प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

राष्ट्रभावनेचा उदय.- संप्रदाय संरक्षणार्थ चाललेलीं युद्धे बंद झालीं व साम्राज्य विस्कळित झाले. या सुमारास युरोपीय इतिहासाच्या मध्ययुगाचा पूर्वार्ध संपला. पुढें १४ व १५ ही शतकें मध्ययुगाच्या उत्तरार्धांत मोडतात. या कालांत यूरोप हा सामान्य धर्मानें बद्ध असा समाज आहे ही भावना नष्ट होत गेली होती. आजपर्यंत ज्यांनीं यूरोपला एक्य दिलें त्या पोपची गादी व साम्राज्यसत्ता या संस्था आतां प्रबल राहिल्या नव्हत्या. यूरोपचे आपण घटक आहोंत ही भावना जाऊन त्याच्या जागीं लोक आपापल्या प्रांतांचा विचार करूं लागले. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे लोकांत स्वराष्ट्रभावना व स्वतःचे वैशिष्टय या भावना जागृत होऊं लागल्या. याच वेळेस सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झाली. एकंदरींत इ. स. च्या १४ व्या व १५ व्या शतकांत यूरोपांत जरी कोणताहि एक सामान्य धर्म प्रचलित नव्हता तरी भावी युगाची चिन्हें आतां चांगली दृग्गोचर होऊं लागलीं.