प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

नवयुगास आरंभ.- वास्को डि गामानें हिंदुस्थानचा नवीन मार्ग शोधून काढला व कोलंबसानें अमेरिकेचा पत्ता लावला या दोहोंचे परिणाम जगावर अनेक त-हेचे झाले. ते अजमावयाचे म्हणजे जुन्या व नवीन जगाच्या इतिहासाची संगति लावावयाची. पश्चिमेकडे यूरोपीयांनीं ज्या वसाहती केल्या त्यांचे यूरोपावर अनेक परिणाम झाले. धाडशी, द्रव्यलोभी, जगास त्रासलेले आणि आपल्या स्वातंत्र्यासाठीं स्वंदशत्याग करण्यास तयार अशा विविध प्रकृतीच्या लोकांनीं नवीन जगाची वसाहत केली आणि अमेरिका व हिंदुस्थानमार्ग या त-हेच्या फलांमुळें भौगोलिक शोधांस महत्त्व प्राप्त होऊन नवीन नवीन प्रदेश शोधण्याची इच्छा राष्ट्रांमध्यें जागृत झाली आणि जगाचे सर्व भाग शोधण्याकडे बराच परिश्रम झाला. त्याचा इतिहास मागें दिलेल्या भौगोलिक शोधांच्या प्रकरणांत दिलाच आहे. त्या वेळेस भौतिक शक्तीचा उपयोग करण्याचें ज्ञान लोकांस प्राप्त झालें नव्हतें. आणि यामुळें उत्पादन व विनिमय हीं देखील लहान प्रमाणांत होतीं. त्या वेळच्या प्रगमनशील यूरोपाची समाजस्वरूप सध्याच्या हिंदुस्थानच्या मागसलेल्या भागापेक्षां फारसें भिन्न नसावें. त्यावेळेस कलाहि फारच कनिष्ठ स्थितींत असावी, आणि संसारमंडनशास्त्र देखील बरेंच कनिष्ठ  प्रतीचें असावें. त्या वेळेस इंग्लंडमध्यें लोखंडाचे कारखाने किंवा कापसाच्या गिरण्या नव्हत्या व हिंदुस्थानांतील तलम माल नवीनच लोकांस ठाऊक होत होता. नाटकांमध्यें देखील इंग्लंडमध्यें आजच्यासारखी सीनसीनरी नव्हती. आणि हार्मनीचा विकास करणारे संगीत शास्त्रज्ञ पुढें आले नव्हतें. चहा, काफी, कोको यासारखीं पेयें नव्हतीं, तंबाखु नव्हती म्हणजे ध्रूमपानहि नव्हतें. भुइमूग, राताळीं व बटाटे ठाऊक नव्हते. भोजन रूचिकर करण्यास लागणारे मसाले यूरोपीयांत ठाऊक नव्हते. नाटकांमध्यें बायकांचे काम पुरूषच करीत त्यामुळें देखण्या नटींचाहि समाजाला परिचय नव्हता. चित्रकला थोडीबहुत वाढली होती आणि शेक्सपियर अजून झाला नव्हता व नाट्यलेखनहि बेताचेंच होत होतें. दुस-या रिचर्डच्या कारकीदाअत (१३९०) इंग्लंडमध्यें चार्टर देऊन एक कंपनी स्थापन झाली होती. परंतु ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० सालीं झाली. म्हणजें कंपनीचें स्वरूप अजून यूरोपांत फारसें परिचित झालें नव्हतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. रिचर्डच्या काळापासून ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत संयुक्त भांडवलावर व्यापार करणारे संघ असलेच तर ते याज्ञवल्क्याने उल्लेखिलेल्या व नियम दिलेल्या संधांपेक्षां अधिक व्यवस्थित असतील असें वाटत नाहीं. संयुक्त भांडवलावर व्यापार करणें त्यावेळेस ज्या अर्थी फारसें परिचित नव्हतें त्या अर्थीं उत्पादन आणि क्रयविक्रय हीं देखील कनिष्ठ स्थितींतच असलीं पाहिजेत. आणि राष्ट्रीय कर्जाचांहि कल्पना नसल्यामुळें संस्थानाची लोकोपयोगी शक्ति देखील अत्यंत नियमित होती.

