प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

वैदिक वाङ्मयवर्णन.

वैदिक ग्रंथांची संपूर्ण यादी देतांनां ज्या अडचणी उपस्थित होतात, त्यापैकीं एक अशी आहे कीं, अनेक ग्रंथ वेदांतील नसून वेदांत घुसडून देण्याचा प्रयत्न करण्यांत येतो; पण ही अनवस्था विशेषेंकरून वेदांगांसंबंधीं व उपनिषदांसंबंधीं आहे. मंत्रब्राह्मणांसंबधीं नाहीं.
प्रस्तुत वाङ्मयवर्णनाचे भाग येणेप्रमाणें:-
(१)    कर्मकांड ऊर्फ श्रौत वाङ्मय जुनें. यांत मंत्र व ब्राह्मणें येतात. ज्या आरण्यकांचा संबंध श्रौत ग्रंथांशी निकट आहे, तीं आरण्यकें त्यांच्याजवळच मांडलीं आहेत.
(२)    ज्ञानकांड ऊर्फ उपनिषदें.
(३)    इतर वेदाभ्यास प्राचीन.
यांत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतीष, प्रातिशाख्यें. चरणव्यूहासारखे शाखा दाखविणारे ग्रंथ, अनुक्रमणीग्रंथ व बृहद्देवता हीं येतात.
यांतील जुनें श्रोत वाङ्मम जें मंत्र व ब्राह्मणें तें प्रथम घेतलें आहे. त्याबरोबरच त्यांच्या मुख्य आवृत्त्या प्रथम दिल्या आहेत.
भाषांतरांचे प्रयत्न नंतर दिले आहेत.
उपनिषदाची उत्पत्ति काहीं अंशीं श्रौतविषयक संप्रदायांतून झाली असली तरी श्रौतकर्मांशीं निकट संबंध येत नसल्यामुळें ती परीक्षणपूर्वक वेदानुरूप मांडली नाहींत, तरी थोड्या तद्विविषयक समजुती दाखविल्या आहेत.