प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.  
 
 वेदांतील छंदःशास्त्र.- वेदांतील बहुतेक सर्व मंत्र छंदोबद्ध किंवा पादबद्ध असतात, म्हणजे ते मंत्र वृत्तांत रचलेल असतात; आणि त्यांनां चरण असतात. मंत्रांच्या वृत्तांस विधिविषयक महत्व आहेच. कांही विशिष्ट वैदिक कर्मानुष्ठानें अमुक एक छन्दांत वर्णिलेल्या मंत्रांनींच करावींत, असें सांगितले असतें. उदाहरणार्थ, तैत्तिरीय ब्राह्मणांत असा आदेश आहे कीं, अग्नीचें आधान ब्राह्मणांनी गायत्रीमंत्राने, राजन्यांनी त्रिष्टुभ् मंत्रानें व वैश्यांनी जगती वृत्तांतील मंत्रानें करावें.  याप्रमाणें निरनिराळ्या विशिष्ट कर्मासंबंधानें निरनिराळीं विशिष्ट वृत्तें असावींत असें कल्पिले आहे. वेदांत मुख्यतः सात वृत्तें येतात. १ गायत्री, २ उष्णिह् , ३ अनुष्टुभ्र्, ४ बृहत्ती, ५ पंक्ति, ६ त्रिष्टुभ् आणि ७ जगती ही ती सात वृत्तें होत. गाय़त्री वृत्तांत २४ अक्षरें असून त्यापुढील वृत्तांतल्या अक्षरांची संख्या चाराचारानें वाढत गेली आहें. कोणत्याहि मंत्राचा ऋषि, देवता आणि छन्द हीं माहीत नसतां जर तो मंत्र म्हटला तर तें फार अपायकारक आहे, त्यापासून मोठी हानि होते, म्हणून प्रत्येक मंत्राच्या या तीनहि गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. म्हणून वैदिक कर्म यथाविधि होण्याकरीतां छन्दःशास्त्र शिकणें अवश्य आहे असें मानीत.

पिंगलाची छंदोविवृति.- वृत्तांवर अतिप्राचीन व उत्तम असा ग्रन्थ ( छन्दोविवृति ) पिंगल मुनींनी लिहिला आहे. हाच वेदांग होय, ह्यांत ८ अध्याय आहेत. वर सांगितलेली वैदिक किंवा अलौकिक सात वृत्तें, आणि त्यांचे अवान्तर भेद यांचे निरुपण ह्या ग्रन्थाच्या शेवटच्या तीन अध्यायांत केलें आहे. इतिहास पुराणे व इतर लौकिक पद्यग्रंथ यात जी लौकिक वृत्ते असतात त्यांचे वर्णन पहिल्या पांच अध्यायात आहे. प्राचीनांनी पिंगलग्रंथाला महत्व दिलें याचें कारण पद्धतशीर  असा प्राचीन ग्रंथ तेवढाच होता. पण छंद:- शास्त्राच्या वाढीचा इतिहास लिहूं इच्छिणारास पिंगलाकङेसच लक्ष देऊन पुरेसें होणार नाही. पिंगलपूर्व छंदःशास्त्रीय ज्ञान काय होतें तें इतिहासकाराने ऋग्मंत्र, यजुर्वेद, अथर्ववेद ब्राह्मणें, श्रौतसूत्रें, अनुक्रमणी इत्यादि ग्रंथ तपासून वर्णिले पाहिजे.