प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

ग्रंथकाल. - ह्या धर्मग्रंथाच्या कालासबंधीं व प्रमाणभुततेसंबंधी श्वेतांबर जैनामध्यें पुढील दंतकथा प्रचलित आहे.
प्रत्यक्ष महावीरानें गणधर वगैरे शिष्यास जो तत्त्वोपदेश केला तें मूळ जैन तत्त्वज्ञान होय व तो चौदा ''पुव्व'' (पूर्व) ग्रंथांत समाविष्ट झालेला होता; परंतु लवकरच ह्या प्राचीन ग्रंथांची माहिती नष्ट झाली मात्र महावीराच्या एका शिष्यानें हें ज्ञान पुढें प्रसृत केलें व पुढें कित्येक पिढ्यांपर्यंत अशा रितीनें ह्या मूळ धर्मग्रंथांचें संरक्षण करण्यांत आलें.

महावीराच्या मृत्युनंतर दुसऱ्या शतकांत मगध देशात १२ वर्षेपर्यंत भयंकर दुष्काळ पडला. त्या वेळीं मौर्य चंद्रगुप्त हा मगध देशचा राजा होता व भद्रबाहु हा जैन लोकांचा मुख्य अग्रणी होता. दुष्काळामुळे भद्रबाहु हा कांहीं अनुयायांसह दक्षिण हिंदुस्थानातील कर्नाटक देशात गेला व चौदा पूर्वांच्या ज्ञानांत पारंगत असलेल्यापैकीं शेवटचा जो स्थूलभद्र तोच मगध देशात मागें राहिलेल्या जैनसंप्रदायी लोकांचा धुरीण झाला. भद्रबाहूच्या अभावीं ह्या चौदा पूर्वांचे ज्ञान नाहींसें होते, अशी स्थिति प्राप्त झाल्यामुळें पाटलिपुत्र शहरांत एक धर्मंसभा भरविण्यात आली व ह्या सभेंत ११ अंगाची रचना करण्यात येऊन १४ 'पूर्वांचें' अवशेष जमवून त्यांचें १२ वें अंग बनविण्यात आलें. जेव्हा भद्रबाहूबरोबर गेलेले लोक स्वदेशी परत आले, त्या वेळीं परदेशी गेलेल्या व देशीं राहिलेल्या जैन लोकांमध्यें बरेंच अंतर पडलें होतें. देशीं राहिलेल्या लोकास श्वेतवस्त्रें वापरण्याची संवय झाली होती; परंतु भद्रबाहूचे अनुयायी जैन ह्यांनीं महावीराच्या आज्ञेप्रमाणें नग्न स्थितींतच आयुष्य घालविण्याचें व्रत चालविलें होतें व अशा रीतीनें श्वेतांबर व दिगंबर हे दोन तट जैन लोकांत पडले. ह्याचा परिणाम असा झाला की, दिगंबर जैनानीं १४ 'पुव्व' आणि 'अंगें' नाहींशीं झालीं, असें ठरवून श्वेतांबर जैनानीं संग्रथित केलेले धर्मग्रंथ प्रमाण मानण्याचें सोडून दिलें. कालांतरानें श्वेतांबरांच्या धर्मग्रंथांत घोंटाळा माजून ते ग्रंथ नामशेष होण्याच्या मार्गास लाभले. ह्यामुळें महावीरनिर्वाणानंतर ९८० (किंवा ९९३) वर्षांनीं म्हणजे इ. सनाच्या ५व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास गुजराथ देशांतील वलभी नगरांत पुन:एक धर्मग्रंथांचें एकत्रित संग्रथन करण्याकरितां धर्मसा भरविण्यांत आली. ह्या वेळीं ''पुव्व'' यापैकीं त्रुटित अवशेष मिळून एकत्र केलेलें १२वें 'अंग' नष्ट झालें होतें. ह्यामुळें ''देवद्विगणी'' याच्या धर्मग्रंथाच्या प्रतीशीं समान अशा सांप्रत उपलब्ध असलेल्या जैन धर्मग्रंथांत आपणांस ११ 'अंगें'च सांपडतात.

