प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          

इतरत्र उल्लेखिलेली वृत्तांची संख्या.- वृत्तांची  यादी मुख्यत: आपणांस अग्निचयानमध्यें ठिकठिकाणीं सांपडते. प्रत्येक इष्टका गूढ अर्थाची द्योतक असते. त्यांत आढळणाऱ्या ' सतो वृहती ' या नांवावरून ह्या वेळीं छंद:शास्त्राची परिभाषा बरीच वाढली होती असें दिसतें. ही परिभाषा कांहीं गूढ गोष्टींवर अवलंबून नसून वृत्तविषयक प्रमाणांवर अवलंबून आहे ही गोष्ट विचारांत घेण्यासारखी आहे; व यज्ञविषयक वाडमयांतील छंदाच्या उल्लेखांवरून ही गोष्ट उत्तम रीतीनें सिध्द होते.

आतां वृत्तासंख्येकडून आपण वृत्तस्वरूपाकडे वळूं. पुढील विवेचनापूर्वी सूचक वाक्य एवढेंच सांगावयाचें कीं, प्राचीन काळीं मात्रेस महत्व नसून पादांतील अक्षरसंख्येसच महत्व होतें.

' सप्तच्छंदासि चतुरुत्ताराणि विराडष्टमानि ' हें छंद:शास्त्राचें प्राचीन पण महत्तवाचें सूत्ररूपी विधान होय. ह्यामध्यें पहिलीं सात वृत्तें हीं त्यांच्या अक्षरांच्या संख्येवर अवलंबून असून  प्रत्येक छंद आपल्या मागल्या छंदापेक्षां चार अक्षरांनीं जास्त मोठा असा हा नियम आहे, व आठवें वृत्त ' विराट् '  आहे. ह्यांतील अक्षरांची संख्या ठरलेली नाहीं. कधीं  कधीं एका पादामध्यें दहा अक्षरें असतात व कधीं कधीं ३०, ३३, ४० अक्षरें असतात.

'' वृत्तांची संख्या सात आहे '' असा उल्लेख पुष्कळ ' ब्राह्मण ' व ' सूत ' ग्रंथांतून आला आहे; आणि बहुत  करून हा उल्लेख म्हणजे वर सांगितल्यासारखाच होय. सर्वांत जुना निर्देश  ऋग्वेदामध्यें पहिल्या मंडळांत आहे तो - गायत्रेण प्रतिमिमीत अर्कं, अर्केण साम, त्रैष्टुभेन वाकम् । वाकेन वाकं द्विपदा चतुष्पदाऽक्षरेण मिमीते सप्त वाणी: ॥ असा आहे. याप्रमाणेंच आणखी कांहीं निर्देश संदिग्धपणें सांपडतात. अक्षरसंख्येच्या पायावर भारतीय छंद:शास्त्र रचलें गेलें. अक्षरसंख्या हीच प्राचीन छंद:शास्त्राचें  मूलतत्व होय हें पूर्वोक्त विवेचनावरून स्पष्ट दिसून येतें. ह्या कालीं वृत्तविषयक विवेचनांत यापेक्षां मुळींच भर पडली  नाहीं. मात्रांचा मुळींच हिशेब केला जात नव्हता, अक्षरांचा लघु, गुरु असा भेद केला जात नव्हता, तर तीं नुसतीं मोजलीं जात असत. ' छंदोमानं ' म्हणजे छंदाचें परिमाण हा शब्द अक्षरसंख्येवरूनच सार्थ झाला.