प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
आर्षेयब्राह्मण व उत्तरकालीन सामवाङमय- भारतवर्षात प्राचीन कालीं ज्या वेळीं वेद हे मुखोव्दव करावे लागत असत त्या वेळीं त्यांचें मूलस्वरूप कायम राखण्यास वेदपाठकांस मदत व्हावी म्हणून लहान लहान अनुक्रमणीग्रंथ प्रत्येक वेदाकरितां तयार केले गेले.परंतु चारहि वेदांवरील अनुक्रमणीग्रंथांच्या मूलस्वरूपांतच बरेच भेद दिसून येतात. हयांपैकीं आर्षेयब्राह्मण हें सामवेदावरील अनुक्रमणीग्रंथांपैकींच असून त्या मानानें इतर वेदांवरील अनुक्रमणीग्रंथ फार अर्वाचीन कालीं अस्तित्वांत आलेले दिसतात. कारण, इतर कोणत्याच वेदावरील अनुक्रमणीग्रंथास ''ब्राह्मण'' ग्रंथाचें स्वरूप असलेलें दिसून येत नाहीं.
ह्याखेरीज मागाहून तयार केलेले सामवेदांतील बरेच अनुक्रमणीग्रंथ आहेत. त्यांपैकीं (१) 'नैगेयानामृक्षवार्षम्' आणि 'नैगेयानामृक्षु दैवतम्'हा द्विपरिच्छेदात्मक एक ग्रंथ असून तो नैगेय शाखेस अनुसरून पूर्वार्चिंक संहितेचे ऋषी व देवता दर्शवितो. (२)''रावणभैत् किंवा चलाक्षर''हा ग्रंथ अशाचपैकीं आहे. त्यामध्यें प्रत्येक सामाचें आद्याक्षर असून त्याचें खंड दाखविणारें एक अक्षर असतें. ह्यामध्यें वर्णक्रमास अनुसरून अक्षरांनीं संख्या दर्शविण्याची पद्धति योजली आहे.त्या अर्थी इ.स.१४०० च्या अलीकडील काळांत हा ग्रंथ झाला असावा. (३) असाच एक काश्यप भट्ट भास्करकृत' आर्षेयदीपिका' नामक ग्रंथ सांपडला असून तो आर्षेयब्राह्मणावर टीकारूप आहे. तो सायणभाष्यापेक्षा जास्त पद्धतशीर आहे. हया ग्रंथाचा कर्ता काश्यप भट्ट भास्कर हा कोण होता, केव्हां झाला इत्यादि माहिती ग्रंथावरून मिळणें अशक्य आहे; परंतु नांवावरून तो कृष्ण यजुवैदावरील प्राचीन टीकाकार कौशिक भट्ट भास्कर याजहून निराळा असावा हें उघड दिसतें.
सामसंहितेच्या पदांविषयीं विवेचन करणारे ग्रंथ पुढीलप्रमाणें आहेत.
(अ) पदपाठ- पूर्व व उत्तर आर्चिकांस हे पदपाठ आहेत; इतकेंच नव्हे तर स्तोभाकरितां देखील असाच एक पदपाठ रचण्यांत आला आहे. आर्चिक पदपाठाची रचना गार्ग्य नामक ऋषीनें केली असल्याबद्दल दंतकथा आहेत.प्रस्तुत ग्रंथकर्त्याचा उद्देश एकंदर सामगायनाची ऋचांशी जुळणी कशी करतां येईल ह्याचें विवेचन करण्याचा असून पुढील टीकाग्रंथांमध्ये हा पहिलाच मार्गदर्शक ग्रंथ आहे.
(आ)ऋ क्तं त्र- हा एक शिक्षाग्रंथ असून याचे पांच प्रपाठक आहेत.ह्यामध्यें एका आधुनिक टीकाकाराचा-बहुतेक सायणाचा-उल्लेख आला असल्यामुळें हा ग्रंथ बराच अर्वाचीन असावा.
