प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
पुंडरीक विठ्ठल व त्याचे ग्रंथ.– पुंडरीक विठ्ठल हा आणखी एक सुप्रसिद्ध गवई अकबराच्या कारकीर्दीतच होऊन गेला असावा.  तो खानदेशांतील बऱ्हाणपूर येथे रहात असे.  त्याला इ.स. १५९९ मध्ये अकबरानें दिल्लीस बोलावून नेलें होतें असें दिसतें.  पुंडरीकानें षडरागचंद्रोदय, रागमाला, रागमंजरी आणि नर्तननिर्णय हे चार ग्रंथ लिहिले.  हे चारहि ग्रंथ अलीकडे बिकानेर येथील स्टेटलायब्ररींत शोधून काढण्यांत आले आहेत.  पुंडरीकाच्या काळाच्या सुमारास उत्तर हिंदुस्थानांतील संगीत पद्धतीमध्यें बराच घोटाळा माजत चालला होता व त्यामुळें राजा बुऱ्हाणखान यानें पुंडरीकाला संगीतपद्धतीला नीट शिस्त लावण्यास सांगितलें.  यासाठीं पुंडरीकानें उत्तर व दक्षिण, या दोन्ही पद्धतीचा अभ्यास केला.  त्यानें आपल्या ग्रंथांत दक्षिणेंतील शुद्ध रागपद्धति स्वीकारिली आणि उत्तरेकडील बऱ्याच रागांचे वर्णन केले.  त्यानें रागांचे वर्णन करतांना एका सप्तकांत १४ श्रुतींचा उपयोग केलेला आहे.  पण आपल्या वीण्याला फक्त १२ पडदे वापरले आहेत.