प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       

 सामवेदावरील ब्राह्मणे.– सामवेदावरील ब्राह्मणे कोणकोणती व त्यांचा क्रम कसा हे सायणाचार्यांनी दिले आहे.  ते म्हणतात.

अष्टौ हि ब्राह्मणग्रंथा : (१) प्रौढ ब्राह्मणमादिमं  ॥
(२) षडविशाख्यं द्वितीयं स्यात्तत: (३) सामविधिर्भवेत्  ॥
(४) आर्षेयं (५) देवताध्यायं (६) मंत्रं वोपनिषत्तत:  ॥
(७) संहितोपनिषद् (८) वंशो ग्रन्था अष्टवितीरिता: ॥

यावरुन असे स्पष्ट होते की समवेदावरील ब्राह्मणग्रंथ म्हणजे (१) प्रौढ ( तांडय ), महाब्राह्मण किंवा पंचविंश ब्राह्मण, (२) षडविंश, (३) सामविधान, (४) आर्षेय, (५) दैवत, (६) उपनिषद् (७) संहितोपनिषद् व (८) वंश हे होत.  यापैकी प्रत्येक ब्राह्मणाकडे थोडेसे लक्ष देऊ.

[ १ ]  तांडय किंवा पंचविंश ब्राह्मण.- या ब्राह्मणाकडे थोडेंसेंच लक्ष देऊन चालणार नाही.  कां की, हा सामवेदविषयक मोठा महत्वाचा ग्रंथ आहे.  यांत संगीतशास्त्राच्या प्राचीन इतिहासावर व अनेक सामाजिक क्रियांवर प्रकाश पाडणारें साहित्य आहे.  शिवाय यांत अनेक आख्यायिकाहि आहेत.  तेवहां हे ब्राह्मण निरनिराळया द्दष्टींनी पृथक्करण करण्यासाठी वगळून इतर ब्राह्मणांकडे वळले पाहिजे.

[ २ ]  षडविंश ब्राह्मण.– हा समवेदावरील दुसरा ब्राह्मणग्रंथ होय.  या ब्राह्मणाचे ५ प्रपाठक किंवा अध्याय आहेत.  पहिल्या प्रपाठकात ७ खंड असून पुढील चार प्रपाठकांत अनुक्रमे १०, १२, ७ व १२ म्हणजे एकंदर ४८ खंड आहेत.  या ब्राह्मण ग्रंथात उध्दृत झालेली विषयवारी येणेप्रमाणे :- सुब्रह्यण्यविधि, सौम्यचरुविधान, बहिष्पवमान धर्म, प्रकीर्णविषय, होत्रकांचे उपाव्हान, ॠत्विग्विधान, नैमित्तिक होम, अध्वर्युप्रशंसा, देवयजविज्ञेयकर्म, अवभृथ, अभिचारक प्रयोग, द्वादशाहस्तुति, श्येनादियागविधि व वैश्वदेवसत्र.

[ ३ ]  साम विधान ब्राह्मण.– सामवेदावरील हा तिसरा ब्राह्मणग्रंथ.  या ग्रंथाचे तीन प्रपाठक आहेत.  तीन प्रपाठकात असलेल्या विषयांचा अनुक्रम पुढे दिल्याप्रमाणे आहे.  १. अध्ययनविधान, पांचरात्रिकसामविधान, साप्तरत्रिकसामविधान, मासाद्यध्येयसामविधान, सप्तसंहितासामविधान, प्रायश्चित्तविधान, अश्लीलभाषणादिकांची प्रायश्चित्ते, उपपातकप्रायश्चित्ते, सुरापानादि महापातकप्रायश्चित्ते, राजप्रतिग्रहादि प्रायश्चित्ते, रसविक्रयादि प्रायश्चित्ते व दु:स्वप्रदर्शनादि प्रायश्चित्ते.  २.  काम्यप्रयोगविधान, मनुष्यवशीकरणप्रयोग, सौभाग्यसिध्दिप्रयोग, यश:सिध्दिप्रयोग, ब्रह्मवर्चससिध्दिप्रयोग व पुत्रप्राप्त्यादिप्रयोग.  ३ धन्यसामप्रयोगविधान, वास्तुशमनप्रयोग, अद्दष्टदर्शनादिप्रयोग, राज्याभिषेकादिप्रयोग, संग्रामजयार्थप्रयोग, जातिस्मरप्रयोग, अग्निस्वायत्तीकरणप्रयोग, पिशाचवशीकरणप्रयोग, दिव्यपार्थिवनिधिलाभसाधनप्रयोग, भौतिकलाभसधनप्रयोग, पुनर्जन्माऽभावार्थ रात्र्युपासना, अभीष्टदेवदर्शनार्थ कुटीप्रवेशादिप्रयोग, अविहितप्रयोग, सामांचा प्रयोग, सूचनोपदेश, विहितप्रयोग, सामांचा अभिप्रायेकत्वोपदेश, सामविधानोपदेशांचे पारंपयोगतत्व, सामविधानब्राह्मणोपदेशपात्रनिर्देश व सामविधानब्राह्मणोपदेश करणाऱ्या ब्राह्मणाला द्यावयाच्या दक्षिणेचे नियम.

