प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

परिशिष्ट.

धर्मग्रंथांचे भाग, प्रथम अंग, आयारंग सुत्त - 'सिद्धंत' ग्रंथांतील पहिलें अंग ''आयारंगसुत्त' (आचारांग सूत्र)नामक असून त्याचे 'श्रुतस्कंधे (विभाग) दोन आहेत, व त्यांमध्यें एकंदर आचारांचे विवेचन आहे. त्यांपैकीं पहिला भाग दुसऱ्यापेक्षां एकंदरीनें जरी अधिक प्राचीन दिसतो तरी त्यामध्यें देखील विसदृश ग्रंथाचें एकीकरण आढळतें. ह्या ग्रंथांत बौद्ध वाङ्मयाप्रमाणें गद्य व पद्य भागांचें मिश्रण आढळतें. कधीं कधीं सारख्या एकामागून एक कविता आढळतात, तर कधीं गद्य भागच सारखा सांपडतो व पुन्हां लागलीच गद्य व पद्य आळीपाळीनें असलेलें आढळतें. ह्यांतील मुख्य विषय म्हटला म्हणजे अहिंसा, भूतदया इत्यादि गोष्टींबद्दल उपदेश व निरनिराळ्या प्रकारचे वागणुकीचे नियम सांगणे हा होय. उदाहरणार्थ:-

''ह्याप्रमाणें माझें म्हणणें आहे. भूत, वर्तमान व भविष्य ह्या तिन्ही कालांतील पूज्य 'अर्हत्' व माननीय 'भगवत्' यांचेंहि असेंच म्हणणें आहे. ते नेहमीं असाच उपदेश करतात व नेहमीं ह्या गोष्टीचें विवेचन करतात की:-

''कोणीहि मनुष्यानें कोणत्याहि सजीव प्राण्याची हत्या करूं नये, किंवा त्यास वाईट शब्द बोलूं नयेत किंवा दुसऱ्या कोणत्याहि प्रकारें त्यास त्रास देऊं नयें. विश्व जाणणाऱ्या सूक्ष्म दृष्टीच्या साधुपुरुषांनीं लावून दिलेल्या धर्माची ही पवित्र सनातन व असकृदुपदिष्ट अशी आज्ञा आहे.

''तुम्हांला ज्या भावना आहेत त्याच प्रकारच्या भावना तुम्ही ज्याला ठार करणार त्याला आहेत. तुम्ही ज्याला गैरशिस्तपणें वागवितां, अत्यंत त्रास देतां त्या प्राण्याला देखील तुम्हांप्रमाणेंच सुखदु:खांच्या संवेदना होत असतात ही गोष्ट मनांत बाळगून जो कोणी वर्तन करील तो दुसऱ्याचा वध स्वत: करणार नाहीं व करण्यास परवानगी देणार नाहीं. ''

बौद्धधर्मीय भिक्षुवृत्तीच्या नियमांमध्यें जैनधर्मीय यतिवृत्तीच्या नियमांपेक्षां विशेष भेद असा आहे कीं, जैन धर्माज्ञा अतिकडक तापसवृत्तीवर जोर देतात, इतकेंच नव्हे तर धर्मदृष्टया आत्महत्याहि करण्यास सांगतात. ''जैन मुनीनें शीतापासून त्रास होत असला तरी थंडीने गारठून मरावें परंतु आपल्या व्रताचा भंग होऊं देऊं नये. जर तो दुर्बल व आजारी असला तर एक वेल त्यानें मृत्यु पत्करावा परंतु उपवासव्रतभंग करूं नये. चालतांना गवताच्या पात्या टोंचतील, डांसचिलटें चावतील, वाईट घाणेरड्या दुष्ट हवेपासून त्रास होईल अशा तऱ्हेनें नग्नस्थितींत फिरावें (१.८,८). '' ह्या लांबलचक अशा महत्त्वाच्या पद्यमय उताऱ्यामध्यें बौद्धग्रंथांत आढळून येणारी एक नेहमींची आज्ञा आली आहे ती ही:-''त्यानें (मुनीनें) जिवंत राहण्याची इच्छा करावयाची नाहीं किंवा मृत्यु येण्यासाठींहि अधीर व्हावयाचें नाहीं. '' परंतु त्यानंतर लागलींच, पूर्ण शहाण्या मनुष्यानें उपवास करीत करीत हलके हलके मृत्यूचा पल्ला कसा गांठावा ह्याबद्दलच्या निरनिराळ्या पद्धतींचें विवेचन दिलें आहे. त्यानंतर कर्मआख्यानपर कव्य आहे. वस्तुत; ह्या भागास पद्य किंवा गद्य यांपैकीं काय म्हणावें याचीच शंका आहे. ह्या ''उवहाणसूयम्'' नामक भागामध्यें महावीराच्या तापसवृत्तीचें अतिशय हुबेहुब वर्णन केलें आहे.

''तो (महावीर) अनिकेत अशा नग्नवृत्तींत इकडे तिकडे फिरे, लोक त्याला खूप झोडपीत व त्याला त्रास देत. परंतु त्याचें ध्यान कधींहि भंग पावलें नाहीं. लाढ देशांतील रहिवाशांनीं त्याचा अत्यंत छळ केला व त्याजवर कुत्रें सोडले, त्यांनीं काठ्या व हाताच्या मुठी त्यांनीं त्यास खूप मारलें व त्याच्या अंगावर फळे, मातीचीं ढेकळे व मृत्कुंभाचे तुकडे वगैरे फेंकले व अशा रीतींने अनेक प्रकारच्या त्रासांनीं त्याचें ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु संग्रामांतील मुख्य सेनानीप्रमाणें महावीरानें ह्यापैकीं कोणत्याहि गोष्टीस जुमानलें नाहीं. कसलीहि जखम झालेली असो नसो त्यानें कधींहि औषधोपचार केले नाहींत. तो कधींहि स्नान करीत नसे किंवा दांत घाशींत नसे. हिवाळ्यांत छायेखालीं तो ध्यान करी व उन्हाळ्यांत सूर्याच्या प्रखर उन्हांत बसे. तो महिनेच्या महिने पाणी पीत नसे, व भोजनाचा सहावा, आठवा किंवा दहावा हिस्सा अन्न ग्रहण करून कोणत्याहि प्रकारची वासना न ठेवतां ध्यानमग्न राही. ''

'आयारंगा' चा दुसरा खंड त्याच्या पोटभागास दिलेल्या ''कुटें'' या नांवावरून बराच उत्तरकालीन दिसतो. ह्यांपैकीं पहिल्या दोन कूटांमध्यें भिक्षावृत्ति व पर्यटन त्याचप्रमाणें भिक्षु व भिक्षुणी यांची दिनचर्या कशी असावी ह्याबद्दल नियम सांगितले आहेत. तिसऱ्या कूटामध्यें महावीराच्या चरित्रास उपयुक्त असें साहित्य आहे व ह्याचाच उपयोग भद्रबाहूनें ''कल्पसूत्र'' रचतांना केला आहे. ह्या पुस्तकाची समाप्ति बारा श्लोकांनी केली आहे, व हे श्लोक काहींसे बौद्धंच्या 'थेरगाथा' सारखें दिसतात.