(इ)अ व ग्र ह श क - या नावांचा एक सामवेदावरील ग्रंथ आहे. तसाच एक अनवग्रह नांवाचा ग्रंथ आहे पण त्यांबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाहीं.
(ई) शि क्षा - या नावांनें प्रसिद्ध असलेले कांही ग्रंथ विवेचनात्मक आहेत. त्यांतील मुख्य म्हणजे'नारदशिक्षा'असून दुसरे लोमशनयशिक्षा, गौतमीशिक्षा, मांडुकीशिक्षा हे सर्व सामवेदसंबंधी आहेत.या ग्रंथांचा काल अनिश्र्चित आहे; परंतु पाणिनीपूर्वीच्या व्याकरणपरंपरेमध्यें हे ग्रंथ तयार झाल्यासारखे दिसतात.परंतु त्यांची सांप्रतचीं स्वरूपें मात्र अलीकडचीं दिसून येतात.
(उ) स्व र मा त्रा ल क्ष ण- यालाच 'स्तोभानुसंहार' हें नांव आहे.
(ऊ) नि दा न सू त्र - हा ग्रंथ सामवेदांतील छंदांचे विवरण करणारा अति प्राचीन ग्रंथ होय. ह्याचे एकंदर दहा प्रपाठक आहे.
(ॠ) नै गे य सू त्र- नैगेयसूत्र हा सामवेदावरील छंदविवेचक ग्रंथ असून सामवेदासंबंधीं वाङमयांत वारंवार उल्लेखिलेला गोभिलाचार्य हा ह्याचा कर्ता होय.
(ॠ) सा म गा नां छं द- हा ग्रंथ गार्ग्य यानें रचिलेला असून परिशिष्टांपैकीं एक आहे.
समगायकांनां नेहमीं उपयोगीं पडणारे पुष्कळ ग्रंथ आहेत.त्यांमध्यें महत्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणें आहेत.
(अ) पु ष्प अ ग र फु ल्ल सू त्र- हीं दोन निरनिराळीं नांवें उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांत सांपडलेल्या हस्तलिखित प्रतींतील भेद दाखविणारीं आहेत व अजातशत्रुकृत विवरणामध्यें देखील अशा प्रकारचे भेद आढळून येतात. हा ग्रंथ गोभिलानें केला असें म्हणतात. परंतु दक्षिणेकडील प्रतींत वररुचि हा ग्रंथकर्ता असल्याबद्दलचा स्पष्ट उल्लेख आहे. ऊहागान हें फार मागाहूनचें आहे; व त्याचा ज्या अर्थी हया सूत्रांत उल्लेख आला आहे त्या अर्थी हा ग्रंथ अलीकडचाच असावा. उपाध्याय अजातशत्रु यानें या ग्रंथावर टीका लिहीली आहे. हा ग्रंथ अजून चांगलासा लागत नाहीं.
(आ) सा म तं त्र.- वरील फुल्ल्सूत्रांतील उणीवा सामतंत्र या ग्रंथानें भरून काढल्या आहेत. हयामध्यें सामगानाचेंच प्रामुख्यानें वर्णन असून ग्रंथविवेचन सांगोपांग आहे. हया ग्रंथाचे तेरा प्रपाठक माहीत आहेत. परंतु एका प्रतीत' संज्ञाप्रकरण' या नावांचे दोन प्रपाठक जास्त आढळतात; व दुसऱ्या एका गुजराथी प्रतींत 'पर्वप्रकरण' म्हणून आणखी दोन भाग अधिक आहेत. एकंदर ग्रंथ अत्यंत दुर्बोध असून ती सायणानें किंवा स्कंद नामक टीकाकारानें रचली असल्याबद्दल आख्यायिका आहे. दयाशंकर नामक विद्वानानें रचलेली दुसरी अर्वाचीन टीका आहे.
