प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
कॉन्सटन्टिनोपलचा महंमदीयांकडून पाडाव.- पुढें जॉन [६ वा] या बादशहाच्या कारकीर्दींत कॉन्स्टंटिनोपल मुसुलमानांच्या हातांत गेलें. या वेळेस पश्चिम यूरोप आपापसांतील भांडणांत गर्क होता. तेथील राजांनां स्वार्थापुढें दुसरें कोणतेंहि ध्येय राहिलें नव्हतें. म्हणून कॉन्स्टन्टिनोपलच्या संरक्षणासाठीं यूरोपांतील राष्ट्रांनीं कांहींहि प्रयत्न केला नाहीं. आतां यूरोपच्या भूमीवर आशियामधील राष्ट्राची स्थापना झाली. या पौरस्त्य राष्ट्राच्या संस्कृतींत व यूरापेच्या संस्कृतींत जमीनअस्मानचें अंतर होतें. याशिवाय हें परकी राष्ट्र असल्यामुळें केवळ विस्तारानेंच याचा टिकाव लागणें शक्य होतें. यूरोपांतील सर्व राज्यें जर एक झाली असतीं तर यूरोपांत या परकी सत्तेची वाढ होणेंच अशक्य होतें. परंतु निरनिराळ्या राजसत्तांच्या स्वार्थांधतेमुळें तसें होणें त्या वेळेस अशक्य होतें. बाल्कन द्वीपकल्पांतून तुर्की सत्तेला घालवून देण्यापेक्षां जर्मनीमध्यें आपली सत्ता प्रबल करणें हेंच त्यावेळच्या रोमन साम्राज्याच्या अधिपतीस जास्त महत्त्वाचें वाटलें. फ्रान्स देश नुकताच १०० वर्षाच्या युद्धांतून मोकळा झाला होता. व तेथील राजा लुइ [९ वा] हा सरंजामी राज्यपद्धति नाहींशी करून एकसत्ताक राज्य स्थापण्याच्या कामास लागला होता. इतालींत इतकी अव्यवस्था माजली होती कीं, कोणत्याहि कामाकरितां एक हाणें तिला अशक्य होतें. स्पेन मूर लोकांनां हांकलून देण्यांत गुंग झाला होता. बाल्कन द्वीपकल्पांतील राज्यांत अंतःकलह सुरू होते. या अशा परिस्थितींत तुर्की साम्राज्याला यूरोपच्या भूमीवर आपली सत्ता स्थापन करून जर्मनीच्या सरहद्दीपर्यंत येऊन भिडणें सोपें गेलें. याच वेळेस हॅप्सबर्ग घराण्याची सत्ता दृढ झाली. इ. स. १४७७ यावर्षीं मॅक्सिमिलनचें [सम्राट पुत्र] बर्गंडीची डचेस व चार्लस दि बोल्डच्या राज्याची वारसदारीण जी मेरी तिच्याशीं लग्न केलें. या लग्नानें मॅक्सिमिलनला फ्रान्समधील कॉन्टे व नेदरलंड हें प्रांत मिळाले. निरनिराळ्या राजघराण्यांतील मुलींशीं लग्नें करून हॅप्सबर्ग घराण्यानें आपली सत्ता वाढविली. ही ऑस्ट्रियाची राज्य वाढविण्याची पद्धत त्या वेळेस त्याला फार उपयोगी पडली. याच वेळेस इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या देशांत सरंजामी राज्यपद्धतीचा नाश होऊन राजसत्ता कायम झाली.