प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण १ लें.
उदारमतवाद व राष्ट्रीकरण.- इंग्लंडमध्यें उदारमतवाद झाला तो कांहीं विशिष्ट ऐतिहासिक परंपरेचें पर्यवसान होता. समाजांत समाजविषयक जीं मतें उत्पन्न होतात त्यांचा ऐतिहासिक परिस्थितीशीं निकट संबंध असतो. समाजशासन कोणाच्या तत्त्वानुसार व्हावें याविषयीं भोंवतालची स्थिति अवलोकून सामाजिक तत्त्वेवेत्ते मुत्सद्दी भावी कार्यनियमनासाठीं विचारमालिका उत्पन्न करितात. नवीन विचार, बहुधा समकालीन परिस्थितीच्या अवलोकनानें जी विचारपरंपरा देशांत एकसारखी उत्पन्न होत असते त्या परंपरेंत अतंर्गत असलेल्या विचारांचें परिणत स्वरूप असतात आणि समाजांतील लोकांचें आचरण पूर्वागत विचार आणि नवे विचार या दोहोंमध्यें कोठें तरी असतें. परंपरागत विचारांचे परिणतस्वरूपी जे विचार असतात त्या विचारांचा परिणाम समाजास पुष्कळ उपयुक्त असतो; उलट परक्या ठिकाणाहून आणलेले विचार रुक्ष भूमींत रुजत नाहींत. इंग्लंडमधील राजकीय आणि सामाजिक विचारांचें अवलोकन केलें म्हणजे आपणांस असें दिसून येईल कीं पूर्वींच्या विचारांत क्रमाक्रमानें थोडाथोडा फरक होऊन तेथील विचार बदलत गेले आणि सामाजिक परिस्थितीशीं अत्यंत भिन्न असा विचारांनीं समाजांत वेडगळपणा आला नाहीं. हिंदुस्थानांतील परमार्थसाधनपर विचाराचा इतिहास पाहिला म्हणजे अशीच उत्क्रांति आढळून येते. ही उत्क्रांति आणि तज्जन्य परमार्थविषयक सामाजिक ध्येय हें माधवाचार्यांनीं आपल्या शांकरदिग्विजय या ग्रंथांत व्यक्त केलें आहे आणि मराठींत कै. रा. रा. रघुनाथशास्त्री गोडबोले यांनीं आपल्या अर्वाचीन कोशाच्या प्रस्तावनेंत अवतरिलें आहे.

उदारमतवाद आणि राष्ट्रधर्म या दोहोंमध्यें एक सादृश्य आहे तें हें कीं, आजच्यापेक्षां निराळी स्थिति दोहोंसहि पाहिजे आहे. राष्ट्र बलवान् करावयाचें या ध्येयानें समाजांत जे फेरफार करावे लागतील आणि जी निराळी आचारपरंपरा उत्पन्न करावी लागेल तीच आचारपरंपरा कांहीं अंशीं उदारमतवादानें देखील उत्पन्न होईल आणि प्रत्यक्ष उपदेशहि जो करावा लागेल तो बराच उदारमताच्या प्रसाराचाच करावा  लागेल. तथापि कांहीं बाबतींत राष्ट्रधर्म ज्या सीमा घालून ठेवील त्या सीमा आजच्या उदारमतवादानें घातलेल्या नाहींत. आपली संस्कृति व परंपरागत आचार आणि आपलेच कायदे गृहीत धरून त्यांत फेरफार करीत जाणें आणि हिंदुत्वाचें क्षेत्र अधिकाधिक विस्तृत करीत जाणें व त्याबरोबर स्वत्वाबद्दलचा अभिमान पण दृढ ठेवणें हा राष्ट्रधर्म होय. हिंदु या नांवाची व्याप्ति अधिक वाढवून त्यांत अधिकाधिक लोक घेणें हा राष्ट्रधर्म होय. केवळ ख्रिस्ती व मुसुलमान यांशीं अधिक चांगले संबंध उत्पन्न करणें हा उदारमतवाद होय. केवळ उदारमतवाद हिंदु शब्दाची व्यापकता वाढवीत नाहीं आणि त्यामुळें बाह्य लोकांस घेऊन समाजांत पूर्णपणें प्रविष्ट करून देणें त्यास शक्य नाहीं.

अर्थात् आपणांस करावयाचें कार्य येणेंप्रमाणें होईल.

(१) सर्व जगाशीं व्यवहारास जुळतील असे हिंदूंचे आचार बनविणें.
(२) हिंदु संस्कृति म्हणजे आपल्या भाषा व आपलें पैतृक वाङ्मय यांविषयीं अभिमान उत्पन्न करणें.
(३) हिंदुसमाजाचें सदस्यत्व इतरांस उपलब्ध करून देणें एवढेंच नव्हे तर त्यांस तें सदस्यत्व हितावह होईल असा प्रयत्‍न करणें.
(४) हिंदुसमाजांतील लोकांस एकरूपता आणण्याचा प्रयत्‍न करणें आणि त्यासाठीं उच्चनीचपणाच्या सामाजिक कल्पनांस आळा घालणें.
(५) समाजांत कार्यकर्त्या संस्था निर्माण करून समाजाची कार्यशक्ति वाढविणें.