(इ) पं च वि ध सू त्र.- हया ग्रंथाचे दोन प्रपाठक असून त्याच्या कर्तृत्वाचा मान कात्यायनास दिला जातो. हया व पुढील तीन ग्रंथांचा मुख्य विषय सामाचे भाग पाडण्याची पद्धति हाच आहे. वस्तुत: सामगायनाच्या एक किंवा त्यापेंक्षा जास्त ठरीव पद्धती असतात, व त्यामुळें सर्वांनीं मिळून एका आवाजांत सामगानें म्हणणें युक्त आहे. परंतु यज्ञांत सामवेदी हे फक्त सामाचा निधन म्हणजे शेवटचा भाग अथवा पालुपद तेवढेंच इतरांस बरोबर घेऊन म्हणतात; व बाकीच्या सामांचे विभाग करतात. हया विभागांपैकीं पहिला प्रस्ताव हा प्रस्तोत्यानें म्हणावयाचा असून त्याच्या पूर्वीहुंकार असतो. हयानंतर ॐकारानें आरंभ केलेला उद्वीथ नामक विभाग उव्दात्याकडे असतो. नंतर हुंकारयुक्त प्रतिहार नामक विभाग म्हणण्याचें काम प्रतिहर्त्याकडे असतें. कधीं कधीं हया शेवटच्या विभागाचे दोन तुकडे करण्यांत येतात, आणि उद्वात्यांनी गावयाचा उपद्रव हा विभाग शेवटच्या कांही वर्णांनीं बनविण्यांत येतो. 'निधन' हा विभाग सर्वांच्या शेवटी असून तो पालुपदासारखा सर्व उपाध्याय वर्गानें म्हणावयाचा असतो.
(ई) प्र स्ता व सू त्र - हा ग्रंथ वरच्याप्रमाणेंच असून अतिशय लहान आहे.
(उ) प्र ति हा र सू त्र - हयाचे पंधरा लहान विभाग आहेत. एकंदर ग्रंथावर वरदराजाची टीका असून त्यानें हा ग्रंथ कात्यायनप्रणीत असल्याचें सांगितलें आहे.
(ऊ) नि ध न सू त्र - ह्या ग्रंथावरहि वरदराजाचीच टीका आहे.
कोणत्या स्वरांकरितां कोणत्या खुणा उपयोगांत आणावयाच्या याजबद्दल पुढील ग्रंथ उपलब्ध आहेत.
(अ) स्व र प रि भा षा - या ग्रंथाच्या मूळच्या दक्षिणेकडील हस्तलिखितांत सामांची जी एक स्वरलेखनपद्धति आहे तींत सामाच्या चरणांतील पहिल्या अक्षरानंतर व क्कचित् मध्यंतरी एखादें स्वरयुक्त व्यंजन घालतात व हें स्वरयुक्त व्यंजन एखादा स्वर अगर स्वरसमुच्चय दाखवितें.या पद्धतीप्रमाणें पहिल्या सामाचा आरंभ असा आहे.
ओ त ग्ना इ । आ चो य हीणवी इतो या ई ।
ह्या ठिकाणीं त = ४;चो= २,३,१ आणि ण = १,२ आणि प्रेङ्ख ह्याप्रमाणें स्वर असतात. म्हणजे क= १; व के = ७ किंवा त्या पेक्षां जास्त स्वर दर्शविले जातात.
प्राचीन ग्रीक संगीतांत अशाच पद्धतीनें स्वरलेखन करीत असत. ह्या पद्धतींत अशा तऱ्हेच्या ३०० वर पारिभाषिक संज्ञा असल्यामुळें ही पद्धति फारच अवघड झाली आहे.
उत्तरेकडील हस्तलिखितांत संख्येनें स्वरलेखन करण्याची अगदीं अर्वाचीन पद्धति योजलेली दिसते. ही हस्तलिखितें जितकीं अर्वाचीन कालचीं सांपडतात तितकीं तितकीं त्यांची स्वरलेखनपद्धति अधिक पूर्ण दिसते.
