प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
मानव जातीची उत्पत्ति केव्हां व कशी झाली, आरंभ केव्हां व कसा झाला आणि तिचा अंत कशा प्रकारें होणार ह्या दोन्ही बाबीसंबंधींचा इतिहास अज्ञात आहे. भूशास्त्राच्या व प्राणिशास्त्राच्या मदतीनें मनुष्यजात पृथ्वीवर केव्हां निर्माण झाली, व तिची आरंभीची स्थिति कशी होती, यासंबंधानें माहिती मिळविण्याचा प्रयत्न अलीकडे चालू आहे. तथापि त्याला अद्यापि फारसें यश आलें नाहीं. मनुष्य जातीच्या भावी स्थितीबद्दल प्रस्तुत स्थितीवरून अनुमानें काढण्याचा प्रयत्न करण्यांत येतो. तथापि एकंदरीनें भविष्यकाळहि अज्ञात राहणार म्हणून मानव जातीचा इतिहास आज लिहावयाचा म्हणजे तो प्रयत्न अर्धवटच होणार हें उघड आहे. तथापि प्रस्तुत काळीं मानव जातीच्या एकंदर प्रगतीचा आढावा घेणें बरेंच शक्य झालें आहे. कारण इजिप्त, भारतीय, इराणी, असुरियन, बाबिलोनियन ग्रीक, रोमन, वगैरे प्राचीन काळांतील राष्ट्रांची ऐतिहासिक माहिती बरीच उपलब्ध झाली आहे. आणि पृथ्वीवरील एकंदर सर्व पृष्ठभागाचें संशोधन झालेलें असून त्याची निरनिराळ्या राष्ट्रांत मालकीच्या नात्यानें विभागणीहि झाली आहे.
भौगोलिक परिस्थितीचा परिणाम.- भौगोलिक स्थितीचा मानव प्रगतीवर फार परिणम झालेला आहे. मनुष्य हा स्थलसंचारी प्राणी असल्यामुळें भूपृष्ठभागाचे जमीन आणि पाणी हे विभाग प्रामुख्यानें लक्षांत येतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हीं दोन खंडे यूरोपियन लोकांनीं अगदी अलीकडे १६ व्या शतकांत शोधून काढिली आहेत. तोंपर्यंत म्हणजे सोळाव्या शतकापर्यंत या दोन्ही खंडांत अगदीं रानटी लोकांच्या टोळ्यांची वस्ती होती. व त्यांनीं मानवप्रगतींत कांहींच भर घातली नाही हें उघड आहे. अर्थात सोळाव्या शतकापर्यंतचा मानवप्रगतीचा इतिहास म्हणजे आशिया, यूरोप आणि आफ्रिका या तीनच खंडांतील लोकांचा इतिहास होय. तथापि त्यांतहि दक्षिण आफ्रिका व उत्तर आशिया यांची माहितीहि प्राचीन इतिहासलेखकांनां नसल्यामुळें साधारणपणें स्पेन ते चीनपर्यंतचा पूर्वपश्चिम भूभाग यांतील प्राचीन मानवजातींचा काय तो इतिहास उपलब्ध आहे.
हा भूभाग द्वितीय हिमयुगानंतर बर्फ उत्तरेकडे जाऊन मनुष्यवस्तीस लायक बनला व तेव्हांपासून एकाच भौतिक स्थितींत अद्याप कायम आहे असें धरून चालण्यास हरकत नाही. यूरोपचा उत्तरभाग जसजसा हिमयुक्त होत गेला व साहाराचें रूक्ष वाळवंट बनत गेलें तसतसे गौरवर्णी लोक यूरोपांत वरवर जाऊं लागले आणि कृष्णवर्णी नीग्रो दक्षिणेकडे मध्य आफ्रिकेच्या जंगलांत शिरले. आणि या दोन भिन्नवर्णी लोकांच्या प्रगतींत जें जमीन अस्मानचें अंतर पडलें त्याचें कारण भौतिक परिस्थितींतील फरक हेंच आहे.
मानवजातीबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डोक्याच्या आकाराबद्दलची होय. हा शरीरभाग पिढ्यानपिढ्या जसाचा तसा कायम टिकतो. असा अनुभव आहे. आफ्रिकन व यूरोपीय लोकांचीं डोकीं लांबट असतात. आणि आशियाटिक लोकांचीं रूंदट असतात. पण पूर्वीं एके काळीं रूंदट डोक्याचे आशियाटिक लोक मध्य यूरोपांत घुसले आणि त्यांच्या मिश्रणानें यूरोपांत रूंदट डोक्याचा 'आल्पाईन' मानववंश निर्माण झाला.
जीव जगण्याकरतां पाण्याची अत्यंत अवश्यकता असते आणि पृथ्वीवरील पाण्याचा पुरवठा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भौतिक नियमानुसार समुद्रकांठच्या प्रदेशांत पाऊस फार पडता व त्यामुळें अटलांटिक, हिंदी व पासिफिक महासागर यांच्या किना-यालगत जगाच्या एकंदर लोकसंख्येपैकीं तीन चतुर्थांश वस्ती आहे. यूरोपच्या किनारा व हिंदुस्थान व चीन या देशांच्या किना-यावरच ही बहुतेक वस्ती होती. दक्षिण रशिया, हंगेरी व डान्यूब नदीच्या मुखाकडील प्रदेश खेरीज करतां बाकी सर्व यूरोपखंड अरण्यमय होतें. हंगेरीपासून उत्तर आशियामधून मांचुरियापर्यंत सर्व जंगलच पसरलेलें होतें.
भूमध्यसमुद्राच्या भोंवतालच्या प्रदेशांत, चीन व हिंदुस्थान या देशांत उन्हाळा, पावसाळा वगैरे ॠतुविभागणी व्यवस्थित असल्यामुळें पावसाळ्यांत पिकें लावली म्हणजे ती नीट तयार होण्यास व पुढील पिकाची तयारी करण्यास पुरेसा काळ मिळतो. यामुळें या एकंदर प्रदेशांतील लोक अगदीं प्राचीन काळापासून कृषिप्रधान असल्याचें दिसून येतें.