प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
सात स्वरांचे प्राचीनत्व.– सामगायनामध्ये येणाऱ्या सात स्वरांची नांवे सामविधान ब्राह्मण या ग्रंथांत दिली आहेत ( प्र. १ खं. १ ).  तीं (१) क्रुष्ट, (२) प्रथम, (३) द्वितीय, (४) तृतीय, (५) चतुर्थ, (६) पंचम व (७) अन्त्य अशी आहेत.  याच ग्रंथामध्ये आणखी एका ठिकाणी या स्वरसप्तकाचा उल्लेख आहे.  त्यात ‘पंचम’ या स्वराला ‘मंद्र’ व ‘अन्त्य’ या स्वराला ‘अतिस्वार्य’ अशी नांवे आली आहेत.  नारदी शिक्षेंतहि या सप्त स्वरांचा उल्लेख आहे ( अ. १ कं. १ ).  तो असा :- प्रथमश्च द्वितीयश्च तृतीयोथचतुर्थक: ।  मन्द्रष्टोह्यतिस्वार एतान्कुर्वन्ति सामगा:.  परंतु या श्लोकामध्ये सर्वांत उच्च असा जो ‘क्रुष्ट’ स्वर तो ‘मन्द्र’ स्वराच्या पुढे व अतिस्वार्यस्वराच्या मागें का दिला आहे हे समजत नाही.  लौकिक गायनांत षड्ज, ॠषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद असे सात स्वर आहेत; व त्यांचीच नामाक्षरे संकुचित करुन सा, रि, ग, म, प, ध, नी या सात संज्ञा रुढ झाल्या आहेत.  सामगायनांतील स्वरसप्तक व लौकिक गायनांतील स्वसप्तक यांमध्ये स्थूल असा जो एक फरक आहे तो असा की सामगायनांतील स्वरसप्तक अवरोहस्वरुप असून लौकिक गायनांतील स्वरसप्तक आरोहस्वरुप आहे.  म्हणजे सामगायनांतील स्वर एकापेक्षां एक उतरता अशा क्रमानें असून लौकिक गायनांतील स्वर हे एकापेक्षां एक चढ ( उच्च ) अशा क्रमानें आहेत.  याशिवाय पूर्वोक्त दोन स्वरसप्तकांत आणखी कोणता फरक आहे तें वर जें नारदीय शिक्षेंतील सूत्र दिलें आहे त्यावरुन ध्यानांत येईल.  त्या सूत्राचा अर्थ असा की सामगायकांचा जो ‘प्रथम’स्वर तो वेणूचा-बांसरीचा-पाव्याचा किंवा अल्गुजाचा अर्थात् लौकिक गायनाचा - ‘मध्यम’ स्वर होय.  याचप्रमाणे द्वितीय स्वर तो गांधार, तृतीय स्वर तो ॠषभ, चतुर्थ स्वर तो षड्ज, पंचम स्वर तो धैवत, षष्ठ स्वर तो निषाद आणि सप्तम स्वर तो पंचम स्वर होय इत्यादि वर सांगितलेच आहे.