प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

आठवीं नववीं अंगें, अंतगडदसाओ व अणुत्तरोवा इयदसओ. -पुढील दान अंगांनां वाङ्मयात्मक दृष्टीनें कमी महत्त्व आहे. यांची रचना सातव्या अंगाप्रमाणेंच केली आहे. आठवें अंग ''अंतगडदसाओ'' नामक १० प्रकरणांचें असून देखील, सांप्रत त्याचीं आठ प्रकरणांत विभागणी झाली आहे. नववें अंग ''अणुत्तरोवाइयदसाओ'' हें असून त्याची तीन प्रकरणें व प्रत्येक प्रकरणाचे ३३ परिच्छेद आहेत. बाह्यस्वरूपावरूनहि ह्या ग्रंथांनां वाङ्मयदृष्टया फारसें महत्त्व देतां येत नाहीं. कारण हीं कथानकें एकाच पद्धतीनें सांगितलीं आहेत; इतकेंच नव्हे तर ग्रंथकारानें फक्त ठरलेल्या सांचांत लागतील ते शब्द व वाक्यें घालावयाची एवढेंच काम केलेलें दिसतें. उदाहरणार्थ एका आख्यायिकेंत म्हटलें आहे. ''चंपा नांवाचें एक नगर, 'पुण्णभद्द' नांवाचा पवित्र निधि व एक अरण्य होतें. वर्णन. '' याचा अर्थ इतकाच कीं, नगर निधि व अरण्य यांचें पहिल्या उपांगांत असलेलें ठराविक वर्णन त्या त्या ठिकाणीं घालावयाचें. त्याचप्रमाणें महावीराचा एक शिष्य 'थेर सुहम्म' ह्याच्याबद्दल उल्लेख करतांना इतकेंच सांगितलें आहे की सहाव्या अंगांत सापडतें त्याप्रमाणें या ठिकाणींहि ह्या पवित्र मनुष्यांचें वर्णन घालावयाचें. हीं वर्णकें' (वर्णनें) लांब समासघटित भाषेंत रचलेलीं असून ह्या धर्मग्रंथांतील जुन्या पद्यभागापैकीं असावींत. सुप्रसिद्ध पंडित याकोबी यानें अशी उपपत्ति काढली आहे कीं यद्यपि प्राचीन टीकाकार हीं वर्णकें गद्यभाग समजतात व जरी ह्या वर्णकांचीं वृत्तें जुन्या भारतीय पद्यवाङ्मयांत कोठेहि सांपडण्यासारखीं नाहींत, तथापि ही वर्णकें जुन्या पद्यभागाप्रमाणच वाचलीं पाहिजेत. परंतु डॉ. विंटरनिट्झ याच्या मतें. ही उपपत्ति चुकीची आहे. कारण ह्या वर्णकांची भाषा समासघटित गद्यभागापेक्षां भिन्न दिसत नाहीं. असली वर्णकें इतर सर्व धर्मग्रंथांत सांपडतात परंतु 'गोयम' राजपुत्राचा विवाह, अशासारख्या प्रसंगी हीं वर्णनें ज्या ज्या ठिकाणीं दिलेलीं आढळतात त्या त्या ठिकाणीं ती अगदीं नीरस असून त्यांत अनेक गोष्टींचीं नांवें मात्र पुष्कळ आढळतात. परंतु राजपुत्र सर्वसंगपरित्याग करण्याचा निश्चय करीत असल्याबद्दलचा व त्याचे आईबाप त्यास त्या निश्चयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा कथाभाग ज्या वेळीं येतो त्या वेळीं मात्र कथानकास बराच रंग चढलेला दिसतो. ८ व्या अंगांत ‘गायेम’ ह्या संप्रदायांत प्रवेश होण्याबद्दल विनवणी करतो त्या वेळीं तो पुढील उद्गार काढतों:-''विश्व हें अग्निज्वालेच्या मध्यभागीं आहे. वार्द्धक्य व मृत्यु त्यांच्या वणव्यांत जगाची राखरांगोळी होत आहे. '' ह्या ठिकाणीं बुद्धाच्या सुप्रसिद्ध ''अग्निरूपकपूर्ण'' उपदेशाचें स्मरण होतें. हें अंग भारतीय दैवतकथा व भारतीय धार्मिकसंप्रदायाचा इतिहास ह्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचें आहे. कारण ह्या अंगात महाभारतांतील कृष्णकथा जैनांनी केलेल्या थोडया रूपांतरानें आलेली आहे. द्वारावती नगरीचा समुद्रांत प्रवेश व कृष्णनिर्याण हे दोन प्रसंग महाभारतांतील कथेप्रमाणेंच वर्णन केले आहेत. फक्त त्यांत फरक इतकाच केला आहे कीं निर्याणापूर्वी कृष्णानें जैन धर्माची दीक्षा घेतल्याचें दाखविले आहे.

नवव्या अंगांत पवित्र मुनी उपोषण वृत्तीनें मृत्युमुखांतून अंतिम निर्वाण कसे प्राप्त करून घेतात. ह्याचें अत्यंत कंटाळवाण्या एकच एक पद्धतीनें वर्णन केलें आहे. अर्थात् हें ''वैराग्याच्या'' अनुपम सौंदर्यांचें वर्णन त्याचप्रमाणें तपस्व्याच्या कृश झालेल्या प्रत्येक अवयवाचें उपमा, रूपकें इत्यादि अलंकारांनी भूषित केलेलें नीरस वर्णन, सांप्रत विसाव्या शतकांत तरी मानवी प्राण्यास चित्ताकर्षक होणार नाहीं. एका बाजूस जैन मुनींच्या ठिकाणीं आढळून येणारें मृत्युबद्दलचें उत्कट प्रेम, व त्याच्याच उलट एका क्षुद्र कृमीची किंवा तृणांकुराची हत्या होईल ह्याविषयीं क्षणोक्षणीं वाटणारी भीति ह्या जैनांच्या दोन्ही धार्मिक वृत्ती किती परस्परविरुद्ध आहेत ही गोष्ट अत्यंत मौजेची आहे.