ज्या वेळीं सामवेदी सामें गातात त्या वेळीं त्यांतील प्रत्येक स्वर आपल्या हाताच्या बोटांच्या निरनिराळया हालचालींच्या योगानें दर्शित करण्याची त्यांची पद्धति आहे.
(आ) धा र ण ल क्ष ण.- हा ग्रंथ अगदी अलीकडील काळांत शिक्षाग्रंथांच्या आधारें एका सभापति नामक दक्षिणेंतील ब्राह्मण पंडितानें रचला आहे. सामवेदी मंत्र गात असतांना उदात्त, अनुदात्त, स्वरित आणि प्रचय हे स्वर हाताचा आंगठा आणि शेजारचीं तीन बोटें ह्यांच्या चाळवण्यानें दाखवितात. अशा प्रकारच्या बोटांच्या हालचाली स्मरणशक्तीस फारच मदत करतात. हें अलीकडे मानसशास्त्रद्दष्टया सिद्ध झालें आहे. यावरून सामगानाची परंपरा अखंड जशीची तशीच राहण्याचें कारण काय असले पाहिजे हे ह्यायोगानें ध्यानांत येतें. यज्ञप्रसंगीस्तोमाचें गुंतागुंतीचें पठन नियमबद्ध करण्याकरितां सामवेदी एक पुढील चत्मकारिक पद्धति योजतात. उदाहरणार्थ पंचदश स्तोमाकरितं ते औदुंबराच्या वीतभर लांबीच्या कुश संज्ञक पंधरा समिधा घेतात व त्यांच्या पांचपांचाची एकएक अशा तऱ्हेनें एकाखालीं एक अशा तीन पंक्ती किंवा पर्याय करतात. प्रत्येक ओळीची रचना निरनिराळया प्रकारची असून तिची मांडणी कांही विशिष्ट पद्धतीनें केलेली असते. अशाच कांही तरी युक्तीशिवाय स्तोमांचे गुंतागुंतीचे भाग योग्य स्वरांत गाणें अवघड आहे.
सामवेदभाष्याच्या प्रस्तावनेंत सायणाचार्यानें वरील सर्व माहिती थोडक्यांत मुद्देसूद व मनोरंजक करून मांडली आहे.
सामवेदावर दोन भाष्यकर्ते होऊन गेले. त्यांपैकीं सामवेदविवरणकरर्ता भरतस्वामी हा शांकर संप्रदायांतील असून म्हैसूर श्रीरंगपट्टण येथें इसवी सनाच्या १३व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला. सायणाचार्य ह्याच्या मागून अर्ध्या शतकानंतर (इ.स.१२९५(?)-१३८६) झाले.
शोभाकरभट्ट नामक विद्वानानें'सामवेदारण्यकविवरण'नामक एक आरण्यकावर टीका लिहिली.ह्या भाष्यग्रंथाचें एकंदर स्वरूप पाहतां असें दिसून येतें कीं त्यापासून सामवेदावरील महत्वाच्या मुदयांवर चांगला प्रकाश पडण्याच्या ऐवजी जास्त घोटाळा मात्र होतो.
ह्याप्रमाणें विचार करतां सामवेदसंबंधी वाङमयाचा कालानुक्रम पुढीलप्रमाणें ठरतो.
(अ) यर्जुवेदाप्रमाणें यज्ञक्रमानुसार अस्तित्वांत असलेल्या परंतु अनुपलब्ध अशा सामवेदसंहितेचा मूलरचनाकाल.
(आ) गानांतील भेदाप्रमाणें सामवेदाचा वर्गीकरण काल. हया कालांतीलच आरण्यागान आहे.
