प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
अर्वाचीन संगीतज्ञ व संगीत संस्था- कोचीन आणि त्रावकोर या संस्थानांचे बरेच राजं आणि युवराज चांगले सगीतज्ञ होते. त्यांत पेरूमाल महाराज हा अत्यंत प्रसिद्ध होता. त्याची पद्ये संस्कृत, तामीळ, तेलगु, मलायालाम्, हिंदुस्थानी् मराठी, इतकया सहा भाषांत आहेत.
बंगालमध्ये १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत सर एस्. एम्. ठाकोर याने संगीतावर बरेच महत्वाचे ग्रंथ लिहीले. त्याचा 'युनिव्हर्सल ऑफ म्यूझिक' हा ग्रंथ बराचसा उपयुक्त आहे. टागोरसुद्धां इतर अनेक बंगाली पंडितांनी रागांकरितां जुनें हिंदुस्थानी राग-रागिणी-पुत्र हेंच वर्गीकरण मान्य केले आहे.
डॉ.रवींद्रनाथ टागोर हे सर एस्.एम्. टागोर यांचेच नातलग असून त्यांनी बंगाल्यातील संगीतवार बराच महत्वाचा परिणाम घडवून आणला आहे. त्यांनी बंगाली संगीतांतला जुना क्षुण्ण मार्ग सोडून देऊन आपल्या रागांना कांही नवीनच दिशा लावली आहे. त्याच्या पद्यांत संगीत आणि काव्य या दोन्ही दृष्टींनीं कित्येक अलौकीक गुण आढळतात. त्यामुळे त्यांची सर्व बंगालभर प्रसिध्दि झाली आहे.
हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांचें पदरी अद्यापही पुष्कळ प्रसिद्ध गवई आलेले आढळतात. परंतु दुर्देवानें यापैंकी पुष्कळसे राग आणि रागिणी यांच्या बाबतींत जुन्या पूर्वपरंपरागत पद्धतीवरच अवलंबून असतात. हिंदुस्थानी संगीतांत सर्वत्र मान्य असलेली अशी एक पद्धति आढळत नाही. तथापी अशी एक पद्धति तयार करण्याचा पुष्कळ विद्वानांचा आज प्रयत्न चालू आहे. दक्षिणेकडील संगीतपद्धति या मानानें फारच काळजीपुर्वक तयार केलेली असून तिच्यांत जर कांही दोष असेल तर तो अतिबद्धता हा होय. १९ शतकातल्या अखेरीच्या काही दशकांत हिंदुस्थानात संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा कार्यांत बरीच प्रगती दष्टीस पडते. या काळात सर्व हिंदुस्थानभर संगीतशाला व गायनवादनसंस्था पुष्कळच निघाल्या आहेत, आणि आजकाल मुबंई, पुणे, बंगलोर, लाहोर, ग्वालेर, बडोदा, तंजावर, म्हैसुर, त्रिवेंद्रम्, कलकत्ता अशा दूरदूरच्या ठिकाणी अशा संस्था चालू आहेत. मुबंई येथें चालू असलेलें गांधर्व-महा-विद्यालय हें मूळ लाहोर येथें पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांनी १९०१ मध्यें स्थापन केलें व नंतर १९०८ मध्यें तें मुंबईस आणनें. या विद्यालयाची मोठी सुंदर इमारत हल्ली सॅढर्स्ट रोडवर झाली असून या संस्थेला अनेक महाराजांची व सरकारी अधिका-याची मदत आहे. या संस्थेचे वार्षिक उत्पन्न ३० हजारांहुन अधिक असून स्त्रीपुरूष मिळुन ४० वर अधिक शिक्षक या संस्थेंत काम करीत असतात. येथें संगीतसंघ या नांवाची एक संस्था नुकतीच निघाली असून हिंदी व यूरोपीयन संगीतपद्धतीचे एकीकरण करण्याचे प्रयोग चालू असतात.
संगीतशास्त्राच्या प्रगतीप्रीत्यर्थ अगदी अलीकडील महत्वाचा प्रयत्न म्हटला म्हणजे अखिल-भारतीय-संगीत परिषदेच्या भरत असलेल्या बैठकी हा होय. या परिषदेची मूळ स्थापना इ.स. १९१६ सालीं 'ऑल-इंडीया-म्यूझिक अकेडमी' ही संस्था निर्माण झाली. वरील परिषदेच्या बैठकी १९१८ पासून दरसाल भरत असतात. हिदुस्थानांतील संगीताच्या अभ्यासास उत्तेजन देण्याचया कामी आणि हिंदुस्थानी रागांची पद्धतशीर मांडणी करण्याच्या कामी या परिषदेने पुष्कळ महत्वाची कामगिरी बजावली आहे. या परिषदेच्या निमित्तानेच हिंदुस्थानातल्या अनेक दूरदूरच्या भागातले संगीत शास्त्रज्ञ आणि गवई एकत्र जमून संगीत संबधाच्या प्रश्रांचा उहापोह करतात. त्यामुळे अनेक जातीच्या आणि पद्धतीच्या संगीतज्ञांचा विचारविनीमय होऊं शकतो. हिदुस्थानांतील राग रागिण्या यांचे योग्य प्रकारचे स्वर लेखन बनविण्याचाहि प्रयत्न चालू आहे. ऑल इंडिया अकेडमीला अनेक प्रमुख हिंदी संस्थानिकांची मदत असून तिला रा.व्ही.एन्. भातखंडे हया हिंदी संगीतज्ञाची चांगली मदत आहें. या संस्थेत संगीतशास्त्रांत नवे नवे शोध लावण्यायस लागणारें साहित्य जमविले असून संगीतशास्त्रावरील उत्तम निवडक ग्रंथहि तेथे ठेवण्यात आलेले आहेत. या सर्व साधनांच्या सहाय्याने सर्व हिंदुस्थानांतील रागांची व्यवस्थित मांडणी करणे आणि सर्व रागिण्यांनां एका पद्धतीत बसवणे हीं कामें करण्याचा या संस्थेचा उद्देश आहे.