या अनुक्रमावरुन सामविधानब्राह्मण म्हणजे श्रौत यज्ञाव्यतिरित्तच् असणाऱ्या विधींची विधाने दाखविणारें आहे असे आढळून येईल.  अग्निहोत्रादि श्रौत कर्मांच्या ऐवजी सर्वकामप्रद म्हणून कांही सामविधाने या ब्राह्मणग्रंथात सांगितली आहेत.  यावरुन श्रौतबाह्य याज्ञिकांच्या किंवा उपासकांच्या वर्गातहि सामविद्येचें म्हणजे गानविद्येचें अस्तित्व दिसून येते.

[ ४] आर्षेय ब्राह्मण.– सामवेदावरील हा ग्रंथ म्हणजे चौथा ब्राह्मणग्रंथ होय.  यज्ञामध्ये जी सामें म्हटली जावयाची असतात त्यांचे ( द्रष्टे ) ॠषी, छंद व देवता ठाऊक नसतील तर दोष घडतो अशा समजुतीने प्रत्येक सामाचा ॠषि, देंवता व छंद ही या ब्राह्मणग्रंथात स्पष्ट केली आहेत.  या ब्राह्मणग्रंथाचें अध्ययन करणाराला गायत्र, गेय, आरण्य व महानाम्नसंज्ञक सामांची नांवे यथाक्रम कळून येतात.  ऊह व ऊह्य सामगानसंबंधीचे ज्ञानहि अतिदेशविधि वगैरेपासून समजून येते.  शिवाय कोणकोणती सामे कोणकोणत्या स्वरांत आरंभ करुन गावीं याविषयीहि थोडीशी माहिती या ब्राह्मणग्रंथात दिली आहे.  त्या माहितीशी आपणांस विशेष प्रयोजन आहे.

[ ५] दैवत ब्राह्मण. – सामवेदाचे हे पांचवें ब्राह्मण होय.  ह्या ब्राह्मणांतील मुख्य विषय, सामांच्या निधनांवरुन म्हणजे धृवपदांवरुन निरनिराळया देवतानुरुप निरनिराळया सामांची वर्गवारी करणे हा आहे.  ह्या ब्राह्मणाचे एकंदर तीन खंड आहेत.  त्यापैंकी पहिल्या खंण्डात प्रथम अग्नि, इंद्र, प्रजापति, सोम, वरुण, त्वष्टा, आंगिरस, पूषा, सरस्वती व इंद्राग्नी ह्या सामदेवता सांगितल्या असून पुढे त्या प्रत्येक देवतांच्या सामांची धृवपदे कशा कशा प्रकारची असतात ह्याचे विवेचन आहे.  दुसऱ्या खण्डात निरनिराळया सामांचे आधारभूत जे वैदिक गायत्री, उष्णिह्र, ककुभ् इत्यादि छंद, त्यांचे शुभ्र, चित्र, असे काल्पनिक वर्ण सांगितले असून त्यांची दैवते कोणती यांचेहि विवेचन आले आहे.  तिसऱ्या खण्डांत ह्या वैदिक छंदाच्या काल्पनिक व्युत्पत्ती दिल्या आहेत.  हा भाग यास्काचार्यांनी निरुक्तांत उध्द्दत केल्यासाखा दिसतो.  ह्या खण्डाच्या शेवटी गायत्रीमंत्राचे गान सामांत कसे असावें याचे विवेचन आहे.

[ ६] जैमिनीयोप निषब्द्राह्मण.- ह्या ब्राह्मणास `तलवकार’ उपनिषदब्राह्मण असेहि दुसरे नांव आहे.  शौनकादिभ्यश्छंदसि । ( ४, ३, १०६ ) ह्या सूत्रामध्ये पाणिनीने `तलवकार’याचा उल्लेख केला आहे.  ह्याच तलवकार ॠषीच्या नांवावर तलवकार शाखा प्रसिद्ध झाली व ह्या शाखेचेच पुढे जैमिनीशाखा हें नांव पडले.  परंतु ह्या फेरबदलाचें कारण मात्र ज्ञात होत नाहीं.

अद्वैतसिध्दंतप्रस्थापक आद्य शंकराचार्य यांनी `केनोपनिषद’ भाष्याच्या प्रस्तावनेत असें म्हटले आहे की, “हे परब्रह्मविषयक उपनिषद नवव्या अध्यायाचा आरंभ असून ह्याच्या पूर्वी ८ अध्यायांमध्ये यज्ञकर्माचे विवेचन केलें आहे.  त्याचप्रमाणे प्राणोपासनेचेहि वर्णन आहे.  ह्या उपनिषदानंतर गायत्रसाम व वंशपरंपरा सांगितल्या आहेत.”

