प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

साम्राज्याची विभागणी.- इ. स. ८४३ यावर्षीं झालेल्या व्हरडूनच्या तहानें शार्लमानच्या साम्राज्याची विभागणी झाली. चार्लस् बोल्ड राजाला न्युसट्रिया, अक्विटेन व पश्चिम बर्गंडी हे प्रांत मिळाले. लुई राजाला जर्मन बव्हेरिआ, स्वेबिया व सेक्सनी हे प्रांत मिळाले. याप्रमाणें शार्लमानचें साम्राज्य जाऊन आतां यूरोपांत स्वतंत्र लहान लहान राज्यें निर्माण झालीं. येथूनच आधुनिक यूरोपच्या इतिहासाला प्रारंभ होतो. हीं नवी उदयास आलेलीं राज्ये बाहेरील लोकांच्या स्वा-या व अंतःकलह यांपुढें फारसा टिकाव धरतील अशीं चिन्हें प्रारंभी दिसत नव्हतीं कारण नॉर्स लोक त्यांना फार त्रास देत होते. ते (नार्स) केवळ यूरोपच्या किना-यावरच चांचेपणा करीत रहात नसत, तर समुद्रापासून दूरच्या प्रदेशावरहि स्वा-या करून नासधूस व लुटालूट करीत. इकडे साम्राज्यांत गादीकरितां तंटे सुरू होऊन अर्धवट स्वतंत्र अशा सत्ताधारी सरदारांचा वर्ग निर्माण झाला.