प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

बारावें अगं दिठ्ठिवाय. - ह्यानंतरच्या नष्टप्राय झालेल्या ''दिठ्ठिवाय'' नामक बाराव्या अंगामधील विषयांची कल्पना येण्यास इतर जैन धर्मग्रथांत पुष्कळ पुरावा आहे. परंतु बारा उपांगांच्या अस्तित्वावरून बारा अंगहि अस्तित्वांत होतीं हें उघड आहे.

उपागांचा प्रत्येक अंगांशीं संबंध आहे. तथापि हा संबंध अगदीं बाह्य तऱ्हेचा आहे. बारा उपांगांचे विषय दंतकथात्मक व जैनसांप्रदायिक माहितीचे असून वाङ्मयदृष्टया त्यांस अत्यंत थोडें महत्त्व आहे.

पहिले उपांग. - हें ओववाइया अगर ओवाइया ह्या नांवाचें असून त्यामध्यें अनेक प्रकारचे विसदृश विषय एकत्रित करण्यांत आले आहेत. पहिल्या भागांत एका राजानें धार्मिकदृष्टया पूज्य अशा एका स्थळीं केलेल्या यात्रेचें वर्णन आहे. ह्या ठिकाणीं महावीर हा त्या राजास जैन धर्माचा उपदेश करतो व सरतें शेवटी राजा जैन धर्मांत समाविष्ट होतो असें दाखविले आहे. ह्या भागाचा दुसऱ्या भागाशीं काहीं एक संबंध नाहीं. कारण दुसऱ्या भागांत बारा स्वर्लोकांची प्राप्ति कशी होते ह्याचें विवरण आहे.

दुसरें उपांग. - वाङ्मयग्रंथ या दृष्टीनें सर्वांत महत्त्वाचें पुस्तक रायपखेनैज्ज नांवांचे दुसरें उपांग होय. ह्या ग्रंथाच्या आरंभींच ''सूरियाभ'' नांवाच्या देवानें महावीराच्या केलेल्या यात्रेचें लांब, कंटाळवाणें वर्णन आहे. परंतु ह्या ग्रंथांतील अत्यंत सारभूत भाग म्हटला म्हणजे ह्या कथेंत आलेला पैकी राजा व केशी मुनि यांजमध्यें झालेला संवाद होय.

चौथें उपांग. - याचा सर्व धर्मग्रंथांपेक्षां असा एक विशेष आहे कीं हे उपांक ''अंय्य साम'' नांवाच्या ग्रंथकाराच्या नांवावर मोडतें.

पांच ते सात उपांगें. - ही उपांगें तत्कालीन खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, सृष्टयुत्पत्ति, व कालगणना इत्यादि अनेक शास्त्रांचें ग्रंथ होत. तथापि ''सूरियपण्णत्ति'' ह्यामध्यें आकाशस्य गोलांच्या खऱ्या निरीक्षणापेक्षां, त्यासंबंधी अवांतर वेडगळ कल्पनाच जास्त दिसून येतात. त्याचप्रमाणें ''जंबुद्दवपण्णत्ति'' ह्या भूगोलशास्त्रीय प्रकरणांत भारतवर्षांच्या वर्णनांतील बरीचशीं जागा भरत राजाच्या अख्यायिकांनीं व्यापून टाकली आहे.

आठ ते बारा उपांगें. - हीं ''निरयावलीसुत्तम'' ह्या एका नांवानें एक धर्मग्रंथाचेंच पांच परिच्छेद म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यापैकीं ''निरयावलीयाओ'' ह्यामध्यें ''कुणीय'' किंवा ''अजातशत्रु'' नावाच्या चंपानगरीच्या राजाचे दहा सावत्र भाऊ आपल्या आजाबरोबर युद्ध करीत असतां त्याजकडून कसे मारले गेले व मृत्यूनंतर ते अनेक नरकात कसे पुन्हां जन्मले ह्याचें वर्णन आहे.