प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
अवरंगजेबाच्या कारकीर्दींत संगीताची निराश्रितावस्था.– अवरंगजेब बादशहाच्यां वेळी संगीताला दरबारांतून अर्धचंद्र मिळाला.  त्या संबंधाची अशी एक गोष्ट सांगतात की, त्या वेळच्या गवयांनी आपल्या दु:स्थितीकडे बादशहाचें लक्ष वेधण्यासाठी त्याच्या सज्ज्यावरुन एक उत्तम शृंगारलेले प्रेत तिरडीवर घालून प्रेतयात्रेच्या वेळी म्हणावयाचीं गाणी मोठमोठयानें सुरांत म्हणत नेले.  बादशहानें त्यासंबंधी चौकशी केली.  तेव्हां त्याला असें सांगण्यांत आलें की, त्याची खपामर्जी झाल्यामुळें संगीतकला निराश्रित होऊन मरण पावली आहे व तिचें प्रेत पुरण्याकरितां नेत आहेत.  तें ऐकून बादशहानें एकदम उत्तर केलें, “फार उत्तम ! आतां तिला चांगली खोल पुरुन तिचा स्वर किंवा प्रतिध्वनि कांहीहि ऐकूं येणार नाहीं अशी व्यवस्था करा.”