प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
जर्मन राजसत्तेची स्थापना.- जर्मन राजसत्तेची स्थिति यांच्या अगदीं उलट होती. ज्याप्रमाणें सरंजामी राज्यपद्धतीचा नाश होऊन इंग्लंड व फ्रान्स या देशांत राजसत्ता प्रस्थापित झाली त्याप्रमाणें ती जर्मनींत झाली नाहीं यास पुढील कारणें देतां येतील. (१) रोमन साम्राज्याचा बादशहा जर्मनीचा राजा असे. (२) रोमन सम्राटाची सत्ता कांहीं निश्चित नव्हती. (३) एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार व्यवस्थित ठेवण्याकरिता त्यांनां सरदार लोकांनां पुष्कळ हक्क द्यावे लागले. आणखी (४) जर्मन राजा संस्थानिकांकडून निवडलेला असून त्यास पोपच्याहस्तें साम्राज्याभिषेक होत असे.
याप्रमाणें जर्मन राजाला पोप व साम्राज्य यांच्या भानगडींत पडावें लागल्यामुळें आपलें राज्यपद भक्कम पायावर उभें करण्यास फावलें नाहीं. असे होतें तरी जर्मन राजसत्तेचा उदय फार झपाट्यानें झाला. इ. स. ९११ यावर्षीं जर्मनीच्या प्रबलळ सरदारांनी कॉनराड फ्रंकोनियनला आपला राजा केले. इ. स. ९१९ यावर्षीं सॅक्सनी येथील हेन्री धी फाउलर यानें हंगेरियन, स्लाव्ह, व डेन लोकांचा पराभव करून जर्मन राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागून झालेल्या ओटो धि ग्रेट व त्याचा मुलगा दुसरा ओटो यांनीं तें काम पुढें चालविलें. दुस-या हेन्रीनें (१००१-१९२५) जर्मन राज्याची स्थापना केली. यापुढें जर्मन राज्यसत्तेची वाढ झपाट्यानें होऊं लागली. जर्मन राजांनीं इतालीवर सत्ता मिळविण्याचा अट्टाहास केला नसता व ते पोप व साम्राज्य यांच्या भानगडींत पडले नसते तर जर्मन राजसत्तेला उतरती कळा कधीहि लागली नसती.