मुद्रणकला यूरोपांतील लोकांस परिचित होती पण गद्याचा विकास चांगलासा झाला नव्हता. आणि वाङ्मयाचें स्वरूप १८०० च्या सुमारास जसें महाराष्ट्रांत होतें तशा त-हेचें दिसतें. फरक एवढाच कीं ग्रीक संस्कृतींत उत्पन्न झालेल्या हिरोडोटस, थुसिडीडीझ, झेनोफोन यांसारख्या इतिहासलेखकांचा यूरोपीयांस परिचय होता. शास्त्रवृद्धि ही नुकतीच वर डोकें काढीत होती आणि पारमार्थिक वाङ्मय व तन्मूलक मतांचे पाश तोडून बाहेर पडली नव्हती. लढण्याची कला बरीच बाल्यावस्थेंत होती तरी तोफांचा उपयोग परिचित होता. आणि घोडेस्वारांचा उपयोग प्रथमतः शकांनीं व शकानंतर इतर लोकांनीं शिकून प्रसृत केला होता. विल्यम दि कांकररच्या वेळेस घोड्यांचा केवळ स्थानांतरांस वाहनें म्हणून इंग्लंडमध्यें उपयोग होई व इंग्लिश लोक पाय उतार होऊन लढत असत. क्रेसीच्या लढाईमध्यें बंदुकीच्या दारुचा उपयोग करण्यांत आला व तो पुढें वाढला. स्पेनच्या दुस-या फिलिपच्या कारकीर्दीपर्यंत जहाजें हीं देखील केवळ स्थानांतरास उपयोगी पडत, युद्धाचें उपकरण म्हणून जहाजांचा उपयोग झाला नाहीं. स्पॅनिश आरमाराचा जो इंग्रजांनीं पराभव केला त्यांतील बीज हेंच आहे कीं स्पॅनिश लोक गलबत हे स्थानांतराचें साधन समजत, तर इंग्लंडमधील लोक जहाज हें युद्धाचें साधन समजत व यामुळें दोन्ही आरमारांस भिन्न प्रकारचें शिक्षण होतें. नवीन जगाचा शोध लावल्यानंतर तेथें जी माणसें गेली त्यांस राजसत्तेची परंपरा परिचित नसल्यामुळें त्यांनीं जेव्हां आपले स्वातंत्र्य स्थापन केले तेव्हां राजघराणें उत्पन्न न करितां वैराज्यात्मक शासनसत्ता निर्माण केली आणि त्यामुळें पुढें यूरोपामध्यें लोकराज्याची कल्पना विकसित करण्यास मदत केली. लोकराज्याचा काल म्हणजे शास्त्राधारानें नियम शोधून काढून लोकांवर नियम लादण्याचा काळ नाहींसा करून लोकांच्या संयुक्त मनानेंच शास्त्रें निर्माण करण्याचा काळ. याचे शासनशास्त्रावर व कायदेशास्त्रावर मोठाले परिणाम झाले आणि यामुळे 'रिफॉर्मेशन' नंतर पारमार्थिक मतांत फांटे फोडून जे नवीन सप्रदाय स्थापन झाले त्या संप्रदायांस जातिस्वरूप आले नाहीं. आचारविषयक व विवाहविषयक कायदे लोकसत्ताक राज्यानें जर केले नसते तर शब्दप्रमाणावर भिस्त ठेवणा-या परंतु मतांतर करूं पाहणा-या शास्त्रीबोवाकडून आचारविषयक व विवाहविषयक भिन्न कायदे लोकांवर लादले गेले असते.

भौगोलिक नवीन शोधांचा परिणाम भौतिकशक्तींच्या उपयोगाच्या शोधाइतका मोठा झाला आणि या दोहोच्या मुळें पूर्वकालीन जगाहून अर्वाचीन जग भिन्न झालें आहे.