प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
इतर संगीतें– भारतीय व पाश्चात्य संगीताहून भिन्न ह्मटली ह्मणजे ग्रीक खेरीज करुन यूरोपांतील जुन्या केल्टिक वगैरे राष्ट्रांची संगीते, वन्य संगीते, मुसुलमानी संगीत, व चिनी जपानी संगीते ही होत. भारतीय संगीताचा परिणाम जेथें जेथें बौद्ध गेले तेथे तेथे झाला. जपानमध्ये शोम् बाद शाहाच्या कारकीर्दीत हिंदुस्थानांतील भिक्षूंनी तेथे भारतीय संगीताचा प्रसार केला. त्याचा काल ख्रिस्तोत्तर ७२४ हा धरला आहे. चिनी संगीत कांही अंशी देश्य आहे व कांही अंशी भारतीय आहे. भारतीय संगीत चीनमध्ये केव्हां गेले हे निश्चयानें सांगतां येत नाही. तथापि जे संगीत देश्य म्हणून वर्णिले जातें त्याची पद्धति तयार करतानां चिनी लोकांनी बॅक्ट्रियन लोकांची मदत घेतली. यामुळे देश्य संगीतांत देखील भारतीयत्व असणें शक्य आहे. बाबीलोनियन, असुरियन, प्राचीन इजिप्त येथील संगीतें कशी होती याबद्दलची माहिती अस्पष्ट आहे. त्यांच्या वाद्यांविषयी मात्र सध्यां आपणांस माहिती आहे. सर्व राष्ट्रांच्या वाद्यांविषयीचा विचार येथें वगळला असल्यामुळे त्यांविषयी सध्यां येथे काही लिहित नाहीं. तसेच निरनिराळया राष्ट्रांच्या गाण्यांविषयी येथें विचार वगळलाच आहे इराणी व अरबी राष्ट्रांमध्ये सप्तस्वरपद्धति दिसते. ती स्वरपद्धति त्यांनी कोठून घेतली याविषयी आपणांस निर्णायक माहिती नाही. तथापि ती भारतीयांकडून गेली असावी अशी शंका येते. कां की पुष्कळ भारतीय संस्कृत ग्रंथांची भाषांतरें त्यांच्या भाषेंत झाली होती. त्यांच्या ‘सप्तस्वरांची नांवे येणेप्रमाणें.
भारतीय सा रे ग म प ध नी
फारसी येक हुक सिक चहर्क पंज्क सेस्क हप्तक्
आरबी दिल मैद सिक् मजमुम् रमल् हसिन् सहसिन्
या नांवांत गांधार व्यक्त करण्यास दोन्ही राष्ट्रांची खूण एकच आहे यावरून फारसी पद्धतीचा अरबीवर परिणाम झाला असावा व स्वरांस सात आंकडयांची नांवें ओळींने असल्यामुळें फारसी लोकांनीं दुसरीकडील सप्तस्वरात्मक पद्धति जशीच्या तशीच उचलून घेतली असावी हें स्पष्ट आहे. विरूद्ध पुराव्याच्या अभावीं आम्हां इराणांत ही पद्धति हिंदुस्थानांतूनच गेली असावी असें धरतों.
भारतीय संगीत व पाश्चात्य संगीत यांमधील फरक मागें वर्णिलाच आहे, आणि भारतीय पद्धतीचें ग्रीक पद्धतीशीं साम्यहि वर्णिले आहे. ग्रीक संगीतांतून अर्वाचीन यूरोपीय संगीत निर्माण झाले. इतक्या गोष्टी आपणांस ठाऊक असतां प्रश्न असा उपस्थि होतो कीं यूरोपीय संगीत हा अंतिक विकास समजून भारतीय संगीत हें त्या विकासाची पूर्वावस्था धरावी की भारतीय व पाश्र्चात संगीत हीं दोन बरोबरीच्या दर्ज्याचे विकास समजावेत ? या दोहोंपैकीं पहिला पक्ष मानला तर राष्ट्राच्या गर्वास कमीपणा येतो आणि दुसरा पक्ष मानला तर ज्या खटपटींनीं व कलेनें पाश्चात्यांस आनंद होतो त्या कलेनें आपल्या लोकांस आनंद होणार नाहीं असें विधान त्यांतून गर्भित होतें. जर पाश्चात्य हार्मनीनें आपणांस आनंद होणार नाहीं असें अनूभवाअंती ठरलें तर दोन्हीं संगीतें सद्दश दर्जाचे विकास ठरविंता येतील. जी कला आपल्या संगीतज्ञास परिचित नाहीं आणि ज्या कलेच्या साहाय्यानें त्यांस पैसा मिळविण्याची ताकद नाहीं ती कला कमी दर्जाची असा आग्रह त्या कलेचे धंदेवाईक अभिमानी किंवा त्यांशी सहानुभूति असलेले इतर अभिमानी करणार.त्या प्रकारच्या अभिमानास पेटून कांहींच सिध्दि होणार नाहीं. यूरोपीय गाणीं आपल्या लोकांस ऐकावयास देऊन जर आपल्या लोकांस तीं आवडलीं नाहीं तर तेवढयावरून यूरोपीय संगीताविरूद्ध निकाल देतां येणार नाहीं. कारण शास्त्र ग्रहण करावयाचें म्हणजे त्यांच्या भाषेशीं आणि पद्यपद्धतीशीं निगडीत असलेल्या चाली उचलावयाच्या असें नव्हे तर चाली आणि राग हे आपलेच घेऊन त्यांच्या पूरणार्थ सापेक्ष स्वरयोजना म्हणजे हार्मनी उत्पन्न करावयाची. या तऱ्हेचा प्रयत्न करून जर आपणांस असें दिसून आलें कीं, हार्मनी असण्यापेक्षां नसलेली बरी, सापेक्ष स्वरयोजनेनें जो आनंद होतो तो सापेक्ष स्वरयोजनेविहीन संगीतानें जो आनंद उत्पन्न होतो, त्यापेक्षां कमी होतो तरच आपणांस भारतीय संगीतांत हार्मनी असावी कीं नसावी, तिच्या अभावीं तें पुरें आहे कीं अपुरें आहे याविषयी प्रामाणिक मत देतां येईल. हा प्रयत्न जोंपर्यत झाला नाहीं तोंपर्यंत हार्मनीची भारतीय संगीतानुरूपयुक्तता ही केवळ लुच्चा आळशी मनुष्याची काम न करण्यास सबब किंवा अपल्याजवळ जो माल असेल तोच गिऱ्हाईकाच्या गळयांत बांधण्याची दुकानदारी खटपट होय असें धरून चालूं. सरते शेवटीं अत्यंत न्यायी व निस्वार्थी न्यायाधीश म्हटला म्हणजे जनतेचे कान होत. तेच या प्रश्नाचा निर्णय करु शकतील. आपल्याकडे आलाप आहेत तितके पाश्र्चात्य संगीतांत नाहींत. त्या आलापाशीं सापेक्ष ध्वनिसंगीतानें मिलाफ करावा वगैरे प्रश्न पुढे उत्पन्न होतीलच आणि हे प्रश्र्न सोडविण्यांत यश आल्यानंतर भारतीय संगीत कला सर्वांत श्रेष्ठ होणें अशक्य नाहीं.