प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
सातवें अगं, उवासगदसाओ. - हे 'जैन उपासकाचे' धर्म सांगणारीं दहा प्रकरणें ह्या नांवाचें बहुतेक कथास्वरूपी आहे. ह्या दहा प्रकरणांत दहा कुटुंबवत्सल अशा धनाढय व्यापाऱ्यांची कथानकें आहेत. ह्या दहा व्यापाऱ्यांनीं स्वत:करितां कांहीं नियम घातले व महावीरानें सांगितलेलीं व्रतें पाळलीं व ते जैनउपासक बनले. ह्या दहाहि कथानकांचा सांचा अगदीं इतका ठरल्यासारखा आहे कीं शेवटच्या गोष्टींतून पूर्वीच्या गोष्टींतील त्या त्या प्रसंगांचीं काहीं वाक्येंच सुचवून थोडक्यांत काम भागविलें आहे. ह्यांपैकीं सातवें प्रकरण अत्यंत मनोरंजक असून त्यामध्यें 'सद्दालपुत्त' नांवाच्या श्रीमंत कुंभाराचें कथानक दिलें आहे. प्रथम सद्दालपुत्त हा गोशाल मुख्खलिपुत्त याचा अनुयायी होता; परंतु पुढें तो महाविराकडे गेला. त्या वेळीं महावीरानें आपल्या तत्त्वाच्या सत्यस्वरूपाविषयीं त्या कुंभाराची कशी खात्री पटविली ह्या प्रसंगाचें संभाषण वाचलें असतां बौद्धग्रंथांतील एखाद्या सुंदर संवादाचें स्मरण होतें. तथापि हा ग्रंथ पठणाद धार्मिक कृत्याकरितां रचिलेला असावा ही गोष्ट स्पष्टपणें निदर्शनास येते. वस्तुत: हें कांहीं धार्मिक काव्य नाहीं, तर ईश्वरावज्ञानसंबंधीं लेखनाचा एक नमुना आहे.