(इ) कृत्रिम एकत्रीकरणाचा काल इ.स.पूर्वी २०० वर्षे- (१) पूर्व आर्चिक संहिता. (२) सांप्रतच्या स्वरूपांतील ग्रामगेयगान. (३) आर्षेय ब्राह्यण.ह्या ठिकाणीं संहितेंतील पाठभेदाचा इतिहास संपतो.
(ई)पृथक्करण व शास्त्रीय वाङमयरचनेचा काल- (१) पदपाठ (२) उत्तरार्चिक संहिता, आरण्यक संहिता, स्तोभांचें संग्रथन. (३) शास्त्रीय पारिभाषिक वाङमय.
(उ) धार्मिक वाङमयरचनेचा काल. भाष्यग्रंथरचना. इ.स. १३०० पासून नंतर.
वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं आर्षेयब्राह्मण हा सामवेदविषयक अत्यंत प्राचीन पुरावा आहे. कारण ह्या ब्राह्मणाच्या अभावीं सांप्रत उपलब्ध असलेली सामवेदसंहिता ही अगदीं अर्वाचीन दिसते. परंतु आर्षेय ब्राह्मणाच्या अंतर्गत पुराव्यावरून सामवेदसंबंधीं बरींच महत्वाचीं अनुमानें काढतां येणार आहेत.
ह्यांपैकीं पहिलें महत्वाचें अनुमान असें कीं, सामवेद वाङमयांतील खरोखरी महत्वाचे भाग ग्रामगेय, आरण्यगान आणि ब्राह्मणें हे होत. मागाहूनचे पारिभाषिक वाङमय तयार झाल्यामुळेंच सामवेद हा प्राचीन स्वरूपांत आज उपलब्ध आहे. या द्दष्टीशिवाय इतर कोणत्याहि द्दष्टीनें ह्या अर्वाचीन वाङमयास महत्व नाहीं. कारण सूत्रबद्धता, कृत्रिमपणा इत्यादीमुळें ह्या वाङमयाचें सामवेदाभोंवतीं कांटेरी कुंपण झालें आहे.
आर्षेय ब्राह्मणावरून दुसरें एक असें अनुमान काढतां येतें की सामवेदसंहितेचें अनेक वेळ नवीन संस्करण केलें गेलें आहे. आर्षेय ब्राह्मणाच्या ग्रामगेयगानसंबंधीं विवेचन असलेल्या पूर्वार्धाच्या निरीक्षणावरून असें दिसून येतें कीं, त्यांतील सामें हीं मंत्रानुरोधानें एकत्रित केली आहेत व याच पद्धतीनें पूर्वार्चिक हा भाग या ब्राह्मणाच्या रचनेच्या कालीं तयार झालेला होता. परंतु आरण्यगानसंबंधीं विवेचन असलेल्या आर्षेय ब्राह्मणाच्या उत्तरार्धाची एकत्रीकरणपद्धति ग्रामगेयगानाप्रमाणें नसून फक्त सामांचीं नांवें एके ठिकाणीं जुळविलीं आहेत व हीच दुसरी पद्धति प्राचीन असावी. हीच गोष्ट यजुर्वेदाच्या संस्करण पद्धतीवरून अनुभित होते; कारण ग्रामगेयगान हें निरनिराळया यज्ञप्रसंगी म्हणावयाच्या सामांचे बनलें असल्यामुळें त्या भागांचे सामगायक उपाध्यायवर्गाकडूनच संस्करण झालें असलें पाहिजें; परंतु आरण्यगान हें केवळ खाजगी उपयोगाकरितां उपयुक्त असल्यामुळें तें मात्र मूळच्या स्थितींत द्दष्टीस पडतें. कारण प्रो.कुनन् इत्यादिकांच्या संशोधनावरून असें निष्पन्न झालें आहे की, कोणत्याहि प्राथमिक अवस्थेंतल्या धार्मिक वाङमयांतील वारंवार संस्करण होणारे भाग, बहुतेक गृह्यविधी व आचार यांसंबंधीं असणारे नियम हे होत.