प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
परिशिष्ट.
अकरावेंअंग, विवागसूयम्. - या अंगामध्यें अवदानशतक व कर्मशतक ह्या बौद्ध ग्रंथांतील दंतकथां प्रमाणें सुकृतदुष्कृतांचा परिणाम प्रत्येक जिवास कसा भोगावा लागतो याबद्दल आख्यायिका दिल्या आहेत. ह्या ग्रंथांचें स्वरूप म्हणजे 'इंद्रभूति' अनेक दु:खी प्राणी पाहात आहे व त्याच्या विनंतीवरून महावीर, त्या प्राण्यानें पूर्वजन्मांत केलेल्या कोणत्या वाईट कृत्यामुळें त्याला ह्या, आपत्ती आल्या, त्याचप्रमाणें त्यानें किती नीच योनींत जन्म घेतला, अद्यापि त्यास किती हाल भोगावयाचें आहेत व सरते शेवटीं तो पुन्हां उत्तम जन्मास कसा जाणार इत्यादि गोष्टी विवरण करून त्यास सांगत आहे. उदाहरणार्थ, उबरदत्त नामक मनुष्यास सर्व प्रकारचे व्याधी झाल्याचें वर्णन आहे. त्याचें कारण असें कीं पूर्वजन्मीं तो रोगपरीक्षक असतांना त्याने आपल्या रोग्यांस बरे होण्याकरितां मांसाशन करण्याविषयीं सांगितलें व त्यामुळें त्याच्याकडून अनेक प्राण्यांची हिंसा झाली. म्हणून त्याला अद्याप ह्यापेक्षां हलक्या जन्मास जावें लागणार व सरते शेवटीं तो पुन: व्यापाऱ्याच्या जन्मास येऊन निर्वाण पद प्राप्त करील असें त्याजबद्दल सांगितलें आहे.