परंतु सांप्रत उपलब्ध असलेल्या ह्या जैमिनीयोपनिषद ब्राह्मणाचा अध्यायक्रम उपरिनिर्दिष्ट अध्यायाक्रमापेक्षा अगदी भिन्न आहे.  ह्या सांप्रतच्या ब्राह्मणाचे एकंदर ४ अध्याय असून पहिल्या तीन अध्यायांनंतर चौथ्या अध्यायाच्या १८ व्या खण्डांत केनोपनि पदास आरंभ होतो, व २१ व्या खण्डांत ते संपते.  वर सांगितलेल्या वंशपरंपरा ह्या उपनिषदापूर्वीच आल्या आहेत व ह्या अंतर्भूत उपनिषदानंतर ७ खण्ड आहेत.  हा फरक होण्याचे कारण उपलब्ध नाही.

ह्या उपनिषदास “गायत्रोपनिषद” असेहि नांव जै. उ. ब्रा. ४. १७ च्या शेवटीच दिलेले आढळते.  कारण एवढेच दिसते की, ह्या ब्राह्मणामध्ये सर्वत्र `गायत्र’ सामाचे वर्णन असल्यामुळे गायत्रोपनिषद हे नांव रुढ झालें असावे.  ह्या ब्राह्मणांतील ३.४० चा आरंभच `तदेतरमृतं गायत्रम् । एतेन वै प्रजापतिरमृतत्वमगच्छदेतेन देवा एतेनर्षय: ॥१॥’ अशा रीतीने `गायत्रसाम’ रुपी अमृताच्या स्तुतीनें केला आहे.

ह्या ब्राह्मणामध्ये दोन स्थली ( ३. ४०-४२ व ४. १६, १७ ) दोन वंशपरंपरा आल्या आहेत.  त्या पुढें दिल्या आहेत.

जैमिनियोपनिषद ब्राह्मण ( ३. ४०-४२ )

ह्या ब्राह्मणाचा शेवटचा खण्ड 'सवित्र्युपनिषद्' या नांवानें १०८ उपनिषदांमध्यें निराळा मानला गेला आहे.

(७)सं हि तो प ष द् ब्रा ह्म ण- सामवेदाच्या इतर ब्राह्मणांप्रमाणें हें ब्राह्मण उत्तरकालीन वैदिक वाङमयांत मोडतें. हया ब्राह्मणाची भाषापद्धति जरी इतर ब्राह्मणग्रंथांसारखीच आहे तरी जुनी वैदिक रूपें हया ग्रंथांत आढळत नाहींत; व हयांतील विषयावरूनहि वरील विधान दृढ होतें. याच्या ३ऱ्या अध्यायांत ''विद्या ह् वै ब्राह्मणमाजगाम'' ही निरूक्तांतील भाषणरूप आख्यायिका थोडया फरकानें आढळते. मागाहूनच्या संस्कृत वाङमयांत हया ग्रंथासंबंधीं फारच थोडे  उल्लेख सांपडतात.

सुप्रसिद्ध सायणाचार्यास हें ब्राह्मण माहीत होतें. हया ब्राह्मणाच्या पहील्या अध्यायांत भिन्न पद्धतीनें साम म्हटलें असतां काय परिणाम होतात हयाचे काल्पनिक वर्णन आहे. २ व ३ हया अध्यायांत 'सामें' व मंत्र यांचा पृथक्त्वानें विचार करण्याच्या कल्पनेचें मूळ स्वरूप दिसतें व हाच विषय मागाहूनच्या फुल्लसूत्र, सामतंत्र वगैरे ग्रंथांत जास्त सविस्तर रीतीनें उपपादिला आहे.हा विषय स्पष्ट शब्दांनीं या ग्रंथांत आला नाहीं, परंतु एकंदर परिभाषेवरून इतकें स्पष्ट दिसून येतें कीं मूळ वैदिक उदात्त, अनुदात्त व स्वरित या तीन स्वरांचा 'साम' गानांतील उच्च, नीच, इत्यादि स्वरांशीं कांहींतरी संबंध आहे ही गोष्ट त्या कालीं ज्ञात झाली असावी.परंतु या ब्राह्मणांत सांगितलेली स्वरपरंपरा मात्र पूर्ण आहे व हयावरूनच हें ब्राह्मण प्राचीन नसावें ही गोष्ट दिसून येते. ४ था अध्याय अत्यंत लहान आहे व त्यामध्यें उपाध्यायास विशिष्ट प्रकारची दक्षिणा दिली असतां कोणतीं फले प्राप्त होतात हया नेहमींच्या मुद्दयाचें वर्णन आहे. हया सर्व गोष्टींवरून हें ब्राह्मण अगदीं उत्तकालीन आहे ही गोष्ट स्पष्ट होते.

(८)  वं श ब्रा ह्म ण- वंशब्राह्मणांत वंशावळीशिवाय दुसरें कांहीं नाहीं. तिचा उपयोग पुढें सामवेदसंप्रदायाच्या इतिहासांत केलाच आहे.

उपर्युक्त आठ ब्राह्मणांपैकीं आर्षेयब्राह्मणास डॉ.बर्नेल यानें जी प्रस्तावना लिहीली आहे तिजवरून सामसंगीत संप्रदायवाङमयाविषयीं कांही माहिती उपलब्ध होत असल्यामुळें तिचा गोषवाराहि पुढें दिला आहे.