प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.
राजवंशसत्तेची वाढ - कॉनराड (दुस-या फ्रेडरिकचा मुलगा १२२४-१२७३) च्या मरणानंतर हॅप्सबर्ग घराण्यांतील रुडॉल्फ हा जर्मनीचा राजा झाला. त्याच्या कारकीर्दींत जर्मनीत चोंहोकडे अस्वस्थता. माजली. या कालाला ''ग्रेट इंटरेगनम'' [महा-अराजक] असें म्हणतात. साम्राज्याची विसकटलेली घडी पुन्हां बसविणे अशक्य होऊन स्वतंत्र राज्यें झपाट्यानें निर्माण होऊं लागली. रूडॉल्फनें परिस्थिति ओळखून आचरण केले. त्यानें इतालीकरितां झगडणें सोडून देऊन स्वतःचे घराणें पुढे आणण्याचें धोरण सुरू केलें. हें धोरण त्याच्या वंशजांनीं फार चांगल्या त-हेनें पुढें चालविलें. याच वेळेस नेपल्समध्यें आंजु व सिसलींत अरागॉन हीं घराणीं उदयास आलीं. रूडॉल्फनें ऑस्ट्रिया, स्टिरिआ, कारिन्थिआ, कारनिओला जिकून व्हिएन्ना या शहरीं आपली राजधानी नेली. त्यानें स्थापिलेल्या या राज्याचें महत्त्व यूरोपच्या इतिहासांत फार मोठें आहे. जरी या (हॅप्सबर्ग) घराण्याचे पुरूष कित्येक वर्षे साम्राज्यपदावर आरूढ झाले नाहींत तरी त्यांनीं आपलें राज्य वाढविण्याची आलेली संधी कधींहि व्यर्थ दवडली नाहीं. इ. स. च्या १४ व्या शतकांत साम्राज्याचा -हास फार झपाट्यानें झाला. याच वेळेस स्वित्झर्लंड स्वतंत्र झाला. साम्राज्याची विसकटलेली घडी पुन्हां बसविण्याचा प्रयत्न लक्सेंबर्ग येथील चार्लसनें केला. त्याने एका गोल्डन बुल नांवानें ओळखला जाणारा शासनलेख काढून साम्राज्याचे भाग ठरवून स्वतंत्र होऊं पाहणा-या राजेलोकांस आपल्या सत्तेखालीं आणलें; परंतु त्याच्या अकाली मृत्यूनें ते काम अर्धवट राहिलें. पुढें त्याच्या मुलाला तें काम झेंपले नाहीं. याप्रमाणें पुन्हां साम्राज्याचा -हास होण्यास सुरवात झाली.