प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
सहावें अंग, नायाधम्मकहाओ. - सहाव्या अंगाची ''नाया धम्मकहाओ'' (ज्ञातधर्मकथा) ही संज्ञा आहे. ह्या अंगाच्या पहिल्या भागांत २३ प्रकरणें असून त्या प्रत्येक प्रकरणांत एक एक आख्यायिका संपूर्ण वर्णिल आहे ह्या पैकीं बहुतेक आख्यायिकांमध्यें कथाभागापेक्षा आंतील रूपकभगास जास्त महत्त्व आहे, इतकेंच नव्हे तर मूळ रूपकांनांच मागाहून कथास्वरूप दिलं गेलं असावें.
वरीलसारख्या रूपकपूर्ण दंतकथांशिवाय प्रवासवृत्तें, दर्यावर्दी व्यापाराचीं अद्भुत कथानकें, कादंबरीवजा गोष्टी इत्यादि पुष्कळ असा भाग ह्या ग्रथांत आढळतो कीं ज्यामध्यें उपदेशपूर्ण अशा रूपकाचा संबंध फारच थोडा लागतो. आठव्या प्रकरणामध्ये ''मल्ली'' नांवाच्या फक्त एकच स्त्री-तीर्थंकराची नमुनेदार आख्यायिका आली आहे. १६ वें प्रकरण अत्यंत मजेचें आहे ह्यामध्यें ''दोवई'' (द्रौपदी) हिचें कथानक अवतारस्वरूपांत वर्णन केलें आहे. द्रौपदीचें पांच पांडवाबरोबर लग्न झाल्याचें दखविणाऱ्या महाभारतकथानकाचा सुधारणा करण्याचा हा जैनांचा प्रयत्न दिसतो. परंतु तो यशस्वी झालेला दिसत नाहीं.
ह्या अंगांचा दुसरा भाग आंतील विषयांच्या दृष्टीनें व बाह्यस्वरूपांतहि पहिल्या भागापेक्षां अगदीं भिन्न दिसतो व ह्या भागाचें एकंदरीनें सातव्या व नवव्या अंगांशीं अत्यंत निकट सादृश्य दिसतें.