प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
भारतीय समाजांतील घटक.- समाजाच्या आर्थिक जीवनाच्या या अंगाचा अभ्यास करावयाचा तर देशांतील लोकसमुदायांत निरनिराळे घटक कोणते आहेत त्यांचें ज्ञान आपणांस करून घेतलें पाहिजे व देशांतील सर्वसामान्य संस्कृतीच्या वाढीस या प्रत्येक घटकाकडून कोणत्या प्रकारची मदत किंवा अडचण होण्याचीं लक्षणें दिसत आहेत त्यांचेंहि ज्ञान आम्हांला पाहिजे. अशा अभ्यासासाठीं जीवनभेदाच्या तत्त्वावर हिंदुस्थानांतील लोकांचे वर्ग खालीलप्रमाणें पाडतां येतील.
(१) इंग्रज लोक. हिंदुस्थानांत इंग्रज वर्ग हा राज्यकर्ता वर्ग असून हिंदुस्थानच्या संस्कृतीला ब्रिटिश वळण लावण्याचा याचा प्रयत्न आहे.
(२) हिंदू लोक. देशांत सर्वांत मोठी संख्या यांची असून आज आपली संस्कृति अभंग राखण्यासाठीं यांनां झगडावें लागत आहे.
(३) मुसुलमान लोक. संख्येच्या दृष्टीनें यांचा नंबर हिंदूंच्या खालीं लागतो. यांची संस्कृति हिंदूंच्या संस्कृतीपासून अगदीं भिन्न असून हे लोक ही आपली भिन्न संस्कृति संरक्षिण्याच्या प्रयत्नांत आहेत.
(४) पार्शी, यहुदी व इतर अप्रधान समाज. देशांत यांची कोणाचीहि स्वतंत्र व संरक्षणार्ह अशी संस्कृति नाहीं.
या भिन्न समाजांचे व संस्कृतींचे एकमेकांवर व हिंदुस्थानच्या सर्वसामान्य संस्कृतीवर काय परिणाम होतात तें पाहूं. हिंदु संस्कृति जी उदयास आली ती अनेक घटकांच्या आजारविचारांच्या दीर्घकालपर्यंत चाललेल्या तडजोडींतून उदयास आली. ‘हिंदु’ या नांवाच्या समूहांत जे लोक अंतर्भूत होतात ते लोक निरनिराळ्या वंशांतील आहेत आणि त्यांच्या संस्कृतीहि स्वभावतःच निरनिराळ्या आहेत. यासाठीं आपण लोकसमाजांची भ्रमणें आणि या भ्रमणांचा संस्कृतीवर होणारा परिणाम विचारांत घेऊं. आपल्या विवेचनाला पूर्णता येण्यासाठीं अगदीं प्राचीन काळापासून हिंदूस्थानांत जे निरनिराळे लोकसमूह आले त्यांचें ज्ञान आपण करून घेऊं. ऋग्वेदावरून आपल्याला हिंदुस्थानांत कोणीतरी मोठा समूह आल्याचें दिसून येतें. आर्यन् म्हणून ज्यांनां आपण म्हणतों ते या देशांत आपल्याला बरोबर माहीत नाहीं अशा अति प्राचीन कोणत्या तरी काळांत आलेले आहेत. ह्या आर्यनांच्या आगमनापूर्वीं एक, दोन अथवा तीन बाह्य समाजांचीं आगमनें झालीं. हे समाज म्हणजे निग्रिटो, कोलेरियन् आणि द्राविड समाज होत. या लोकांसंबधाचें वर्णन तिसर्या प्रकरणांत येऊन गेलेंच आहे. या लोकांनंतर जे आर्यन् लोक येथें आले ते वायव्येकडून येऊन त्यांनीं हिंदुस्थानाला एक नवीन संस्कृति दिली. त्यांनीं आपणांपूर्वीं असलेल्या संस्कृती अगदींच लयाला नेल्या नाहींत. त्यांनीं जें कार्य केलें तें या सर्व संस्कृतींनां आपल्या संस्कृतीचें पुट चढवून एकरूपाता आणण्याचें होय. पूर्वीं ज्या निरनिराळ्या स्थानिक आणि लहान लहान टोळ्यांपुरत्या संस्कृती होत्या त्यांनां एकत्र करून नव्याजुन्यांची मिळून एक नवीन व सर्वांगपूर्ण अशी संस्कृति त्यांनीं बनविली. या आर्यन् लोकांनंतर मंगोलियन लोकांचें आगमन या देशांत झालें. हे जे मंगोलियन लोक आले ते त्यांच्या वंशांतील सुधारलेले लोक नसून कमीअधिक रानटी लोकच असावेत असें दिसतें. अर्थात् यांनीं येथें आपली स्वतंत्र संस्कृति न स्थापितां येथील ‘आर्यन्’ संस्कृतीचाच प्रामुख्यानें स्वीकार केला. आजची जी हिंदु संस्कृति झालेली आहे ती उदयास येण्यास यांचा हातभार लागलेला आहे. दक्षिणेंत आर्यन् आणि द्राविड आचारविचारपंरपरा जशा मिश्रित झाल्या तशाच पूर्वभारतांत आर्यन् आणि मंगोलियन परंपरा एकमेकांत मिसळून गेल्या आहेत.
