीं प्रतिकूल नाहींत. चिनी लोकांशीं मिळून जाणें हें अमेरीकन लोकांच्या मनाला अतिशय जट वाटतें म्हणूनच या चिनी लोकांनां आपल्या समाजापासून दूर ठेवण्याचें धोरण राष्ट्रानें पत्करावें असें अमेरिकन लोकांनां वाटतें. स्वसमाजाशीं मिसळून टाकण्याला अपात्र असे हे लोक जर देशांत येऊं दिले तर देशांत जातिभेद उत्पन्न होईल व त्या योगानें अमेरिकन लोकराज्यामध्यें जें ऐक्य व जी समता आज आहे तिला बाधा येईल अशी अमेरिकन लोकांनां भीति वाटत असल्यानें चिनी लोकांस बहिष्कार घालावयाचें धोरण त्यांनां पसंत वाटतें. हिंदुस्थानांत बाह्यांच्या सात्मीकरणाचा प्रश्न फार दूरचा आहे. हिंदुस्थानांतील सर्व लोकांची तर गोष्टच नको, येथील केवळ हिंदूच घेतले तरी त्यांच्यांत एक रक्ताच्या म्हणजे परस्परविवाहाच्या बंधनानें निर्माण होणारें एकराष्ट्रीयत्व अस्तित्वांत नाहीं, व त्यांचे जे कायमचे मुसुलमान शेजारी आहेत त्यांच्याशीं त्यांचें फारच थोड्या बाबतींत ऐक्य आहे. बाजारांत एकत्र येणारे लोक एक भाषा बोलतात त्याप्रमाणें हे हिंदुमुसुलमान एक भाषा बोलत असतील पण यापलीकडे दोघांनां सामान्य असें वाङ्मय देखील नाहीं. देश्य लिपींचा पुरस्कार हिंदू लोक करितात. तर मुसुलमान एका बाह्य लिपीचा पुरस्कार करितात. सामाजिक कायदे हेहि हिंदूंचे आणि मुसुलमानांचे भिन्न भिन्न आहेत. परंपरागत आचार, चालीरीती, खाद्येंपेयें. हींहि दोघांची तत्त्वतः भिन्नभिन्न आहेत. एकंदरीनें आपण हिंदी लोक फारच थोड्या अंशानें एकरूप आहोंत. तेव्हां आपल्या येथें येणार्या बाह्यांनां आपल्या समाजांत आत्मसात् करून घेण्याची कल्पना हें आज केवळ मनोराज्य आहे. भारतीय म्हणून आपली कांहीं सर्वांनां सामान्य अशी विचारपरंपरा नाहीं, भारतीय अशा सर्वसामान्य चाली किंवा पोषाख नाहींत. अशी जोंपर्यंत आमची स्थिति आहे तोंपर्यंत बाह्यांनां आमची विचारपरंपरा देणें व आमचा पोषाख देणें, आणि आमच्या चालीरीती देणें या गोष्टींच्या कल्पना करण्यांत काय अर्थ आहे?