प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण १ लें.
आर्थिक स्थितीचें पर्यालोचन.- आज जी समाजास विचित्र स्वरूप देणारी, आणि उत्पादनविनिमयास अवरोध करणारी आर्थिक स्थिति समोर दिसत आहे तिचें पूर्वरूप नीट लक्षांत येण्यासाठीं, ज्यांचा परिणाम फार दूरवर झालेला आहे अशा गोष्टींच्या ऐतिहासिक स्वरूपाचें ज्ञान होणें अवश्य आहे. त्याप्रमाणेंच भारतांत जे समाजविकासनियम कार्य करीत आहेत त्यांचेंहि ज्ञान असणें जरूर आहे. आजच्या आर्थिक स्थितीचा प्रारंभ शोधावयाचा व त्याजबरोबर या स्थितीशीं कार्य अथवा कारणभावानें संबद्ध अशा समाजस्थितीचेंहि मूळ शोधावयाचें असें जर आपण मनांत आणलें तर कल्पनातीत अशा प्राचीन काळाचें आपणांस ज्ञान करून घेतलें पाहिजे. सध्यांचा जातिभेद कोणत्या राजकीय व आर्थिक स्थितीशीं कार्यकारणरूपानें संबद्ध आहे याची आपणांस फारच अल्प व अस्पष्ट माहिती आहे. जातिभेदाशीं बर्याच अंशीं झगडत असलेल्या व समाजास विचाराच्या द्वारा विशिष्ट स्वरूप देणार्या वर्णव्यवस्थेचीं कांहीं अंगें आपणांस ऋग्वेदमंत्रांच्या रचनेच्या काळांत उपलब्ध होतात एवढेंच नव्हे तर तीं त्यापूर्वींच्या इंडोयूरोपीय काळांतहि सांपडतात. पुरातन काळच्या पुष्कळशा संस्थांचे अवशेष आज राहिलेले आहेत व अनेक वेळां आजच्या आर्थिक जीवनाचें स्वरूप ठरविण्याच्या कार्यांत या केवळ अवशेषभूत गोष्टींकडेच निर्णायक सामर्थ्य असल्याचें अनुभवास येतें.
लहान समाज मोठ्याच्या पोटांत सात्मीकृत होऊन किंवा दुसर्या लहानांशीं संलग्न होऊन महान् समाज उत्पन्न व्हावे अशा प्रकारचें जगाच्या विकासाचें धोरण दिसत आहे. अनेक भिन्नस्वरूपी समाज एक भाषा किंवा एक पंडितवर्ग अथवा एक पुरोहितवर्ग अथवा एक राजकीय छत्र अशा प्रकारच्या कोणत्या तरी अधिक व्यापक शक्तीच्या तावडींत आले म्हणजे त्या भिन्नगुणसमाजांत एकरूपता उत्पन्न होण्याची क्रिया सुरु होते. ही एकरूपता वाढत जाते तशी आर्थिक संबंधांची पुनर्घटना तिच्या मागोमाग येते. सामाजिक एकरूपतेची वाढ म्हणजेच आर्थिक पुनर्घटना होय. ज्या गोष्टी ही एकरूपवृद्धि खुंटविण्यास कारणीभूत होतात त्या आर्थिक जीवनाच्या पुनर्घटनेच्या बाबतींतहि अपायकारक होतात. यासाठीं आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकाला ज्या घडामोडींचा अभ्यास विशेष महत्त्वाचा आहे त्या घडामोडी म्हटल्या म्हणजे देशांत जीवनाची अथवा राहणीची समानता किंवा भिन्नता उत्पन्न करणार्या गोष्टी होत. राहणीमध्यें सारखेपणाची वाढ झाल्यानें म्हणजे सर्वसामान्य गरजांची वाढ झाल्यानें समाजाच्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम होतो, त्यायोगें उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याची क्रिया कशी जोरानें चालू होते यासंबंधाचें वर्णन मागें आलेलेंच आहे. तेव्हां, आपण अत्यंत बारकाईनें जो सामाजिक, राजकिय व आर्थिक इतिहासाचा भाग कोणत्याहि देशांत लक्षांत घेतला पाहिजे तो भाग म्हणजे या देशांत भिन्न घटकांतून सर्वसमान्य अशी संस्कृति कशी उदयास आली त्यासंबंधाचा भाग होय. अशा प्रकारची सामान्य प्रादेशिक संस्कृति जेथें उदयास आलेली नसेल, तेथें ती उदयास न येण्याचीं कारणें कोणतीं आहेत तीं शोधून काढण्याकडे आम्हीं लक्ष पुरविलें पाहिजे. देशांत सर्वसामान्य संस्कृति उदयास कशी येते याचे जे नियम आहेत त्यांचें ज्ञान तात्त्विक दृष्टीनें महत्त्वाचें आहे एवढेंच नव्हे तर या नियमांचें ज्ञान व्यवहारदृष्ट्याहि बहुमोल आहे. कारण, या ज्ञानाच्या आधारावर आपणांस देशांत जे संस्कृतीचे थर असतात व या थरांचे प्रतिनिधि जे लोकसमाज असतात त्या समाजांनां व त्या थरांनां अमुक धोरणानें वागविणें श्रेयस्कर होईल हें ठरवितां येतें. संस्कृतीच्या प्रत्येक थराला तत्संबद्ध अशी एक आर्थिक जीवनपद्धति असते. एखाद्या प्रदेशांत अनेक सांस्कृतिक थर असतील तर त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. मात्र, असेंहि पुष्कळ वेळां घडतें कीं, ही परस्परांवर परिणाम करण्याची क्रिया कांहीं कारणपरंपरा उद्भवून स्तंभित होते.