प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

दुसरें अग, सूयगदाङ्ग. - जैनसिद्धांतांतील दुसरें अंग ''सूयगदाङ्ग'' हें होय. ह्यांतील विषय जैन मुनींचा पवित्र आयुष्यक्रम कसा असावा हा असून ह्यांतील बराचसा भाग प्रतिपक्षीयांचीं मतें खोडून काढण्यांत गेला आहे. ह्या अंगाचेहि दोन खंड आहेत व त्यांपैकी प्रथम खंड प्राचीन असून दुसरा खंड उत्तरकालीं जोडलेला असावा.

ह्या पहिल्या खंडाची रचना पद्यें श्लोक व इतर कृत्रिम वृत्तांत केली असून त्यांतील उपमा वगैरेंवरून ग्रंथकर्त्यांस कवि म्हणवून घेण्याची हौस असावी असे दिसतें. ह्यांपैकी कांहीं उपमा अत्यंत समर्पक आहेत. उदाहरणार्थ ''हिंस्त्र पक्षी ज्यांनां अद्याप उडतांहि येत नाहीं अशा कोंवळ्या पिल्लांवर झडप घालून त्यांनां ज्याप्रमाणें लांबवितात त्याप्रमाणें सदसद्विवेकशून्य माणसें तरुण तपस्व्यांनां कुमार्गास लावण्याचा प्रयत्न करीत असतात'' (१.१४,२) तरुण तपस्व्यांस दुसऱ्या संप्रदायप्रवर्तकांनी स्थापन केलेल्या भिन्न भिन्न मतांपासून दूर राखणें. मार्गांत येणाऱ्या अडचणी व मोह यांचें निवारण करण्याबद्दल त्यांस उपदेश करणे त्याचप्रमाणे आपल्या (जैन) मतांवर पूर्ण श्रद्ध ठेवावयास लावून उच्चतम पदाकडे त्यांनां नेणें हाच या ग्रंथाचा स्पष्ट उद्देश आहे.

या ग्रंथाच्या आरंभी महावीराच्या जैन तत्त्वज्ञानविरुद्ध असलेल्या बौद्ध व इतर सांप्रदायिक मतांचा निषेध केला आहे. अर्थात् कर्म व संसार यासंबंधीं केलेलें विवेचन मात्र इतर मतांतील विवेचनासारखेंच आहे. मठांतील जीवनक्रमांतील दु:खें व संकटें यांचें या भागांत हुबेहुब वर्णन आढळतें. परंतु नवख्या मनुष्यानें त्यांनां पाहून भिऊन जातां उपयोगी नाहीं त्याचे मित्र व आप्तेष्ट भावी कुटुंबिक आयुष्यक्रमांतील सुखदायक प्रसंग त्याला भडक रंगात मोहक पद्धतीनें दाखवून मुनिवृत्तीपासून त्याला भडक रंगात मोहक पद्धतीनें दाखवून मुनिव्रतीपासून त्याला परङसुख करण्याचा प्रयत्न करीत असतात राजे, सावत्र, ब्राह्मण, क्षत्रिय त्याला ह्या व्यावहारिक जगात बळेंच ओढण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु ह्या सर्व मोहपाशांतून त्याला पुढें मार्ग आक्रमावा लागतो जुगारी, नास्तिक हे त्याच्यावर वारंवार आघात करीत असतात. परंतु नवख्या तपस्व्यास ह्या लोकांनांहि धैर्यानें तोंड द्यावें लागतें. परंतु सर्वांत स्त्रिया ह्या नूतन तापसास मोह घालण्याचा शक्य तो प्रयत्न करीत असतात. तेव्हां विशेषत: अशा स्त्रियांच्या जादूगरीपासून त्याला फार दूर रहावें लागतें. एकदां मनुष्यप्राणी स्त्रीमोहांत गुरफटून गेला म्हणजे त्याचीं काय स्थिति होते ह्याचें वर्णन अत्यंत विनोदपूर्ण आहे. रथवाहक ज्याप्रमाणें रथचक्रांस लागेल तिकडे लागेल तशी गति देतो त्याप्रमाणें स्त्रिया मोहबद्ध पुरुषास भोवऱ्यासारखा गरगर फिरवितात. अशा पुरुषांची स्थिती नंतर काय होते याचें वर्णन नंतरच्या श्लोकांत केले आहे.

पुष्कळ पुराणें किंवा बौद्धसुत्त यांच्याप्रमाणें या जैन अंगांच्या एक पोटभागांत नरक व त्यातील यातना (१.५ १) यासंबंधी हृदयस्पर्शी वर्णन आहे. तरी पण पुन:पुन्हां ग्रंथकारानें परपक्षखडनाचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ १.७ मध्यें असें म्हटलें आहें कीं:-''शीतोदकाच्या अंजलिदानानें पूर्णपदाची प्राप्ति होते ही गोष्ट जर खरी असेल तर मासे, कासवें सर्प इत्यादि अनेक जलचरांनां पूर्णपदप्राप्ति होईल जलस्नान जर मनुष्यप्राण्याचीं अनंत पातकें धुवून काढीत असेल तर तेंच पुण्यफलेंहि नाहींशी करील. ब्राह्मण म्हणतात की प्रतिदिन अग्नि प्रज्वलित केल्यानें मुक्ति प्राप्त होते. परंतु हें जर खरें असेल तर सोनार, लोहार, घिसाडी इत्यादि धंदेवाईक लोकांनां अनायासें मोक्षप्राप्ति होईल. ''

हा ग्रंथ एकाच ग्रंथकारानें रचलेला असण्याचा संभव आहे. परंतु त्यापेक्षां एकाच गृहस्थानें एकाच विषयावरील विविध श्लोक व उपदेश पाठ एका ठिकाणी गोळा केले असण्याचा संभव आहे. ह्याच्या उलट गद्यांत रचलेलें दुसरें प्रकरण लहान लहान स्फुटांचें बनलेलें आहे. ह्यामध्यें देखाल परमतखंडन हाच मुख्य विषय असल्यामुळें त्याचें संग्रथन ह्या ठिकाणीं झालें असावें. भारतीय पंथाविषयींच्या माहितीच्या दृष्टीनें हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे.