प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

धर्मयुद्धें उर्फ ख्रिस्ती संप्रदाय संरक्षणार्थ युद्धें.- यावेळेस पूर्वरोमनसाम्राज्यावर सेलजुक, रशियन व नॉर्मन लोकांचे हल्ले सुरू होऊन त्यामुळें साम्राज्य नष्ट होतें कीं काय अशी भीति पडली. परंतु त्यावेळेच्या अलेक्झिअस कॉमनेनस नांवाच्या सम्राटानें त्यांचा पराभव करून हें संकट दूर केलें. धर्मयुद्धें म्हणजे संप्रदायसंरक्षणार्थ युद्धें या वेळेसच सुरू झालीं. या युद्धामुळें पूर्वसाम्राज्य व पश्चिमसाम्राज्य यामधील बंद पडलेलें दळणवळण पुन्हां सुरू झालें. ही युद्धे इ. स. च्या १३ व्या शतकांत संपली. या मध्यंतरीच्या दोन शतकांत यूरोपच्या एकंदर आयुष्यक्रमांत पुष्कळ फेरफार झाला. (१) पोप व राजा यांची सत्ता वाढलीं. (२) पृथ्वीच्या पूर्वभागांतील प्रदेशाचें ज्ञान पश्चिमेकडील लोकांस जास्त जास्त होऊं लागलें, (३) व्यापाराची प्रगति झाली, (४) धंद्यांनां उत्तेजन मिळालें. (५) सरदारांचा वर्ग बलहीन व संख्येनेंहि कमी झाला (६) व शहरांत राहण्याची प्रवृत्ति वाढूं लागली. धर्मयुद्धांच्या बरोबरच यूरोपांत हिलेब्रँड याने संप्रदायसुधारणाविषयक चळवळ सुरू केली. या चळवळीचा यूरोपच्या बौद्धिक जीवनक्रमावर फार परिणाम झाला. हा हिलेब्रँड सातवा ग्रेगरी या नांवानें पुढें पोपच्या गादीवर बसला (१०७३-८५) व त्यानें पोपची सत्ता फार वाढविली. जी सत्ता वाढण्याची कारणें मुख्यतः वरील संप्रदायसुधारणेंची चळवळ व धर्मयुद्धांमुळें जे पूर्व व पश्चिम यांमधील दळणवळण वाढलें त्यामुळें झालेली व्यापा-याची भरभराट हीं होत.

इ. स. च्या १२ व्या शतकांत या पोपच्या सत्तेचा यूरोपच्या इतिसावर बराच परिणाम झालेला दिसतो. सर्व यूरोपनें कबूल केलेली पोपची सत्ता, लोकांकडून मिळत असलेलें अमित धन, आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील त्यांचा अनुभव व त्यांची विद्वत्ता व योग्यता यामुळें ते यूरोपचे धार्मिक व राजकीय गुरू बनले.

या धर्मयुद्धांचा दुसरा एक परिणाम असा झाला कीं, सरदार वर्ग दुर्बल व संख्येनेंहि कमी झाला. फ्रान्समध्यें याचा परिणाम असा झाली कीं, लहान लहान जमीनदार नष्ट होऊन मोठमोठे जहागीरदार निर्माण झाले व नंतर त्या सर्वांचा रासत्तेंत लोप झाला. आपला प्रधान शुगर याच्या मदतीने नवव्या लुईनें फ्रान्समध्यें अनियंत्रित राजसत्ता स्थापना केली. फ्रान्सप्रमाणें यूरोपांतील दुस-याहि राज्यांनां संप्रदायसंरक्षणयुद्धांपासून फायदा झाला. यूरोपांतून सरंजामी राज्यपद्धतीचा बहुतेक नाश होऊन राजसत्तेचा मार्ग निष्कंटक झाला. व्यापाराची भरभराट होऊन व्यापा-यांचा एक नवा वर्ग बनला. शहरांत राहण्याची प्रवृत्ति वाढूं लागली. पूर्व व पश्चिम यांचा संबंध दृढतर होऊं लागला. याशिवाय सर्वांत मोठा परिणाम म्हणजे या युद्धांमुळे मुसुलमानी सत्तेच्या वाढीस आळा बसला.