प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

पूर्व व पश्चिम ख्रिस्ती संप्रदाय.- इ. स. ८१४ यावर्षीं शार्लमान बादशहा मरण पावला. त्यांच्या मरणानंतर त्याच्या एकसत्ताक राज्यास उतरती कळा लागून सरंजामी राज्य पद्धतीचा उदय होण्याचीं पूर्व चिन्हें दिसूं लागलीं. याच कालांत पूर्वरोमन साम्राज्यानें मुसुलमानांच्या वाढत्या सत्तेस आळा घालून यूरोप व ख्रिस्ती संप्रदाय यांचे मुसुलमानांपासून रक्षण केलें. परंतु या वेळेपासूनच पूर्वख्रिस्तीसंप्रदाय व पश्चिम ख्रिस्तीसंप्रदाय यांमध्यें विरोध उत्पन्न झाला.