प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

पांचवें अंग, भगवती वियाह. - 'भगवतीवियाह' किंवा 'विवाहपन्नत्ति' किंवा थोडक्या शब्दांत ''भगवती'' या संज्ञेनें उल्लेखिलें जाणारें पांचवें अंग अत्यंत महत्त्वाच्या अंगांपैकीं एक आहे. ह्या ग्रंथामध्यें जैन धर्माच्या सांप्रदायिक उपदेशाचें बरेंच सविस्तर उपपादन आलें आहे. अर्थात् ह्या विवेचनाचा कांहीं भाग सारांश पानें आला असून कांहीं भाग 'इतिहाससंवाद' रूपांत रचलेला आहे. ह्यापैकीं एका दंतकथात्मक भागामध्यें, महावीरापूर्वीच्या जैनपरंपरेतील पूर्वजांनीं व इतर कांहीं पवित्र मुनीनीं अत्यंत खडतर तपश्चर्या करून निर्वाणपदप्राप्ति कशी करून घेतली ह्याचें वर्णन आहे. पवित्रमार्गानें पुण्यकर्मे करण्यांत आयुष्य घालविणाऱ्या साधुपुरुषास मिळणारें उत्तम उत्तम स्वर्गलोक, त्याचप्रमाणें दुराचारी पाप्यांस भोगावा लागणारा नरकवास व त्यांतील अनंत दु:खें ह्यांचीं वर्णनेंहि पुष्कळ ठिकाणीं आढळतात.

ह्यामध्यें विशेषत: महावीराचे पूर्वकालीन व समकालीन पुरुष म्हणजे पार्श्वाचे शिष्य जामाली व गोशाल मख्खलिपुत यांच्या विषयीं आलेल्या आख्यायिका जास्त महत्त्वाच्या आहेत. जामाली व गोशाल मख्खलिपुत्त हे जैन पेटपुसम्प्रदायाचें संस्थापक असून, या पांचव्या अंगाचें १५ वें प्रकरण गोशाल याजबद्दलच्या माहितीनें भरलेलें आहे. विरुद्ध संप्रदायसंस्थापकाचें जीवनचरित्र एखाद्या संप्रदायामध्यें कशा रीतीनें वर्णन केलें जातें ह्याचें हें उत्तम निदर्शक आहे. ह्या वर्णनावरून असें दिसून येतें कीं, पार्श्व व महावीर ह्यांचे अनुयायी जे ''नीगंथ'' व गोशालच अनुयायी ''आजी क'' ह्या दोन विरुद्धपंथी लोकांमध्यें विभक्त होण्यापूर्वी अत्यंत निकट संबंध होता, बहुतेक ''भगवता'' अंगाचें १५ वें प्रकरण मूळांत अगदीं स्वतंत्र असावें व मागाहून निरनिराळ्या माहितानें भरलेल्या प्रकरणांनी त्यामध्यें भर पडलेलीं असावी.