वर सांगितलेले पांच अथवा तीन वंश या सर्वांनीं मिळून आज हिंदु नांवानें संबोधिली जाणारी संस्कृति निर्माण केलेली आहे आणि या कार्यांत प्रमुखत्वाचा भाग आर्यन् संस्कृतीनें घेतला आहे. हिंदुस्थानांत निरनिराळ्या संस्कृती एकत्र होऊन त्यांची परस्पर देवघेव व तडजोड ज्या दीर्घ काळाच्या मुदतींत सारखी चाललेली होती त्या मुदतीचा आरंभ आर्यन् आगमनाच्या पूर्वीं अतिप्राचीन अज्ञात काळांत होत असून तिचा शेवट ख्रिस्ती शकाच्या पहिल्या सहस्त्रकाच्या अखेर झाला. या देवघेवींतून व तडजोडींतून आजची हिंदु संस्कृति निर्माण झाली.
प्रत्येक वंशाच्या हातून कोणतातरी एक प्रकारचा संस्कृतीचा नमुना तयार होत असतो. हा नमुना जर बराच सुव्यवस्थित असेल तर दुसरे जे वंश या नमुन्याच्या कक्षेंत येतात ते या नमुन्याप्रमाणें आपली राहणी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र येणारे लोक जर जेते म्हणून आले असतील तर समोरील जित लोकांची संस्कृति विध्वंसून टाकणें हें आपलें कर्तव्य असें ते सामान्यतः समजतात व अर्थातच ह्या जित संस्कृतीप्रमाणें आपली राहणी बदलण्याच्या भानगडींत ते पडत नाहींत. सामान्य नियम असा आहे कीं, दोन भिन्न संस्कृती एकत्र आल्या असतां त्या एकमेकीची उचलबांगडी करूं पाहतात. जुन्या संस्कृतीचे प्रतिनिधी जर राजकीय सत्तेनें संपन्न असतील तर नवे येणारे लोक या जुन्या राष्ट्राची संस्कृति पत्करतात. ही जुनी संस्कृति पत्करतांना आपल्या पूर्वींच्या चालीरीती या नवीनांनां सामान्यतः टाकून द्याव्या लागतात. मात्र कांहीं बळकट अशी वाङ्मयपरंपरा जर नवीनांजवळ असली तर त्यांच्यापुढें स्वीकारार्थ आलेल्या संस्कृतीचा ते पूर्णपणें अंगीकार करीत नाहींत. एखाद्या लोकांनीं एखादा देश ताब्यांत घेतला व तो कांहीं दिवस आपल्या ताब्यांत ठेवून आणि त्यांतील लोकांवर आपली संस्कृति लादून जर हे लोक सत्ताच्युत झाले, तर अशा देशांत दोन संस्कृती परस्परांशीं झगडत असतात. या संस्कृती आरंभीं जरी एकमेकाला विरोधी असल्या तरी सान्निध्यानें शेवटीं या दोन संस्कृतींतून नवीच एक संस्कृति निर्माण होते. ही नवी संस्कृति जुन्या दोहोंच्या मिश्रणानें झालेली असते व या मिश्रणांत संख्येनें अगर बळानें अधिक समर्थ अशी जी संस्कृति असेल तिचा भाग अधिक असतो. शक व श्वेत हूण लोक यांच्या ज्या टोळ्या देशांत आल्या व अलीकडे यहुदी, पार्शी, आर्मीनियन व चीनीलोक जे येथें आले ते अल्पसंख्याक असल्यानें त्यांसंबंधानें दोन शब्द सांगितले म्हणजे पुरे आहे.
वरील लोकांसंबंधानें सामान्यतः असें म्हणतां येईल कीं त्यांनीं देशी लोकांची संस्कृति कमी अधिक प्रमाणानें पत्करिली. येथें हें एक सर्वसाधारण विधान करण्यास हरकत नाहीं कीं, जेव्हां एखाद्या देशांत बाह्य लोकांची टोळी येते तेव्हां जर देश्य लोक राजकीय दृष्टीनें प्रमुखपदाधिष्ठित असतील तर हे बाह्य लोक त्यांच्यासारखी राहणी करण्याचा प्रयत्न करितात.