प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
पोपच्या सत्तेचा –हास.- पंधराव्या शतकाच्या आरंभीं पोपच्या सत्तेस उतरती कळा लागली. अंतःकलह सुरू होऊन अव्हिगनन येथें पोपची एक नवीन गादी स्थापन झाली. आतां लोकांत पोपविषयीं असलेली पूज्यता कमी झाली. राष्ट्रभावना व वैशिष्टयांची कल्पना ही वाढत चालल्यामुळें राज्याविस्ताराकरिता लढाया सुरू होऊन लोकांची मनें ऐहिक बाबतीकडे जास्त लागलीं. याच वेळेस वुइक्लिफ व हुस हे पुढें येऊन त्यांनीं पोपच्या धोरणांतील दोष दाखविलें.