प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
अहोबलाचा संगीतपरिजात ग्रंथ.- १७ व्या शतकांत अहोबल पंडितानें संगीतपरिजात या नांवाचा उत्तरेकडील संगीत पद्धतीवर महत्वाचा ग्रंथ लिहिला. त्याचें १७२४ मध्ये पर्शियन भाषेत भाषांतर झाले. अहोबलाला रागतरंगिणी आणि रागविबोध हे दोन्ही ग्रंथ अवगत होते असें दिसतें. पारिजात ग्रंथातील शुद्धस्वरसप्तक तरंगिणी ग्रंथातल्यासारखेंच आहे. अहोबलाने एका सप्तकांत एकंदर २८ श्रुती असतात असें मानले आहे. परंतु रागांचे वर्णन करतांना तो बारांपेक्षा अधिक श्रुतींचा उपयोग क्वचितच करतो. त्याने एकंदर १२२ निरनिराळे राग दिले आहेत. १२ स्वरांचे वर्णन वीणावाद्याच्या तारांच्या लांबीच्या प्रमाणांत देणारें पारिजात हें पहिलेंच पुस्तक होय. यामुळें अहोबल जसे स्वर काढीत असे तसे आजहि आपणांस काढता येतात.