अशा रीतीनें श्वेतांबर जैनांच्या दंतकथेप्रमाणें देखील ह्या धर्मग्रंथांचा काळ इ. सनाच्या ५ व्या शतकाच्या पूर्वी जाऊं शकत नाहीं. अर्थात् ह्या धर्मग्रंथांचा उद्भव पूर्वीच्या पाटलिपुंत्र नगरांतील धर्मसभेच्या काली व त्यापूर्वीहि महावीराच्या कालीं झाला, असें त्यांचें म्हणणें आहेत. १४ 'पुव्व' व ११ 'अंगें' ह्यांचे ज्ञान महावीराच्या कांही पट्टशिष्यांस होतें ही गोष्ट दिगंबर जैन देखील कबूल करतात; परंतु त्याचें इतकेंच म्हणणें आहे कीं, ह्या १४ 'पुव्व' ग्रंथांचे ज्ञान अकालींच नष्ट झालें इतकेंच नव्हे, तर महावीरनिवाणानंतर ४३६ वर्षांच्या अवधींत ११ 'अंगे' याचें ज्ञान असलेला शेवटचा आचार्यहि मृत झाला, व मागाहूनच्या आचार्यांचें ''अंगज्ञान'' कमी कमी होत जाऊन महावीरनिर्वाणानंतर ६८३ वर्षांनी ह्या धर्मग्रंथातील खऱ्या ज्ञानाचा मागमूसहि उरला नाहीं.

मूळ जैन दंतकथेप्रमाणें ह्या वरील धर्मग्रंथाचा काल मागें नेतां येत नाहीं; तथापि ह्या ग्रंथाचा काहीं भाग अत्यंत जुना असून फक्त देवर्द्वि यानें जुन्या हस्तलिखितावरून काहीं भाग व तोंडीं दंतकथेच्या रूपानें आलेला काहीं भाग, ह्या सर्वांचे संकलन केलें, असें म्हणण्यास बराच विश्वासजनक पुरावा आहे. कारण इ. सनाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकातील काहीं शिलालेखावरून असें स्पष्ट दिसून येतें कीं, त्या वेळीं देखील जैनामध्यें श्वेतांबर व दिगंबर हे भेद झाले होते, व सध्याच्या उपलब्ध जैन धर्मग्रंथात आढळून येणाऱ्या वंशपरंपरांसारख्या परंपरा असणारे काहीं पंथ (गण) त्या काळीं अस्तित्वात होते. ह्याच शिलालेखामध्यें ''वाचक'' नावाच्या जैन संन्याशांचे उल्लेख आहेत, त्या वरून त्या काळीं जैन धर्मग्रंथ कोणत्या तरी मूळ स्वरुपांत अस्तित्वांत असावेत असें दिसतें. ह्या शिलालेखांवरून व तत्कालीन अवशेषांच्या शिल्पावरून असेंहि दिसून येतें की, इ. सनाच्या पहिल्या शतकात महावीर-दंतकथा सांप्रत उपलब्ध असल्याप्रमाणेंच होती. जैन साधूंनीं नग्नवृत्तीनें रहावें अशाबद्दल घालून दिलेल्या नियमात श्वेतांबरी यानीं फेरफार केलें नाहींत. ह्या एका गोष्टीवरून त्यांनीं धर्मग्रंथांत लागेल तसे फेरफार करण्याचें धाडस न करतां एकंदर धर्मज्ञान शक्य तितकें, आहे ह्या स्थितींत राखण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. शिवाय ही जैनपरंपरा पुष्कळशा बाबतींत बौद्ध परंपरेसारखीच आहे, ह्याबद्दल बरीचशी खात्री ह्या शिलालेखांवरून पटते.

वरील विवेचनावरून ही गोष्ट मात्र सिद्ध होते कीं, जैनांचे 'सिद्धांत' ग्रंथ एकाच वेळीं रचले गेले नसावेंत. देवद्धींनें संग्रथन केलेले व सांप्रत आपणांस उपलब्ध असलेले जैन धर्मग्रंथ हे त्या काळच्या वाङ्मयात्मक चळवळीच्या अगदीं शेवटी शेवटीं रचले गेले, व लागलींच जैन पंथांची संन्यासवृत्तीची सुव्यवस्थित स्थापना झाली. ह्या गोष्टी महावीरनिर्वाणानंतर लवकरच घडून आल्या असाव्यात. अर्थात् ह्या जैन धर्मग्रंथांपैकीं प्राचीन भागाचा काळ महावीराच्या अगदीं पहिल्या शिष्यांच्या अमदानीचा. म्हणजे इ. सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पुष्कळ मागें लोटता येईल. वरील जैन दंतकथेप्रमाणें हा काल मौर्य चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत येतो व ह्यापैकीं अगदीं मागाहूनचा भाग देवर्द्धिगणीच्या कालांत तयार झाला असावा.

यानंतर जैन धर्मग्रंथांतील एक एक भागाकडे आपण क्रमश: वळूं.