प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १८ वें.
यूरोप, शार्लमान राजाच्या मृत्यूपासून सोळाव्या शतकापर्यंत.

सरंजामी राज्यपद्धतीचा उदय.- राजसत्ता बलहीन झाल्यामुळें हे नवीन उत्पन्न झालेले सत्ताधारी सरदार तीस जुमानीनासे झाले. या सरदारांची सत्ता वंशपरंपरेनें चालत आलेली असे. याप्रमाणें यूरोपीय इतिहासाच्या मध्ययुगांतील सरदारांचा वर्ग राजसत्तेच्या मार्गांतील एक महत्त्वाचा अडथळा होऊन बसला. राजसत्तेशीं बरोबरीनें  झगडणा-या व प्रसंगीं राजसत्तेला नाहींशी करून तिचें काम आपल्या हातांत घेणा-या या संस्थेस फ्यूडल सिस्टिम म्हणत. आपणाला तीस सरंजामी पद्धति असे नांव देतां येईल. मराठे शाहींत या पद्धतीचा भाग होताच. या पद्धतीला त्या प्रसंगाने रा. रा. वासुदेव शास्त्री खरे यांनीं सरंजामी पद्धत असेंच म्हटलें आहे. या संस्थेनें यूरोपच्या संरक्षणाचें काम फार चांगल्या त-हेने केले. इ. स. च्या १० व्या शतकाच्या प्रारंभींच यांनीं उत्तरेकडील रानटी लोकांनां हाकलून लावून फ्रान्स व जर्मनी याच्या सरहद्दी सुरक्षित केल्या. नॉर्स वगैरे रानटी लोकांच्या स्वा-याचें भय नाहीसें करून त्यांस निरनिराळ्या राज्यात प्रजाजनें म्हणून स्थायिक केलें. इ. स. ९११ यावर्षीं चार्लस धी सिंपल व शेलो यांच्यामध्यें सेंट-क्लेअर-सर-एपटे येथे झालेल्या तहानें नार्मन लोक नॉर्मडींतील कायमचे रहिवासी झाले. पुन्हां इ. स. ८७८ या वर्षीं वेजमूर येथील तहानें आल्फ्रेड राजानें डेन्स लोकांनां आपल्या राज्यांत राहण्याची परवानगी दिली.
 
इ. स. ११ व्या शतकापर्यंत सरंजामी पद्धति ही संस्था यूरोपच्या पश्चिम भागांतच प्रचलित हाती. तेथून ती नॉर्मन लोकांनीं इंग्लंड, इताली व सिसली यामध्यें नेली.

सरंजामी पद्धतीनें राजाचे अधिकार सर्व नाहींसे होऊन राजसत्ता दुर्बल होऊन नामधारी बनते हें इंग्लंड, फ्रान्स व जर्मनी येथील राजांच्या लक्षांत आलें व म्हणून या देशांचा पुढील तीन शतकांचा इतिहास म्हणजे, राजसत्ता व सरंजामी सरदारपद्धति यांमधील युद्धांनीं भरलेला आहे. प्रथम तीनहि राज्यांत सरंजामी राज्यपद्धति प्रबल होती. इंग्लंडांत ही पद्धति प्रबल नसून तिनें राजसत्तेस कांहीं बाध आणिला नाहीं असें ऑलिसन फिलीप सारख्या इतिहासकारांस म्हणण्याची फार हौस आहे; परंतु स्टीफनच्या वेळेचा अंतःकलह, सरदारांची सत्ता व मी करण्याकरितां पहिल्या हेन्रीनें केलेले प्रयत्न व जॉन राजाच्या वेळेस सरदारांची सत्ता किती प्रबल होती या गोष्टी लक्षांत आणिल्या म्हणजे वरील इंग्लिश इतिहासकारांचें विधान किती फोल आहे हें दिसून येईल. फ्रान्स मध्ये इ. स. १२७७ या वर्षापर्यंत सरंजामी राज्यपद्धति प्रबल होती; परंतु पुढें नवव्या लुई राजाच्या कारर्कीदीपासून राजसत्ता हळूहळू सुदृढ होत चालली व तिची इ. स. च्या १७ व्या शतकांत पूर्ण वाढ झाली.