प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २९ वें
सिंहावलोकन.
रोमन साम्राज्याची घडामोड.- याप्रमाणें पांचव्या व सातव्या शतकांच्या दरम्यान रोमचें साम्राज्य खालीं जाऊन, रोमनांच्या आधीच्या तीन विभागांप्रमाणेंच नवीन तीन विभाग निर्माण झाले. पश्चिम लॅटिन प्रदेश ट्यूटनच्या योगें बळावला; इजिप्शियन आणि सेमेटिक पूर्वराष्ट्रांत मुसुलमानीधर्मानें वार्य घेतलें. व या दोन टोकांच्या मध्यें पुष्कळ शतकें पर्यंत बाल्कन्स पासून टारस पर्यंतचें बिझान्झिअमचें पूर्व-रोमनसाम्राज्य पाचरी प्रमाणें राहिले होतें. हें साम्राज्य भाषेनें ग्रीक, कायद्यानें रोमन, समाज व शासन या बाबतींत पौरस्त्य आणि धर्मानें पाहातां ख्रिस्ती, असें होतें. यांत कांहीं काळपर्यंत कान्स्टंटिनोपल हे जगांतील मोठें शहर, व्यापार, विद्वता आणि चैन यांचे केंद्रस्थान बनले होतें.