प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.

मध्य व दक्षिण अमेरिकेंतील राष्ट्रें.- यांच्याविषयीं सध्यां कांहीं विशेष लिहितां येत नाहीं. या राष्ट्रांपैकीं अनेकांस अमेरिकेच्या मनरोमतामुळें उत्पन्न झालेलें संरक्षकत्व राग उत्पन्न करितें पण त्या रागाचा आज व्यावहारिक उपयोग कांहीं विशेष नाहीं. पश्चिम गोलार्धाचें एकीकडे संरक्षक बनावयाचें व प्रसंगीं आपणच वादी असतां आपणच न्याय ठरवावयाचा अशी अमेरिकेची वृत्ति नाहीं असें नाहीं. मध्यें एकदां मेक्सिकोशीं लढाई उत्पन्न होण्याचा संभव टाफ्टच्या कारकीर्दींत दिसून आला. त्या वेळेस अमेरिकन सरकारची वृत्ति कलुषित झाली होती पण ती वेळेवर सुधारली. दक्षिण अमेरिकेंतील राष्ट्रांचा व्यापार एकमेकांशीं व उत्तर अमेरिकेशीं वाढण्यासाठीं संयुक्त प्रयत्न करण्यास सुरूवात झाली आहे आणि त्यांचा ''ब्यूरो ऑफ अमेरिकन रिपब्लिक्स'' हा स्थापन झाला आहे. आणि त्यामुळेंच जरी सर्व राष्ट्रांत सलोखा स्थापन होईल असें नाहीं तथापि संघीकृत होऊन एका ध्योयाचा परिपोष करणें सुरू झालें आहे यांत शंका नाहीं. हा ब्यूरो स्थापन करण्याच्या बाबतींत अँण्ड्रू कार्नेगी यानें मोठी वर्गणी दिली होती, व कांहीं अंशीं कार्नेगी हा या संस्थेच्या उत्पादक होय असें म्हणण्यास हरकत नाहीं. दक्षिण अमेरिका यूरोपावर परिणाम करीत नाहीं असें नाहीं. पोर्तुगाल देशामध्यें जें लोकराज्य स्थापन झालें त्याची पूर्व तयारी ब्रेझिलमध्यें झाली. आणि अमेरिकेनें दक्षिण अमेरिकेचें संरक्षकत्व घेण्यापूर्वीं तिच्या तावडीसाठीं यूरोपांत लढाया झाल्या. वेनझुएला प्रकरणामुळें अमेरिका व इंग्लंड यांची हातघाई होणार होती पण तो प्रसंग टळला. आतां डच, फ्रेंच व इंग्रज यांच्या ग्वाएनावरील ताब्यामुळें यूरोप पुन्हां लढाईंत गुंतेल असें वाटत नाहीं.

लाटिन अमेरिका हा प्रदेश यूरोपांतून वसाहती करूं येणा-या लोकांची अपेक्षा करितो. त्याला गौरेतर वर्णाची चीड नसल्यामुळें तो मंगोलियान रक्ताच्या लोकांसहि आश्रय देतो. त्यामुळें गौरेतर वर्गाची चीड असणा-या अमेरिकेची व त्याची दृष्टि भिन्न आहे हें उघड आहे. पण त्याचा परिणाम काय होईल हें सांगता येत नाहीं. अमेरिकेच्या मनरो मताला नवीन नवीन फांटे फुटूं लागले आहेत. त्याचा सर्वांत विचित्र फांटा म्हणजे मेक्सिकोमध्यें जपानी लोकांनीं येऊन वसाहत करणें व जमिनी पैदा करणें या गोष्टींस प्रतिबंध करण्यासाठीं युनायटेड स्टेट्सनें केलेला विरोध होय. हें मनरो मत जर फार व्यापक होऊं लागलें तर त्याच्या योगानें युनायटेड स्टेट्सची पश्चिमगोलार्धसरंक्षकता दक्षिणेकडील राष्ट्रास बरीच जाचूं लागेल आणि त्यामुळें त्यांमध्यें खटका उडण्याचा संभव आहे.